अयोध्या : ज्या घटनेमुळे बदललं भारताचं राजकारण आणि नेत्यांचा दृष्टीकोन

बाबरी मशीद Image copyright AFP

बाबरी मशीद प्रकरणाला 26 वर्षं पूर्ण झाली आहेत. पण बाबरीचं भूत आजही जिवंत आहे. आणि हे भूत जिंवत ठेवण्याचं संपूर्ण श्रेय जातं भारतीय राजकारण्यांना.

6 डिसेंबर 1992 हा भारतीय राजकारणातील असा दिवस आहे ज्यानं देशाच्या राजकारणाला असं वळण दिलं की गेल्या 26 वर्षांत आपण खूपच मागे गेलो.

आज देशात असे काही मुद्दे प्रभावी ठरत आहेत ज्यांना देशानं फाळणीनंतर मागे सोडून दिलं होतं. त्यापूर्वी धर्मनिरपेक्षता फक्त राज्यघटनेतच नाही तर प्रत्येकाच्या नसानसांत भिनली होती.

पण 6 डिसेंबर नंतर धर्मांधतेनं धर्मनिरपेक्षतेची जागा घेतली.

6 डिसेंबर 2018चा विचार केल्यास देशात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, समस्त हिंदू धर्माला फक्त अयोध्येतील मंदिरापर्यंतच मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न होत आहे.

हिंदूची व्याख्याच बदलली

या देशाला चालवणाऱ्या काही लोकांनी तर हिंदूची व्याख्याच बदलली आहे. त्यांना असं वाटतं की, देशातील ज्या व्यक्तीला अयोध्येत मंदिर बनवावं असं वाटतं तोच फक्त हिंदू आहे. मंदिरही त्या अटींवर बनवावं ज्या अटी या लोकांना अभिप्रेत आहेत.

Image copyright PRAVEEN JAIN/BBC

दरवर्षी 6 डिसेंबरला जुन्या आठवणी ताज्या होतात. त्या दिवशी मी स्वत: अयोध्येत उपस्थित होतो आणि संपूर्ण प्रकरण डोळ्यादेखत पाहात होतो. हीच बाब मी माझ्या 88 पानी साक्षीच्या स्वरुपात सीबीआय न्यायालयात मांडली होती.

तो उन्माद ज्यानं विवेकाची मर्यादा ओलांडली होती, कायदा आणि सुव्यवस्थेला पायदळी तुडवलं होतं, काही लोकांच्या चेहऱ्यावर आनंद तर काहींच्या चेहऱ्यावर भीती होती, जवळपास 4 तास मी बाबरी मशिदीला उद्ध्वस्त होताना पाहात होतो. ते दृश्य भीतीदायक होतं.

या घटनेंतर दरवर्षी 6 डिसेंबरला अयोध्येत विश्व हिंदू परिषदेकडून शौर्य दिवस साजरा केला जातो. भाजपचा एखादा ज्येष्ठ नेता त्यात सहभागी होत असतो.

उत्साह कमी झाला

पण हळूहळू लोकांचा उत्साह कमी होताना दिसत गेला. एक एक वर्षं निघून जात होतं आणि सहा-सात वर्षांनंतर लालकृष्ण आडवाणी शौर्य दिवसाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अयोध्येत प्रमुख पाहुणे म्हणून गेले.

Image copyright PRAVEEN JAIN/BBC

त्यादिवशीही मी तिथंच होतो. खरंतर आडवाणींना सर्वांत मोठा धक्का त्या दिवशीच बसला असावा कारण त्यांच्या सभेसाठी फक्त 500 ते 700 लोक जमा झाले होते.

सामान्य माणसांपेक्षा पोलीस आणि मीडियातल्या लोकांचं प्रमाण अधिक होतं.

हे सर्व त्या अयोध्येत घडत होतं जिथं कधीकाळी याच आडवाणींनी ऐतिहासिक रथयात्रा काढली होती आणि तिला उडंद प्रतिसाद लाभला होता. खरंतर नुसत्या भंडाऱ्याच्या नावावर 5,000 साधू एकत्र येणं अयोध्येत सामान्य बाब आहे.

तो दिवस आणि आजचा दिवस. अयोध्येतील शौर्य दिवस फिका पडत चालला आहे. एक औपचारिकता म्हणून हा दिवस साजरा केला जात आहे.

जुना अंगार फुलवण्यासाठीचे प्रयत्न

6 डिसेंबरला देशातल्या अनेक भागांत दंगली झाल्या. याचाच परिणाम म्हणून काही राजकीय जाणकांरानी नवीन सरकारबद्दल भाकितंही केलं. पण प्रत्येक गोष्टीचा एक वेळ असतो. हळूहळू वेळ बदलत गेली आणि 6 डिसेंबरचा परिणाम कमी होत गेला.

Image copyright AFP

पण उजव्या विचारधारेच्या संघटनांना हे कसंकाय मंजूर होईल? त्यांनी जुनाच अंगार पुन्हा फुलवण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत.

योगी आदित्यनाथ यांचं उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान असणं, हेही यामागचं कारण असू शकतं.

राम मंदिराच्या उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेनं नुकतीच अयोध्येत एक सभा भरवली होती. त्यावेळी अनेक हिंदुत्ववादी नेत्यांनी उघडपणे धमकी दिली की, मंदिर निर्माणात बाधा आल्यास अजून एकदा 6 डिसेंबर घडवून आणण्यात येईल.

पण तसं करण्यात ते असमर्थ ठरले कारण आजच्या काळात 6 डिसेंबर 1992सारखी परिस्थिती निर्माण करणं सोपी गोष्ट नाही.

Image copyright AFP

आयोजकांच्या आशेपेक्षा जमा झालेल्या लोकांची संख्या खूपच कमी होती. आयोजकांना सरकारचा अनौपचारिक पाठिंबा आहे, असा समज सगळीकडे असताना ही परिस्थिती होती.

26 वर्षांनंतर पुन्हा एकदा अयोध्या समोर आलंय. आजच्या दिवशी अयोध्येत पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येईल आणि अयोध्येतील नागरिकांचा दिवस तणावात जाईल.

मंदिराची गोष्ट करणारे हे विसरून जातात की, भक्त 6 डिसेंबरला रामाच्या दर्शनापासून वंचित राहतात. कारण या दिवशी भक्तांना शेजारील जिल्ह्यांच्या सीमाभागात रोखलं जातं.

दंगलीच्या भीतीमुळेही 6 डिसेंबरला अयोध्येत भाविकांची संख्या खूपच कमी असते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)