राहुल गांधी यांनी गोत्र आणि जात सांगणं हा RSSचा विजय आहे का? : दृष्टिकोन

राहुल गांधी Image copyright Congress

राहुल गांधींनी हिंदू ओळख सांगणं हा संघाचा विजय आहे का, संघाच्या अजेंड्यावर राहुल गांधी आणि पर्यायाने काँग्रेस पक्ष चालतोय का? याबद्दलचा दृष्टिकोन

लाइन

काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांचं गोत्र दत्तात्रय आहे आणि ते कौल ब्राह्मण आहेत. 21व्या शतकातल्या भारताच्या तरुण नेतृत्वाची ही ओळख. असा नेता जो सेक्युलरवादी विचारधारेचा चेहरा मानला जातो.

कोण्या ज्योतिषीला विचारण्याची काही आवश्यकता? हा बायोडेटाच सगळी कुंडली सांगतो. सगळं पोथीपुराण आहे. भारताचं भविष्य काय असेल हे यातून लक्षात येतंय.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी 2013मध्ये देशासाठी एक डेडलाइन दिली होती. पुढच्या 30 वर्षांत भारत वैभवाच्या शिखरावर पोहोचेल अशी भविष्यवाणी त्यांनी केली होती.

वैभवशिखर म्हणजे हिंदू राष्ट्र. भागवत यांची भविष्यकहाणी पूर्णत: चुकीची ठरेल अशी लक्षणं आहेत. कारण भारत त्याआधीच हिंदू राष्ट्र होण्याची शक्यता आहे. होणार आहे. का आधीच झाला आहे?

तुम्हाला असं वाटत नाही का की सेक्युलर शब्द घटनेव्यतिरिक्त राजकीय वर्तुळाकडून वाळीत टाकला गेला आहे. सेक्युलरवादी राजकारणाचे तंबू मुळापासून उखडले गेले आहेत.

मुसलमानांबाबत आता कोणीच बोलत नाही. मुसलमानांशी बोलणं होतं पण लपूनछपून. जेव्हा कमलनाथ यांच्या चित्रफिती समोर येतात त्यावेळी तोंड लपवावं लागतं.

जानवं दाखवून स्वत:ला सनातनी हिंदू दाखवण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा विजय आहे हे योगी आदित्यनाथ यांचं म्हणणं चुकीचं नाही.

हा संघाचा केवळ वैचारिक नव्हे तर राजकीयदृष्ट्याही मोठा विजय आहे योगीजी!

संघाचा राजकीय विजय

निवडणुकीच्या लढाईत कोणीही हरो वा जिंको. सत्य हेच की राजकीय पटलावर काँग्रेसची हार झाली आहे. आपल्या मूळ भूमिकेवर ठाम राहून वाटचाल करता येणार नाही हे काँग्रेसच्या लक्षात आलं आहे. संघाने आखलेल्या रस्त्यावर चालण्यातच काँग्रेसचं भलं आहे.

राहुल गांधी एकामागोमाग एक मंदिराची सैर करत आहोत. उपचार म्हणून ते अजमेर शरीफलाही जातात. तिकडे गेले नाही तरी हरकत नाही. मुसलमान त्यांना धार्मिक दुराग्रही मानणार नाहीत. कारण ते तसे नाहीत.

Image copyright Congress

मात्र मुसलमान त्यांच्याकडे काय म्हणून बघतात याने खरंच काही फरक पडतो का? हिंदू त्यांच्याकडे काय म्हणून बघतात हे निर्णायक आहे. राहुल गांधी यांचे पणजोबा जवाहरलाल नेहरू हे गयासुद्दीन यांचे वंशज असल्याच्या व्हॉट्सअपच्या तोफांना प्रत्युत्तर दिलं जाऊ शकतं का? हा खरा प्रश्न आहे.

गेल्या पाच वर्षांपासून या तोफा सातत्याने अहोरात्र धडधडत आहेत.

काँग्रेस पक्ष या तांत्रिक हल्ल्यांना प्रत्युत्तर देऊ शकलेला नाही. यामुळे काँग्रेसने इंदिरा गांधी यांच्या काळापासून वैचारिक आघाडी याआधीच सोडली आहे. तेव्हापासून काँग्रेसने राजकारणाला मतपेटीची लढाई ठरवून आखणी केली आहे.

विचारधारेचं महत्त्व

विचारप्रवाहाचा मुद्दा त्यानंतर काँग्रेसमध्ये कधी समोर आला? म्हणूनच गांधी केवळ काँग्रेस कार्यालयातील भिंतीवरच्या तसबिरीपुरते मर्यादित राहिले. नेहरूंचं स्मरणही जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने होतं तेवढंच.

