डॉ. आंबेडकरांची गांधीजींवर टीका : 'वास्तव, कडवटपणा, संताप यांचं मिश्रण'

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा आंबेडकर यांनी गांधी यांना दुटप्पी म्हटलं होतं.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बीबीसीला 1955 साली दिलेल्या स्फोटक मुलाखतीत महात्मा गांधींवर टीका केली होती. या मुलाखतीमध्ये त्यांनी महात्मा गांधी हे सनातनी हिंदू होते आणि दुटप्पी होते, अशी टीका केली होती. (ही मुलाखत तुम्ही इथं वाचू-ऐकू शकता.) या मुलाखतीची दुसरी बाजू मांडत आहे ज्येष्ठ पत्रकार आणि अभ्यासक उर्विश कोठारी.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बीबीसीने घेतलेल्या मुलाखती आणि त्यात त्यांनी गांधींविषयी व्यक्त केलेली कठोर मतं नेहमीच चर्चा आणि आरोपांसाठी खाद्य पुरवतात. इंटरनेटवर या मुलाखती सहज उपलब्ध आहेत, याबद्दल धन्यवादच दिले पाहिजे. डॉ. आंबेडकरांच्या काही रेकॉर्डिंगही उपलब्ध आहेत, हेदेखील ऐतिहासिकदृष्ट्या दुर्मिळच. या मुलाखतीत डॉ. आंबेडकर यांनी गांधीजींविषयी अनेक कटू उद्गारही काढले आहेत. त्यामुळे ही मुलाखत गांधींचा द्वेष करणाऱ्यांना कर्णमधुर वाटू शकते. मात्र गांधी-आंबेडकर यांच्या नात्याच्या कोनाबद्दल पुसटशीही कल्पना असणाऱ्या कुणालाही या मुलाखतीने आश्चर्य वाटणार नाही.

रामचंद्र गुहा यांनी नुकतंच महात्मा गांधींचं चरित्र (गांधी : द इअर्स दॅट चेंज्ड द वर्ल्ड) लिहिलं आहे. त्यात त्यांनी एका ओळीत या मुलाखतीचा उल्लेख केला आहे, ते म्हणतात, 'गांधींनी 1930 आणि 1940 च्या दशकात जे लिखाण केलं त्याचा संदर्भ देत त्यांनी (डॉ. आंबेडकरांनी) गांधी ही वाद निर्माण करणारी व्यक्ती असल्याची निंदा केली आहे.' (पान क्रमांक 908)

डॉ. आंबेडकरांनी 63 वर्षांपूर्वी गांधींवर केलेली टीका ही त्यांची मतं, ऐतिहासिक दावे आणि त्यांनी केलेल्या मीमांसेवर आधारित आहेत. ही मुलाखत तब्बल सहा दशकांच्या प्रदीर्घ काळानंतर तिच्यातील सर्व कडवटपणा आणि तिरस्कृत दृष्टिकोनासह पुन्हा वाचली गेली पाहिजे. डॉ. आंबेडकरांच्या मते, 'गांधी भारताच्या इतिहासातील एक प्रकरण आहे, ते युग-प्रवर्तक नव्हते.' काँग्रेस जो अधिकृत उत्सव साजरा करतो, त्या कृत्रिम श्वासोच्छावास नसता तर गांधींचा फार पूर्वीच विसर पडला असता, असं ते म्हणतात.

गांधी युगप्रवर्तक होते की नाही, हा खुला प्रश्न आहे. ज्याचं सर्वमान्य होईल, असं उत्तर मिळणं कठीण आहे. विशेषतः जेव्हा गांधीजींना जाऊन केवळ सात दशकांचा काळ लोटला आहे. मात्र तो 'कृत्रिम श्वासोच्छ्वास' कधीच मागे पडला आहे. गांधी अजूनही जिवंत आहेत आणि दूरच्या भविष्यातही ते राहतील, अशीच खात्रीशीर अपेक्षा आपण ठेवू शकतो. (इथे गांधी एक ऐतिहासिक व्यक्तिमत्व म्हणून आपण बोलतोय, त्यांच्या विचारधारेविषयी नाही.)

