या मुलीचा कुठलाही कायमचा पत्ता नाही

फिरण्याचा छंद Image copyright Shivya Nath

"माझं असं एक घर नाही जिथे मी कायमची राहीन. मला नकोच होतं तसं घरं. माझी इच्छा आहे की मला जाता येईल, राहाता येईल अशी घरं जगात सगळीकडे असावीत, पण आयुष्यभर एकाच ठिकाणी राहायला मला घर नको."

आपल्या देशात जिथं मुली शेजारच्या गावात प्रवास करायला घाबरतात तिथं ही मुलगी गेल्या सात वर्षांपासून भटकतेय. एकटीच!

शिव्या नाथ, 30 वर्षांची भटकी. ती मुळची उत्तराखंडच्या डेहराडूनची. शिव्याने 2011 साली वयाच्या 23व्या वर्षी आपला जॉब सोडला आणि प्रवासाला लागली. 2013 साली तिने आपलं घर सोडलं, होतं नव्हतं सगळं विकलं आणि जगभर फिरणारी जिप्सी बनली.

"आता माझ्याकडे काय आहे विचाराल तर तेवढंच सामान जे दोन बॅगांमध्ये मावेल. बस्स!"

शिव्या एका सुरक्षित घरात, प्रेम करणाऱ्या कुटुंबात लहानाची मोठी झाली. "माझ्या घराच्या छतांवरून दिसणाऱ्या पर्वतांच्या पलीकडे काय दडलंय याची मला नेहमीच उत्सुकता होती."

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
एकटीने फिरून जग बघायचंय, मग हा व्हीडिओ पाहाच

उच्चशिक्षणासाठी शिव्याने सिंगापूरचा रस्ता धरला ते डोक्यावर भलंमोठं स्टुडंट लोन घेऊनच. "माझं नशीब असं होतं ना की, मी 2009 मध्ये ग्रॅज्युएट झाले. अगदी जागतिक मंदी भरात असताना. मग नोकरी मिळणं कठीण झालं."

अनेक प्रयत्नांनी तिला सिंगापूरच्या पर्यटन बोर्डाच्या ऑफिसमध्ये नोकरी मिळाली. तिथंच तिची सोशल मीडियाशी खऱ्या अर्थानं ओळख झाली आणि तिनं जगभरातल्या ट्रॅव्हल ब्लॉगर्सला फॉलो करायला सुरुवात केली.

Image copyright Shivya Nath

पण त्या ऑफिसमधल्या छोट्या क्युबिकलमध्ये शिव्याचा जीव रमेना. तिला वेगळंच आकाश खुणावत होतं.

"एका कुठल्याश्या स्पर्धेत मला बक्षीस म्हणून पॅरीसची दोन तिकीटं मिळाली. तोपर्यंत नोकरी सोडायचं माझ्या डोक्यातही नव्हतं. पण संधी मिळाली आहे तर तिचं सोनं करूया म्हणून मी दोन महिन्यांची मोठी सुट्टी घेतली. अर्थात ती सुट्टी काही सहजासहजी मिळाली नाही. त्यासाठी मला माझ्या वरिष्ठांना बरंच पटवावं लागलं."

आणि झाली प्रवासाला सुरूवात

दोन महिने म्हणजे खूप मोठा कालावधी असं वाटू शकतं. पण सुट्टी संपता संपता शिव्याला काहीतरी वेगळंच जाणवलं.

"सुरुवातीचा एक महिना मी युरोपमध्ये फिरले. ही माझी पहिलीच मोठी सुटी होती. मला माहीत नव्हतं की मला आपलं रुटिन सोडून सलग फिरण आवडेल की नाही. पण मला जाणवलं की मी जणू काही भटकण्यासाठीच जन्माला आलेय. दुसरा महिना मी हिमालयाच्या कुशीत असणाऱ्या स्फिती या गावात घालवला."

Image copyright Shivya Nath

सुट्टी संपवून ती ऑफिसला आली तेव्हा तिला प्रकर्षाने जाणवलं की तिला या चक्रात अडकायचं नाहीये. आठवडाभरात तिने नोकरी सोडली आणि ती जगभ्रमंतीसाठी बाहेर पडली.

अग्गबाई, एकटीच फिरतेस? भीती नाही वाटत?