काँग्रेसकडे एखादा वैचारिक मुद्दा किंवा प्रवाह आहे का? एखादा वैचारिक उपक्रम त्यांच्याकडे आहे का? गेल्या दहा-वीस-तीस वर्षांत काँग्रेसने असा कार्यक्रम आयोजित केला आहे का? एखादी मोहीम आठवते का? असं एखादं काँग्रेसचं अभियान ज्याने देशभरातल्या नागरिकांना एकत्र आणलं आहे.

Image copyright KAUSHAL JAIN

काँग्रेसने इतक्या वर्षांत असं काही केलं आहे का ज्याने गेल्या 30-40 वर्षांत देशात जन्मलेल्या पिढ्यांच्या इतिहासाबद्दल मूलभूत आकलन होऊ शकेल?

नाही ना? का?

कारण असा विचार आवश्यक असतो याची जाणीवच काँग्रेसला झाली नाही. माणसांना, मानव प्रजातीला एका विशिष्ट विचारधारेची आवश्यकता असते हे काँग्रेसच्या गावीही नाही. एखाद्या विचाराचं अस्तित्व ठराविक काळच असतं. एक विचार येतो, दुसरा जातो. विचारांना स्थायीभाव नसतो. होऊच शकत नाही.

विचारांचं संकट

काँग्रेसच्या गोटात विचार होणं बंद झालं आहे म्हणूनच त्यांना भविष्य दिसणंही बंद झालं आहे. विचार आधी निर्माण होतो, भविष्य त्यानंतर येतं.

आपण अंग झाकायला हवं हा विचार हजारो वर्षांपूर्वी माणसाच्या मनात आला नसता तर आजची परिस्थिती काय असती?

ठोस विचार नसेल तर भविष्यही असणार नाही. काँग्रेससमोरचं मुख्य संकट हेच आहे. दुसरीकडे काँग्रेसविरुद्ध एक संघटना एक विचार घेऊन आगेकूच करत आहे-हिंदू राष्ट्राचा विचार.

अतरंगी विचार अशा पद्धतीने सुरुवातीला सगळ्यांनी या विचाराची थट्टा उडवली. याच विचारासाठी सरदार वल्लभभाई पटेलांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला फटकारलं होतं. याच पटेलांच्या जगातील सर्वोच्च उंचीच्या पुतळ्याबाबत बोलताना संघाची माणसं थकतच नाहीत.

संघाचा पसारा वाढत गेला आणि त्यांना रुजवलेले विचारही फोफावत गेले. अर्थात हे सगळं हळूहळू झालं.

1966 वर्षातली गोपाळष्टमी. गोरक्षेच्या मुद्यावरून जनसंघ (म्हणजेच आजचा भाजपा) तसंच हिंदू संघटनांनी संसद भवनाला घेरलं होतं. शेकडो खरंतर हजारो जण मारले गेले. संघाची आगेकूच होत गेली.

Image copyright FACEBOOK/RAHUL GANDHI

संघाचा प्रसार कसा झाला?

गावोगावी तसंच देशाच्या अनेक भागांमध्ये संघाची पाळंमुळं रुजली नव्हती. 1983 मध्ये इस्लाम आणि ख्रिश्चनांविरोधात हिंदूंना एकत्रित आणण्यासाठी एकात्मता यात्रा सुरू झाली आणि दूरदूर पसरलेल्या गावांमध्ये संघविचार पोहोचला.

यानंतर रामजन्मभूमी आंदोलन तापवण्यात आलं. गावोगावी राम मूर्तींची पूजा सुरू झाली. अडवाणींची रथयात्रा सुरू झाली. यानंतर जे घडलं म्हणजे देशपातळीवर भाजपचा झालेला उदय, हिंदू तसंच हिंदुत्ववादी विचारधारेला अनेक सरकारांचा मिळालेला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मिळत गेलेला पाठिंबा हे सर्वश्रूत आहे.

घरवापसी, लवजिहाद, मुसलमानांची लोकसंख्या, गोरक्षेच्या मुद्यावरून स्मशान आणि कब्रस्तानांचा चेतवलेला मुद्दा, सरकारी खर्चाने झालेले दीपोत्सव, शहरांची नावं बदलण्याचा सुरू झालेली परंपरा आणि सेक्युलरवाद कसा बासनात गुंडाळला गेला हे सगळ्यांनी अनुभवलं आहे.