Image copyright Other
प्रतिमा मथळा आंबेडकरी विचारांचा प्रभाव भारतातच नाही तर जगभरातल्या समता लढ्यांमध्ये दिसतो.

डॉ. आंबेडकर म्हणतात, ते गांधींना नेहमी 'विरोधक' म्हणूनच भेटले. त्यामुळे ते त्यांना 'बऱ्याचशा इतर लोकांपेक्षा जास्त चांगलं ओळखतात.' इतरांना ते महात्मा वाटले. मात्र डॉ. आंबेडकर म्हणतात, त्यांनी गांधींना 'एक मनुष्य म्हणून बघितलं, त्यांचातला केवळ माणूस बघितला.'

डॉ. आंबेडकर यांच्या दृष्टीने हा दावा खरा असू शकतो, मात्र डॉ. आंबेडकरांनी गांधींना केवळ एका कोनातून, एका दृष्टिकोनातून बघितलं हे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होतं. यातून त्यांचं गांधींविषयी एक मत तयार झालं, जे अतिशय टोकदार होतं. त्यांच्या (आंबेडकरांमध्ये) मतांत कधीकधी थोडा मवाळपणा किंवा राजकीय गरजही दिसली. उदाहरणार्थ 6 सप्टेंबर 1954 रोजी डॉ. आंबेडकरांनी 'गांधी निधी' नावाने मीठ कर लावून तो निधी दलितांच्या कल्याणासाठी वापरला जावा, असा सल्ला दिला. ते म्हणाले, "मेरे मन में गांधीजी के प्रति आदर है. आप जानते हैं कि चाहे कुछ भी हो जाए, गांधीजी को पीछडी जाति के लोग अपनी जान से भी ज्यादा प्यारे थे. इस लिए वह स्वर्ग में से भी आशीर्वाद देंगे."

(मूळ पुस्तक इंग्रजीत आहे. मी गुजराती अनुवाद वाचला आणि तो भाग हिंदीत प्रस्तुत केला. कारण ती गुजराती भाषेच्या जवळची आहे. गुजराती आवृत्ती संदर्भ, आवृत्ती 2001, पान 540)

गांधी 'नेहमी दुटप्पी वागायचे,' असा जोरदार आरोप डॉ. आंबेडकर यांनी आपल्या मुलाखतीत केला आहे. त्यांच्या मते गांधी आपल्या इंग्रजी वर्तमानपत्रात 'स्वतःला जातिव्यवस्था आणि अस्पृश्यतेचे विरोधक म्हणून दाखवायचे' मात्र त्यांच्या गुजराती मासिकात 'ते वर्णाश्रम धर्म म्हणजेच जातिव्यवस्थेचं समर्थन करायचे.' कुणीतरी गांधींच्या गुजराती आणि इंग्रजी वर्तमानपत्रातल्या वक्तव्यांची तुलना करून त्यांचं चरित्र लिहावं, असा सल्ला त्यांनी दिला होता. (ज्यामुळे त्यांचा दुटप्पीपणा उघड होईल.)

Image copyright Other
प्रतिमा मथळा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून डॉ. आंबेडकर ओळखले जातात.

या मुलाखतीनंतरच्या वर्षांत बरंच काही घडलं.

