महापरिनिर्वाण: 'बाबासाहेब नसते तर मी आणि माझी मुलं मेलो असतो' - कडुबाई खरात

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
'डॉ. आंबेडकर नसते तर मी आणि माझी मुलं मेलो असतो'

"मी माझ्या कातड्यांचा जोडा जरी शिवून दिले तरी बाबासाहेबांचे उपकार माझ्यानं फिटणार नाही. एवढं बाबासाहेबांनी मला दिलं आहे. मी बाबासाहेबांचे गाणे म्हणते."

डॉ. आंबेडकर यांच्यावर गाणी गाणाऱ्या औरंगाबादच्या कडुबाई खरात यांचं हे वाक्य.

काही दिवसांपूर्वी फेसबुकवर डॉ. बाबासाहेबांवरील "मह्या भीमानं सोन्यानं भरलिया ओटी..." हे गाणं खूप व्हायरल झालं. हातात एकतारी घेऊन खुर्चीवर बसलेली ही महिला त्या गाण्यातून जणू स्वतःच्या जीवनाची व्यथाच मांडत होती, असं जाणवत होतं.

गाणं अपलोड झाल्यावर काही तासांमध्येच हे गाणं महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात वणव्यासारखं पसरलं. विशेष म्हणजे हे गाणं कुण्या लोकप्रिय गायिकेचं नव्हे, कडूबाई खरात नावाच्या एका सामान्य महिलेनं गायलेलं होतं.

अपलोड करणाऱ्यानं या गाण्यासोबतच एक पोस्ट लिहिली होती. त्यात त्या महिलेचं नाव, त्या कोण आहेत, कुठे राहतात आणि काय करतात, अशी सर्व माहिती होती. कडुबाई बाबासाहेबांवरील गाणे म्हणून मिळणाऱ्या भिक्षेवर आपलं घर चालवतात, असंही त्यात सांगण्यात आलं होतं.

त्या पोस्टखाली त्यांचा नंबर कुणाकडे आहे का म्हणून विचारणा केल्यावर एकाने मला त्यांचा नंबर दिला. दुसऱ्या दिवशी दुपारी मी त्या नंबरवर मी फोन लावला. मी विचारलं "हा कडुबाई खरात यांचा नंबर आहे का?"

तिकडून एका मुलाने उत्तर दिलं, "आई बाहेर भिक्षा मागायला गेली आहे. तुम्ही संध्याकाळी फोन करा."

Image copyright BBC/RAHUL RANSUBHE

संध्याकाळी मी पुन्हा त्या नंबरवर संपर्क झाला. मी विचारलं, "कडुबाई खरात बोलताय का?"

"हो, मी कडुबाईच बोलतेय, सर. बोला काय काम होतं?"

मी त्यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली. तारीख आणि वेळ ठरली आणि शेवटी "जय भीम" म्हणत त्यांनी फोन ठेवला.

त्यांची भेट घेण्यासाठी मी औरंगाबादला पोहोचलो. विमानतळाच्या पुढे बीडकडे जाणाऱ्या एक रेल्वेरुळावर एक पूल आहे. त्याच्या बाजूलाच एक भलीमोठी गायरान जमीन आहे, जिथे पत्र्याचे शेडमध्ये काही लोक राहातात. तिथेच एक घर होतं कडुबाई खरात यांचं.

Image copyright BBC/RAHUL RANSUBHE

त्यांचं घर एकदम साधं होतं. पत्र्याच्याच भिंती आणि पत्र्याचंच छत. घरासमोर थोडं आंगण आणि एक चूल होती. घरामध्ये फक्त एक पलंग आणि पत्र्याला अडकवलेली एकतारी.

स्वयंपाकघर नुसतं नावालाच होतं. एक छोटा भांड्याचा रॅक होता, मात्र त्यात काही जास्त भांडी नव्हती. थोडं सरपण पडलेलं होतं तर डब्ब्यांमध्ये काहीच नव्हतं.

आम्ही थोडे स्थिरस्थावर झालो नि मग त्यांनी त्यांच्याबद्दल सांगण्यास सुरुवात केली. "माझे माहेर भोकरदन तालुक्यातील आहे. मी तिकडे माझ्या आईवडिलांसोबत राहायचे. मी माझ्या आईवडिलांना एकुलती एक होते. माझे वडील मला गाण्याच्या कार्यक्रमाला घेऊन जायचे. त्यांचं गाणं ऐकून ऐकून मी गाणं म्हणायला शिकले."

Image copyright BBC/RAHUL RANSUBHE
प्रतिमा मथळा त्र्याच्याच भिंती आणि पत्र्याचीच छत. घरासमोर थोडं आंगण आणि एक चुल होती.

