अवनी वाघिणीला मारताना नियम पायदळी: राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण

वाघ, जंगल, अधिवास, पर्यावरण
प्रतिमा मथळा अवनी वाघीण

संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणाऱ्या अवनी वाघिणीला मारताना अनेक नियमांचं उल्लंघन झाल्याचं एका अहवालातून उघड झालं आहे.

नरभक्षक ठरवण्यात आलेल्या अवनी वाघिणीला 2 नोव्हेंबरला ठार केल्यानंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अवनी वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद करता आले असते, तिची हत्या का करण्यात आली, अशा आरोप वन्यप्रेमींकडून झाला होता.

त्यानंतर वाघिणीच्या मृत्यूच्या चौकशीसाठी केंद्राच्या राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या (NTCA) चमूने घटनास्थळी भेट दिली. या प्राधिकरणाने तयार केलेल्या अहवालात नियम पायदळी तुडवल्याचं स्पष्ट झालं आहे.

अवनीला ठार करण्याचं नियोजन अत्यंत ढिसाळ होतं, असं या चौकशी अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे.

13 जणांचे बळी घेण्याचा आरोप ठेवत अवनी अर्थात T1 वाघिणीला नरभक्षक ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर तिला ठार करण्यासाठी शार्प शूटर नवाब शाफक्त अली याला वनखात्यानं पाचारण केलं होतं.

जवळपास दोन महिने वाघीण आणि तिच्या दोन बछड्यांची शोधमोहीम सुरू होती. अखेर 2 नोव्हेंबरला मध्यरात्री अवनीला ठार करण्यात आले.

Image copyright Pratik Chorge
प्रतिमा मथळा अवनी वाघिणीचा शोध घेण्यासाठी असंख्य क्लृप्त्या अवलंबण्यात आल्या.

NTCA ने चौकशी दरम्यान ज्या ठिकाणी वाघिणीला गोळ्या घालून ठार केले त्या घटनास्थळी भेट देऊन तिथली पाहणी केली होती. तसेच वन विभागाचे अधिकारी आणि शूटर नवाब शफाअत अली आणि त्याचा मुलगा असगर अली यांची सुद्धा या समितीने चौकशी केली होती. त्यांची साक्षसुध्दा समितीपुढे घेण्यात आली.

या अहवालात मांडण्यात आलेले मुद्दे पुढीलप्रमाणे -

  • अवनीला ठार करताना अनेक नियमांना बगल देण्यात आली आहे
  • 24 तासाच्या आत डार्ट मारणे बंधनकारक होतं. मात्र तब्बल 56 तास उलटून गेल्यानंतर मुखबिर शेख यांनी अवनीला डार्ट मारला. त्यामुळे या डार्टचा प्रभाव अवनीवर पडला नाही. त्यामुळं ती बेशुद्ध झाली नाही आणि तिला ठार करण्यात आलं.
  • पशुवैद्यक टीम आणि वाघिणीला जेरबंद करणारं पथक यांच्यात जराही समन्वय नव्हता. पशुवैद्यक डॉक्टरच्या तज्ज्ञाच्या सल्ल्याशिवाय डार्टचा मारा करण्यात आला. दोन दिवस उशिराने डार्ट मारल्याने अवनी बेशुद्ध होऊ शकली नाही.
प्रतिमा मथळा अवनीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
  • मारण्यापूर्वी वनविभागाच्या पथकाला अनेकदा अवनी दिसली होती. तरीही अवनीला जेरबंद करण्याचं योग्य नियोजन होऊ शकलं असतं. ढिसाळ नियोजनाच्या आधारे अवनीवर हल्ला करण्यात आला. अवनीला ठार करणाऱ्या टीममध्ये पशूवैद्यकीय अधिकारी, बायोलॉजिस्ट कुणीही नव्हते.
  • शार्प शूटर नवाब शफाहत अली यांच्या मुलाकडे बंदुकीचा परवाना नव्हता.
  • या टीमने परवानगी नसलेले औषध वापरले.
  • बेशुद्ध करण्याचे औषधाचे इंजेक्शन मारल्यानंतर लगेचच गोळी झाडण्यात आली.

केंद्रीय व्याघ्र प्राधिकरणाची चौकशी सुरू असतानाच राज्यात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशानुसार T1 वाघीण मृत्यू प्रकरणी राज्य शासनाने नव्याने चौकशी समिती स्थापन केली आहे. त्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

"व्याघ्र प्राधिकरण अहवाल चौकशीचा अभ्यास केला जाईल, त्यानंतर त्यावर कृती अहवाल तयार केला जाईल. वन विभाग त्याबद्दलची माहिती एकत्रित करेल. त्यानंतर अंतिम अहवाल सादर केला जाईल," असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार बीबीसीशी बोलताना म्हणाले.

NTCAने ज्या मुद्द्यांवर बोट ठेवले आहे त्या मुद्द्यांवर कायद्यात काय तरतुदी आहेत, याची तपासणी केली जाईल आणि त्यानंतर अहवालाच्या आधारे योग्य ती कारवाई करण्यात येईल," असंही ते पुढे म्हणाले.

प्रतिमा मथळा अवनीचा शोध घेण्यासाठी परिसरातल्या लोकांना सूचना करण्यात आल्या होत्या.

वाघिणीला मारण्यात जे लोक त्या टीममध्ये समाविष्ट होते, त्यांनी कोणत्या नियमांचे उल्लंघन केले यावर कायद्यात असलेल्या तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असं त्यांनी आश्वासनही दिलं.

"कोणताही अहवाल जेव्हा सादर होतो तेव्हा तो थेट आमच्याकडे येत नाही. अहवाल त्या विभागाला त्याच्या मतासाठी जातो. विभाग त्याच्यावर आपलं मत व्यक्त करतो. मग तो विधी आणि न्याय विभागाकडे जातो. कारण शेवटी कायद्याच्या तरतुदी पडताळणे आवश्यक आहे. तो गुन्हा आहे की चुका झाल्या आहेत? त्या नेमक्या काय आहेत, ते विधी आणि न्याय विभाग सांगेल. त्यानंतर कृती अहवाल तयार केला जाईल. त्यात आक्षेप असेल तर तो सल्ला आहे की गुन्हा आहे हे समोर येईल," असं त्यांनी सांगितलं.

अवनीच्या हत्येनंतर मुनगंटीवार यांच्यावर केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनीही टीका केली होती. "अवनीची हत्या ही शासनाच्या आदेशांवरून झालेली शिकार" असल्याचं सांगत त्यांनी "कुणालाही कसे मंत्री बनवू शकता?" अशी विचारणा करत देवेंद्र फडणवीस सरकारवर ताशेरे ओढले होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)