माधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढवणार नाही : #5मोठ्या बातम्या

माधुरी दीक्षित Image copyright Dominique Charriau
प्रतिमा मथळा माधुरी दीक्षित

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. माधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढवणार नाही

अभिनेत्री माधुरी दीक्षित लोकसभा निवडणूक लढवणार नाही, अशी माहिती तिच्या प्रवक्त्याने दिली आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित भाजपच्या तिकिटावर पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र माधुरीच्या प्रवक्त्यांनी हे वृत्त चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.

हे वृत्त खोटं आणि निराधार असल्याचं तिच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं आहे, असं या बातमीत म्हटलं आहे.

काही महिन्यांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा संपर्क अभियानासाठी मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांनी माधुरीची तिच्या घरी भेट घेतली होती.

या भेटीनंतर माधुरीला भाजपकडून राज्यसभेवर पाठवलं जाईल अशी चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर आता माधुरी भाजपच्या तिकीटावर पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवेल, अशा चर्चांना उधाण आलं होतं, असं बातमीत म्हटलं आहे.

2. मराठा आरक्षणाविरोधात आणखी एक याचिका

राज्य सरकारनं लागू केलेल्या मराठा आरक्षणाच्या कायद्याला विरोध करणारी आणखी एक जनहित याचिका गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे.

मराठा समाज सधन आहे. त्यांना आरक्षणाची आवश्‍यकता नाही, असा दावा याचिकाकर्ते वकील संजित शुक्‍ला यांनी केला आहे.

Image copyright HINDUSTAN TIMES/GETTY IMAGES

मुख्य न्या. नरेश पाटील यांच्या खंडपीठापुढे शुक्रवारी ही याचिका सादर होण्याची शक्‍यता आहे. मराठा आरक्षणाविरोधातील ही दुसरी याचिका आहे.

76 हजार रिक्त पदांच्या मेगाभरतीमध्ये मराठा आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती देण्याचीही मागणी त्यांनी केली आहे.

मराठा समाज सधन आहे. शेती, सहकार क्षेत्रामध्ये बहुतांश समाज प्रस्थापित आहे. अशा समाजाला सामाजिक किंवा शैक्षणिक मुद्द्यावर आरक्षण मिळू शकत नाही, असा दावा त्यांनी याचिकेत केला आहे, असं या बातमीत म्हटलं आहे.

3. बुलंदशहर प्रकरण मॉब लिंचिंग नसून अपघात - योगी आदित्यनाथ

बुलंदशहर येथे उसळलेल्या हिंसाचारात एका पोलिसाचा मृत्यू झाला आहे. हे प्रकरण मॉब लिंचिंग नसून एक अपघात आहे, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. हिंदुस्तान टाईम्सनं ही बातमी दिली आहे.

Image copyright Getty Images

एका हिंदी वर्तमानपत्रानं शुक्रवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

4. महाराष्ट्रात 22 महिन्यांत 9 वाघांची शिकार

महाराष्ट्रात 2017 पासून 22 महिन्यांत 9 वाघांची शिकार करण्यात आली आहे. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

Image copyright FOREST DEPARTMENT

वाघांच्या शिकाराची सर्व प्रकरणं विदर्भातील आहेत. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत ही बाब विचारली होती.

प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार 1 जानेवारी 2017 ते 20 ऑक्टोबर 2018 या कालावधीत महाराष्ट्रात एकूण 32 वाघांचे मृत्यू झाले. यातील 22 मृत्यू हे नैसर्गिक होते. 1 मृत्यू हा अपघाताने झाला होता. नऊ वाघांची शिकार करण्यात आली. यात सहा वाघ तर तीन वाघि़णींचा समावेश होता, असं या बातमीत म्हटलं आहे.

5. डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यम नवे मुख्य आर्थिक सल्लागार

डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांची देशाचे नवे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. द वायरने ही बातमी दिली आहे.

त्यांनी शिकागो विश्वविद्यालयातून अर्थशास्त्रात पीएचडी मिळवली आहे.

ते हैदराबादच्या इंडियन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्राध्यापक आहेत. त्यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा असेल.

अरविंद सुब्रमण्यम यांच्या जागेवर कृष्णमुर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते पदभार केव्हा स्वीकारतील हे अजून स्पष्ट करण्यात आलेलं नाही, असं बातमीत म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)