"माझं लग्न झाल्यानंतर माझ्या वडिलांनी मला सासरी पाठवण्याच्या ऐवजी घरजावई ठेवून घेतला. मात्र दोन मुलं आणि एक मुलगी पदरात सोडून माझे पती वारले. त्यानंतर काही दिवसात आई-वडीलही वारले."

हे सांगताना त्या गहिवरून येतं.

पती आणि आईवडील वारल्यानंतर निराधार झालेल्या कडुबाईंनी एकतारा हातात घेतला आणि बाबासाहेबांनाच आपले माय-बाप समजून त्यांची गाणी म्हणत त्या भिक्षा मागू लागल्या.

Image copyright BBC/RAHUL RANSUBHE
प्रतिमा मथळा 'सहा महिन्यांची मुलगी असताना मालक वारलेले. लहान लहान लेकरं कडेवर घेऊन, दारोदार जाऊन गाणे म्हणून मी हे पोट भरायचं साधन केलं'

"सहा महिन्यांची मुलगी असताना मालक वारलेले. लहान लहान लेकरं कडेवर घेऊन, दारोदार जाऊन गाणे म्हणून मी हे पोट भरायचं साधन केलं. मला कुणाचाच सहारा नाही. अजूनही नाही. मी अजूनही जाते. कुणी पोळी देतं, कुणी तांदूळ देतं, कोणी काहीही देतं. त्याच्यावर मी पोट भरते," त्या सांगतात.

"बाबासाहेब होते म्हणून मी आतापर्यंत वाचले. नाही तर माझी मुलं पण मेली असती आणि मी पण मेले असते." हे सांगताना कुडुबाईंना अश्रू अनावर होतात.

कडुबाई गाणं जरी गात असल्या तरी त्यांनी कसल्याही प्रकारचं गायनाचं शिक्षण घेतलेलं नाहीये. याबद्दल त्या म्हणाल्या "मी एक अंगठाबहाद्दर बाई आहे. मी कॅसेट्समधले गाणे ऐकते. कधी मी वाटेनं जाताना ऐकलं गाणं कुणाचं, तर ते ध्यानात धरते. मी वामनदादा कर्डक यांची गाणे जास्त गाते."

कडुबाईंचा आवाज एवढा सुरेल आहे की ऐकणारा ऐकतच राहतो. त्या सांगतात, "मी गाणं म्हणायला लागले तर सारे लोक माझ्या जवळ येतात. मला चांगलं बोलतात, पाणी पाजतात, चहा करतात. कुणी दहा रुपये देतं, कुणी वीस रुपये देतं तर कुणी दोन रुपये. ज्याची जशी ऐपत असेल तसे लोक मला पैसे देतात, मदत करतात."

Image copyright BBC/RAHUL RANSUBHE
प्रतिमा मथळा 'मी गाणं म्हणायला लागले तर सारे लोकं माझ्या जवळ येतात. मला चांगलं बोलतात, चहा करतात, पाणी पाजतात. कोणी दहा रुपये देतं, कोणी वीस रुपये देत. तर कोणी दोन रुपये देतं.'

बाबासाहेबांबद्दल कडुबाईंच्या मनात प्रचंड आदर आहे. त्यांच्याबद्दल सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच तेज दिसून येतो.

"मी माझ्या कातड्यांचा जोडा जरी शिवून दिले तरी बाबासाहेबांचे उपकार माझ्यानं फिटणार नाही, एवढं बाबासाहेबांनी मला दिलं आहे. मी बाबासाहेबांचे गाणे म्हणते. बाबासाहेबांच्या जीवावर मी आज माझे लेकरं पोसते आणि मी सुद्धा पोटाला पोटभर खाते," असं त्या आवर्जून सांगतात.

बाबासाहेबांची गाणी गाऊन उदरनिर्वाह करणाऱ्या कडुबाईंना बाबासाहेबांच्या कार्यक्रमाला जाण्याची इच्छा असते. मात्र परिस्थितीमुळे त्यांना तिथे जाता येत नाही, याची खंत त्या बोलून दाखवतात.

"बाबासाहेबांचे खूप ठिकाणी कार्यक्रम होत असतात. मात्र मला तिकडे जाण्यासाठी गाडीभाडेसुध्दा नसते. जर शासनाने जर मला एखादा मोठा कार्यक्रम करून दिला, थोडं मानधन दिलं तर माझ्या कुटुंबाला त्याचा फायदा होईल," अशी अपेक्षा त्या व्यक्त करतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)