आपल्याकडे पुण्याहून नाशिकला एकटीने जायचं म्हटलं तर आईवडिलांचे, नवऱ्याचे शंभर प्रश्न असतात, काळजी असते आणि एकटीने प्रवास करणारीच्या मनातही धाकधूक असते.

दर तासाला कुठे पोहोचली, कोण आहे आजूबाजुला असे मेसेज येतजात असतात. अशात ही तरणीताठी मुलगी एकटी अशा दुर्गम भागांमध्ये प्रवास करते जिथं मोबाईलचं नेटवर्क तर सोडा, तो चार्ज करायला वीजही नसते.

असं एकटीने फिरायला असुरक्षित नाही वाटत तिला?

"असुरक्षित काय तुम्ही राहाता त्या शहरात, त्या जॉबमध्येही वाटतंच की," शिव्या हसत उत्तरते.

"अनोळखी देशात गेलं तरी भीती वाटते. मग भीती वाटते म्हणून तुम्ही स्वतःला बांधून घेणार का? नवीन ठिकाणी जाताना मला अजूनही भीती वाटते, पण त्या भीतीवर मात करून मी जो प्रवास करते तो अनुभव अवर्णनीय असतो.

Image copyright Shivya Nath

"मी गेली सात वर्षं फिरतेय आणि मला एखाद-दोन अपवाद वगळता नेहमीच चांगले अनुभव आलेत. आणि वाईट अनुभवांचं म्हणाल तर ते तर तुमच्या स्वतःच्या शहरात, घरातही येऊ शकतात की," ती पुढे म्हणते.

सेटलबिटल व्हायचा काही विचार?

कुठल्याही तीस वर्षांच्या मुलीला दुनियाभरचे लोक, मग नातेवाईक असोत वा अजून कोणी, जे तऱ्हेवाईक प्रश्न विचारतात त्यातून शिव्याही बचावली नाहीये. "तुला फिरायची इतकीच आवड असेल तर लग्न का करत नाहीस, तेवढीच तुला प्रवासात सोबत होईल असं मला अनेकजण म्हणतात," ती हसते.

पण सेटल होण्याची शिव्याची व्याख्या इतकी साधी नाहीये. "आपल्याकडे मुलींना त्यांना हवं ते करण्यापासून थांबवलं जातं. मला वाटतं आपल्याला आयुष्यात काय हवं हे ठरवण्याचा अधिकार मुलींना हवा. जसं, माझं म्हणाल तर मी माझ्यापुरतं ठरवून टाकलं आहे, मला मुलं नको आहेत. लग्नाचं बघू. पण मी आयुष्याचा पूरेपूर आनंद घेतेय. मला हवं तसं जगतेय."

Image copyright Shivya Nath

कदाचित एका ठिकाणी सेटल न होणं हीच शिव्याची सेटल होण्याची व्याख्या आहे.

शिव्यासारखं एकटीने फिरायचंय, मग या आहेत तिने दिलेल्या काही टिप्स

1. एकटीने फिरायला सुरुवात करण्याआधी काही गोष्टी आपल्या शहरात एकटीने करून पाहा. कधी एकट्या जेवायला जा, फिरायला जा, पिक्चर पाहा. बघा, तुम्ही किती कम्फर्टेबल आहात ते. हे जमलं तर बाहेर फिरायला जाण्याचा आत्मविश्वास पण येईल.

2. आपण अनेकदा मदतीसाठी इतरांवर अवलंबून असतो. मग भले ते आपले आई-वडील असोत, भावंड किंवा मित्रमैत्रिणी. पण एकटीने फिरायचं असेल तर स्वावलंबी बना. सगळी कामं आपली आपल्याला करता यायला हवीत. तुमची ट्रीप अशी प्लॅन करा की तुम्हाला कोणाची गरज पडणार नाही.

3. आपण बाहेर गेलो की एखाद्या हॉटेल किंवा गेस्टहाऊसमध्ये राहातो. पण तसं न करता एखाद्या स्थानिक कुटुंबासोबत किंवा होम स्टेमध्ये राहा. अशाने तुम्ही सुरक्षितपण राहाल आणि तुम्हाला नवीन मित्रमैत्रिणीही मिळतील. हीच मंडळी तुम्हाला कुठे फिरावं, काय पाहावं याच्याविषयी मार्गदर्शन करू शकतात.

4. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजं एकटीने फिरायला जरूर जा. तो अनुभव तुम्हाला जगाकडे पाहायी नवी दृष्टी देतो.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)