राईपासून सुरू झालेला हिंदूराष्ट्राचा विचार पर्वताएवढा होऊन आपल्यासमोर प्रकटला. आणि या 40 ते 45 वर्षांत काँग्रेसची काय धोरणं होती? सत्तेसाठी आघाड्यांसाठी बेरजा वजाबाक्यांपलीकडे त्यांचा विचार गेलाच नाही.

काँग्रेसचं शॉर्टकट पॉलिटिक्स

काँग्रेसमध्ये फैलावलेल्या शॉर्टकट संस्कृतीचा परिणाम म्हणजे हिंदू मतं मिळवण्याच्या स्पर्धेत राजीव गांधी सरकारने स्वत:च राम मंदिरासाठी भूमीपूजन केलं. म्हणजे अजेंडा संघाचा होता आणि या तव्यावर पोळी भाजण्याचं काम काँग्रसनं केलं.

परिणाम असा झाला की काँग्रेसला हिंदू मतं मिळालीच नाहीत. फायदा जर का झालाच तर तो संघाच्या हिंदुत्ववादी अजेंड्याचा झाला. संघाला नवी ओळख आणि स्वीकार्यहता मिळाली. सरकारी मान्यता मिळाली.

Image copyright FACEBOOK/RAHUL GANDHI

आता राहुल गांधीही तेच करत आहेत. सोनिया आणि राहुल गांधी तसंच काँग्रेस हिंदूविरोधी आहेत, मुस्लीम समर्थक आहेत हा संघाचा अजेंडा आहे. सोनिया गांधी माथ्यावर टिळा लावून, राहुल गांधी भगवी वस्त्रं परिधान करून, जानवं दाखवून, स्वत:ला शिवभक्त ठरवून, गोत्र सांगत स्वत:ला हिंदू सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत.

संघाने अखेरीस काँग्रेसला ढकलत ढकलत अशी स्थिती गाठली आहे की काँग्रेसला हिंदू शुभचिंतक पक्षाचं लेबल लावून फिरण्यावाचून पर्याय उरलेला नाही.

संघाच्या अजेंड्याचं एक वर्तुळ पूर्ण झालं आहे. काँग्रेस पक्ष स्वत:ला थोडंथोडं हिंदू असल्याचं दाखवू लागला आहे.

येत्या काही वर्षांमध्ये काँग्रेस पक्ष हिंदूमय होऊ शकतो, कारण सवर्णांपासून उपेक्षितांपर्यत आणि दलितांपासून व्यापक हिंदू ओळख देण्यात संघ पूर्णत: यशस्वी झाला आहे.

संघाचा बालेकिल्ला कसा भेदणार?

संघाने सर्वसमावेशक हिंदू ध्रुवीकरणाच्या इंजिनियरिंगचं सूत्र शोधून काढलं आहे. त्यासाठी त्यांनी अख्खी मांडणीही केली आहे. प्रचंड मोठी घोडचूक किंवा राजकीय भूकंपच संघ तंत्राला मोडीत काढू शकतो.

तूर्तास अशी शक्यता दिसत नाही. यामुळे निवडणुकीत भाजप का काँग्रेस जिंकतंय, संघाला याच्याशी काहीही देणंघेणं नाही.

काँग्रेस संघाच्या अजेंड्यावर कूर्म गतीने वाटचाल करत राहिला तरी संघ स्वत:च्या यशावर संतुष्ट आणि खूश असेल.

Image copyright FACEBOOK/RAHUL GANDHI

लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभवाला जरी सामोरं झालं तरी सेक्युलर अजेंडा परतेल अशा भ्रमात राहू नये हे मी स्पष्ट करू इच्छितो.

खयाली पुलाव मनात शिजू देऊ नका. नवी मांडणी करण्यात आली आहे आणि त्यानुसार देशाची सूत्रं हाकली जातील.

संघाला निवडणुकांद्वारे नव्हे तर एखाद्या ठोस विचारधारेने पराभूत केलं जाऊ शकतं. मात्र तो विचार आहे कुठे? कोणाकडे आहे?

प्रादेशिक पक्षांकडे स्वत:चे असे प्रादेशिक मर्यादित असे विचार आहेत. निवडणुकांच्या समीकरणात ते संघाला रोखू शकतात, मात्र संघाच्या वैचारिक आघाडीला टक्कर देऊ शकेल असा विचार त्यांच्याकडेही नाही.

काँग्रेस असा एक पक्ष होता ज्याचं जाळं देशभरात पसरलं होतं. मात्र त्यांच्याकडे विचार नाही, कोणताही संकल्प नाही, आहे तो केवळ शॉर्टकटचा विचार. दुर्देवाने हा शॉर्टकटचा रस्ता नागपूरच्या दिशेनेच जातो.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)