विधानसभा निवडणुका : एक्झिट पोलचे अंदाज किती बरोबर असतात?

मतदान Image copyright Getty Images

पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकींचा निकालाकडे देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. निकाल लागण्यापूर्वी शुक्रवारी राजस्थान आणि तेलंगणातील मतदान झाल्यानंतर एक्झिट पोलचे निकाल हाती जाहीर झाले. पण वेगवेगळ्या संस्थांनी वेगवेगळे अंदाज दिल्याने नेमका कुणाचा निकाल ग्राह्य धरावा याबद्दल लोकांत संभ्रम निर्माण झाल्याचं चित्र आहे.

ABP-CSDSनं म्हटलं आहे की मध्यप्रदेशात भाजपला 94 जागा मिळतील आणि काँग्रेसला 126 जागा मिळतील. तर टाइम्स नाऊ-CNXनं म्हटलं आहे की भाजपला मध्यप्रदेशात 126 जागा मिळतील आणि काँग्रेसला 89 जागा मिळतील.

निकालांबाबत स्पष्टता निर्माण करणं हे एक्झिट पोलचं काम आहे पण प्रत्यक्षात अनुभव असं सांगतो की त्यामुळे स्पष्टता तर निर्माण होतच नाही पण संभ्रम मात्र उत्पन्न होतो. एक्झिट पोल हे अचूक असतात की फक्त माहितीवर आधारित अंदाज असतो? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी बीबीसीनं 2014 ते 2018 या दरम्यान प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलचा अभ्यास केला.

त्यातून असं लक्षात आलं की एक्झिट पोलमुळे आपल्याला कोण जिंकणार याचा अंदाज येतो पण कोणत्या पक्षाच्या किती जागा येतील हे नेमकेपणे समजू शकत नाही.

2017 च्या गुजरात निवडणुकीत भाजप जिंकेल असं भाकित एक्झिट पोलनं केलं होतं. C-Voterनं असं भाकित केलं होतं की भाजप 111 जागा जिंकेल आणि काँग्रेसच्या 71 जागा येतील. टुडेज चाणक्यनं म्हटलं होतं की भाजपला 135 जागा मिळतील आणि काँग्रेसला 47 मिळतील. जर एक्झिट पोलवर नजर टाकली तर असं लक्षात येईल की 65 टक्के जागा या भाजपला मिळतील असा अंदाज बहुतेक एजन्सीजनं बांधला होता. पण जर प्रत्यक्ष निकाल पाहिले तर असं लक्षात येतं की भाजपच्या अंदाजापेक्षा 10 टक्के जागा कमी झाल्या आहेत. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार काँग्रेसनं 65-70 जागा जिंकणं अपेक्षित होतं पण त्यांनी 77 जागा जिंकल्या.

Image copyright Getty Images

गुजरात निवडणुकीत काँग्रेस किती जागा जिंकेल याबाबत एक्झिट पोलचा अंदाज बहुतेक प्रमाणात खरा ठरला पण या निवडणुकीतील विजेत्या पक्षाला किती जागा मिळतील हे मात्र त्यांना सांगता आलं नाही. 2018च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी तज्ज्ञांनी म्हटलं होतं की या निवडणुकीत कोण जिंकेल यांचा अंदाज बांधणं हे कठीण काम आहे.

या निवडणुकीत ABP News - C Voterचा अंदाज होता की भाजपच्या 110 जागा येतील आणि काँग्रेसच्या 88 जागा येतील तर इंडिया टुडे- अॅक्सिसचा अंदाज होता की भाजपला 85 जागा मिळतील तर काँग्रेसच्या 111 जागा येतील. प्रत्यक्षात निकाल जेव्हा हाती आले तेव्हा भाजपनं गेल्या निवडणुकीच्या तुलनेत खूप जागा जिंकल्या होत्या. पण त्यांचं सरकार बनलं नाही. फक्त याच वेळी असं झालं होतं की एजन्सीजनं जे कौल दिले होते ते निकालाशी मिळते जुळते होते.

एक्झिट पोलचे कौल किती अचूक असतात हे सांगता येणं कठीण काम आहे. पण नेमक्या कोणत्या पक्षाच्या किती जागा येतील आणि त्यावरून कोणतं सरकार स्थापन होईल याचा अंदाज एक्झिट पोलला बांधता येत नाही हे तर आपण सहज सांगू शकतो. हा अंदाज चुकण्याची शक्यताच अधिक आहे.

Image copyright Getty Images

बिहारच्या 2015च्या विधानसभा निवडणुकीत 'चाणक्य'नं सांगितलं होतं की भाजपला 155 जागा मिळतील आणि महाआघाडीला 83 जागा मिळतील. निल्सेन आणि सिसेरो तसेच इतर संस्थांनी अंदाज वर्तवला होता की भाजपला 100 च्या वर जागा मिळतील पण प्रत्यक्षात चित्र मात्र उलटं दिसलं. नितिश कुमार, लालू प्रसाद यादव आणि काँग्रेसनं 243 पैकी 178 जागा जिंकल्या. पूर्ण जागांच्या 73 टक्के जागा महागटबंधनने जिंकल्या. यावेळी टक्केवारीतील त्रुटीमध्ये खूप अंतर होतं. कोण प्रथम क्रमांकावर येईल आणि दुसऱ्या क्रमांकावर येईल या अंदाजात आणि प्रत्यक्ष निकालात तफावत होती.

दरवेळी हे अंदाज चुकतात असं नाही. 2016च्या पश्चिम बंगाल निवडणुकीवेळी अंदाज बरोबर आला होता. ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला 210 जागा मिळतील असं भाकित चाणक्यनं केलं होतं तर इंडिया टुडे - अॅक्सिसनं म्हटलं होतं की तृणमूलच्या 243 जागा येतील. बहुमतामध्ये येण्यासाठी आवश्यक असणाऱ्या जागांपेक्षा तृणमूलला अधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. त्यांच्या अंदाजाशी मिळती जुळती संख्या तृणमूलला मिळाली होती. तृणमूलला 211 जागा मिळाल्या. गंमत म्हणजे दुसऱ्या स्थानावर कोण येईल याचा अंदाज पुन्हा चुकला. इंडिया टुडे- अॅक्सिस वगळता सर्वच एजन्सीजचा अंदाज होता की डावे आणि काँग्रेसला 100च्या वर जागा मिळतील पण त्यांना केवळ 44 जागा मिळाल्या.

2017च्या उत्तर प्रदेश निवडणुकीवेळी बहुतांश एक्झिट पोलनं वर्तवलं होतं की भाजपला संपूर्ण बहुमत मिळेल. चाणक्यनं सांगितलं होतं की भाजपला 285 जागा मिळतील. पण भाजपला त्याहून अधिक जागा मिळाल्या. भाजप आणि मित्रपक्षांना 325 जागा मिळाल्या होत्या.

पण समाजवादी पक्षाला 88-112 जागा मिळतील असा त्यांचा अंदाज होता. यावेळी देखील विजेता कोण ठरेल हे सांगण्यास एजन्सीजला यश मिळालं होतं पण दुसऱ्या क्रमांकावर कोण येईल हे सांगण्यास ते अपयशी ठरले. समाजवादी पक्षाची मजल फक्त 54 जागापर्यंत गेली होती.

राजस्थान, तेलंगणा, मध्यप्रदेश, मिझोराम आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकींचे एक्झिट पोल किती अचूक ठरतात, हे कळण्यासाठी आता काही तास वाट पाहावी लागणार आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)