गांधी यांचं लिखाण मूळ किंवा अनुवादित स्वरूपात 'द कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा गांधी (CWMG)' या शंभर खंडात उपलब्ध आहे. CWMGचे प्रमाणित हिंदी आणि गुजराती अनुवादही उपलब्ध आहेत. गांधींच्या गुजराती लेखाचे इंग्रजी अनुवाद मिळवणं कुणालाही सहज शक्य आहे. 'हरिजन' (इंग्रजी) 'हरिजन सेवक' (हिंदी) आणि 'हरिजन बंधू' (गुजराती) या सर्वांच्या जवळपास सर्वच प्रती गांधी हेरिटेज पोर्टलवर (gandhiheritageportal.com) मिळतील. कुणीही त्यांची तुलना करू शकतं आणि गांधींच्या गुजराती आणि इंग्रजी लेखांविषयी पसवरण्यात आलेले गैरसमज दूर करता येतो. गांधींजीनी इंग्रजी लेखांमध्ये वर्णाश्रम म्हणजेच जातिव्यवस्थेचं समर्थन आणि गुजराती लेखांमध्ये अस्पृश्यतेचा कडाडून विरोध केल्याचं अभ्यासातून दिसून येतं.

डॉ. आंबेडकर यांनी अस्पृश्यतेच्या उच्चाटनासह समान संधी आणि सामाजिक प्रतिष्ठेवर भर दिला आणि याला गांधींचा विरोध होता, असा दावा केला होता. त्यांच्या मते 'अस्पृशांना काँग्रेसकडे वळवणं,' हा गांधींचा हेतू होता आणि 'अस्पृशांनी त्यांच्या स्वराज चळवळीला विरोध करू नये' हा गांधींचा दुसरा उद्देश होता.

गांधी पुरोगामी सुधारणावादी नव्हते आणि ज्योतिबा फुले किंवा डॉ. आंबेडकर ज्याप्रकारे जातिव्यवस्थेला भिडले, तसं गांधींनी केलं नाही. तरीदेखील काँग्रेसमध्ये किंवा राष्ट्रीय राजकारणात येण्याआधीच 1915 साली गांधींनी आपल्या आश्रमात एका दलित कुटुंबाला आसरा दिला होता. त्यावेळी मोठा विरोध झाला आणि नव्याने स्थापन झालेलं आश्रम बंद होतं की काय अशी शक्यता निर्माण झाली मात्र गांधींनी त्याचा निकराने सामना केला. ते झुकले नाहीत. अशा अनेक घटना आहेत. राहता राहिला प्रश्न दलितांनी उच्च पदं भूषवण्याचा, तर जगजीवनराम आणि स्वतः डॉ. आंबेडकर केंद्रीय मंत्रिमंडळात होते.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा अनुयायी डॉ. आंबेडकरांच्या तसबिरींसह

इंग्रज भारताला स्वातंत्र्य बहाल करण्यासाठी राजी झाले ते गांधींच्या चळवळीमुळे नाही तर तत्कालीन कारणांमुळे हे डॉ. आंबेडकरांनी अगदी योग्य म्हटलं आहे.

दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ आणि पुणे करार हे दोन गांधी आणि आंबेडकर यांच्यातल्या वादाचे कळीचे मुद्दे होते. (हे महत्त्वाचे मुद्दे 1937च्या निवडणूक निकालांसह मूळ मुलाखतीतही पाहाता येतील.)

त्यांचा दावा खरा होता. मुंबई प्रांतात राखीव जागेवर डॉ. आंबेडकर यांच्या पक्षाने पाठिंबा दिलेले 17 पैकी 15 उमेदवार निवडून आले. (धनंजय कीर, गुजराती अनुवाद, पान 349) मात्र वेगवेगळ्या प्रांतातल्या मिळून एकूण 151 राखीव जागांपैकी काँग्रेसने निम्म्यांहून जास्त जागा मिळवल्या. (151 पैकी 78)

डॉ. आंबेडकर यांनी आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत, राजकीय कारकिर्दीच्या अखेरीस दिलेली ही मुलाखत वास्तव, कडवटपणा आणि संतापातून केलेल्या आरोपांचं मिश्रण आहे. हे अगदी मानवी स्वभावाला आणि आंबेडकर यांनाही अनुसरून आहे. मात्र आजच्या काळात याचा वापर गांधींची निंदानालस्ती करण्यासाठी करणं योग्य नाही आणि न्याय्यही नाही.

(लेखात प्रसिद्ध झालेली मतं हे लेखकाची वैयक्तिक आहेत.)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)