सावित्रीबाई फुले यांनी भारतीय जनता पक्षाला ठोकला राम राम कारण...

खासदार सावित्रीबाई फुले यांनी भारतीय जनता पक्षाला ठोकला राम राम
प्रतिमा मथळा खासदार सावित्रीबाई फुले यांनी भारतीय जनता पक्षाला ठोकला राम राम

उत्तर प्रदेशच्या बहराईचच्या खासदार सावित्रीबाई फुले यांनी भारतीय जनता पक्षातून राजीनामा दिला आहे. भाजप समाजात फूट पाडण्याचं राजकारण करतंय, असं म्हणत त्या पक्षातून बाहेर पडल्या.

आपला राजीनाम्यात त्या म्हणाल्या की, "मी शासनदरबार ते रस्त्यापर्यंतचं राजकारण मागासवर्ग, दलित आणि अल्पसंख्याकांच्या समस्यांसाठी लढले आहे, त्यांचे प्रश्न मी 2014 पासून सतत संसदेत आणि पक्षात मांडत आले आहे. पण माझ्या म्हणण्याकडे एक दलित खासदार म्हणून दुर्लक्ष करण्यात आलं. म्हणून मी भाजपच्या धोरण आणि वृत्तीने दुखी होऊन, आज महापरिनिर्वाण दिनाला भाजपमधून सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे."

आधी 2000 साली मायावती यांनी त्यांना बहुजन समाज पार्टीतून काढून टाकलं होतं. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि 2014 साली खासदार म्हणून निवडून आल्या.

"बाबासाहेबांमुळे मला तिकीट मिळालं. बहराइच मतदारसंघ अनुसूचित जातीजमातींसाठी आरक्षित नसता तर मी खासदार होऊ शकले नसते. मला कुणी तिकीट देईल यावर विश्वासच नव्हता," असं त्या एकदा बीबीसी हिंदीशी बोलताना म्हणाल्या होत्या.

मात्र फुले यांचे भाजपबरोबरचे मतभेद आधीच उघड होते.

प्रतिमा मथळा सावित्रीबाई फुले भारतीय जनता पक्ष सोडणार असल्याची चर्चा होती

दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमानाची जात दलित सांगितल्यावरून वाद उफाळला होता. त्यावर बोलताना फुले म्हणाल्या होत्या, "जर योगीजींच्या म्हणण्यानुसार हनुमान दलित होते तर मग देशातल्या सर्व हनुमान मंदिरांमधले पुजारी दलित असायला हवेत."

"हनुमानाने नेहमीच रामाची साथ दिली, त्यांच्या आदेशाचं पालन केलं, मग रामाने त्यांना काळं तोंड आणि शेपूट का दिली?" असा सवालही त्यांनी उपस्थित केल्याचं हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तात म्हटलं आहे.

देशाच्या राजकारणात सध्या उकळीला आलेल्या राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलताना त्या म्हणाल्या, "देशाला राम मंदिराची गरज नाही. त्याने न रोजगार निर्माण होणार आहे ना दलित, मागासवर्गाचे प्रश्न सुटतील. त्याने फक्त ब्राह्मणांना फायदा होईल, जे लोकसंख्येच्या जेमतेम 3 टक्के आहेत. मंदिरात येणाऱ्या दक्षिणेतून ते आपले खिसे भरतील आणि आमच्या (दलित) समाजाला पुन्हा गुलाम बनवू पाहतील," असं त्या ANI वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाल्या.

बीबीसीशी बोलताना त्यांनी भाजपवरची नाराजी उघडपणे न बोलता पक्षातल्या काही त्रुटी दाखवण्याच्या प्रयत्न केला होता.

"2014 मध्ये लोकसभेत मी दलितांचा मुद्दा मांडला होता. महिला आणि उपेक्षित वर्गाच्या प्रश्नाचा मुद्दा सातत्यानं मी मांडत आहे. बहुजन समाजातील व्यक्तींवर अत्याचार करण्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मी केली आहे," असं त्या त्यावेळी बोलताना म्हणाल्या होत्या. पण 'केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भाजपचं सरकार आहे. मग तुमचं सरकार पावलं का उचलत नाही?' असा प्रश्न बीबीसी हिंदीचे रेडिओ संपादक राजेश जोशी यांनी अनेक वेळा विचारला, पण सावित्रीबाईंनी या प्रश्नाला काहीही उत्तर दिलं नाही.

तेव्हा बसपात प्रवेश करणार का, या प्रश्नावर त्या "योग्य वेळ येईल तेव्हा निर्णय घेईन," असं म्हणाल्या होत्या.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

मोठ्या बातम्या

राज्यात 30 जूनपर्यंत लॉकडाऊन : काय सुरू होणार, कोणत्या गोष्टींवर निर्बंध?

सोशल मीडियासंबंधीच्या मुंबई पोलिसांच्या आदेशावरुन वाद का?

गांजा ओढणे हा खरंच कोरोनावरचा उपचार आहे का? - रिअॅलिटी चेक

शाळा सुरू झाल्या तर मुलं कोरोनाच्या संसर्गापासून सुरक्षित राहतील?

हर्षवर्धन जाधव : रावसाहेब दानवेंचे जावई का सापडतात वारंवार वादात?

सोनू सूदने राज्यपालांची भेट घेतल्यानंतर 'अण्णा हजारे' का ट्रेंड होतायत?

सिगारेटच्या एका पाकिटापासून अमेरिकेत सुरू झाला आंदोलनांचा घटनाक्रम

लॉकडाऊन उठवल्यानंतर कोरोना व्हायरस संसर्गाची दुसरी लाट येईल का?

यंदा परदेशात उच्चशिक्षणाचं भारतीयांचं स्वप्न अपूर्णच राहणार?