विधानसभांमध्ये भाजपच्या पराभवानंतर शिवसेनेची रणनीती काय?

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे Image copyright Hindustan Times

पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरं जावं लागल्यामुळे महाराष्ट्रातलं राजकारणही ढवळून निघेल, असं दिसतंय. एकीकडे गेली साडेचार वर्ष सुस्तावलेल्या विरोधकांना अचानक बळ मिळालं आहे. तर सत्तेत राहून विरोधी पक्षाची भूमिका निभावणाऱ्या शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे. त्यामुळेच भाजपच्या पराभवावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते नेहमीसारखेच तिखट होते.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, "भाजपनं आपल्या मित्रपक्षांशी दुर्व्यवहार केला. त्यामुळे अनेक मित्र NDA सोडून बाहेर पडले. त्यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. 2019 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मोदी आणि राहुल गांधी यांच्यात सामना नव्हे तर कडवी टक्कर होणार आहे. तसंच नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होतील का, हे सांगणं कठीण आहे. 4 राज्यांतल्या लोकांनी पर्याय कोण आहे हे न पाहता दिलेला कौल विचार करायला लावणारा आहे."

गेली चार वर्षं महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेची सत्ता आहे. भाजपचे 122 तर शिवसेनेचे 63 आमदार आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीआधी भाजपने दिलेल्या वागणुकीमुळे शिवसेना दुखावली आहे. आणि त्याची झलक गेल्या 4 वर्षांत अनेकदा पाहायला मिळाली आहे.

शेतकऱ्यांचं आंदोलन, मराठा आंदोलन, शिक्षक भरतीसाठी तरुणांनी पुकारलेला एल्गार, MPSCची तयारी करणाऱ्या मुलांचा संताप, मोदींचा महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेनचा प्रकल्प, समृद्धी महामार्ग, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प अशा अनेक मुद्द्यांवर शिवसेनेनं उघडपणे भाजपला विरोध केला. राजीनामे खिशात घेऊन फिरतो, असं म्हणत शिवसेना नेते भाजपला इशारे देत राहिले.

मुंबईसह 10 महापालिका निवडणुका शिवसेना सत्तेत असूनही भाजपविरोधात लढली. त्यामुळे अनिच्छेनं केलेल्या युतीत शिवसेना खुश नसल्याचं स्पष्ट होतं. पण मोदींना प्रत्येक निवडणुकीत मिळणारं यश पाहता शिवसेनेला धाडसी निर्णय घेणं जमत नव्हतं. त्यामुळे एकीकडे स्वबळाची भाषा आणि दुसरीकडे सत्तेत सहभाग अशी शिवसेनेची अवस्था झाली.

'महाराष्ट्रात भाजपची पंचाईत होईल'

भाजपला महाराष्ट्रात शिवसेनेसोबत युती करणं भाग पडेल, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी दिली. बीबीसी मराठीला त्यांनी या निकालांवर सविस्तर मुलाखत दिली आहे. ते म्हणाले, "या निकालांचा महाराष्ट्रावर थेट परिणाम होणार नसला तरी या वातावरणाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होईल. या दोन पक्षांच्या ताणलेल्या संबंधांमध्ये शिवसेना वरचढ ठरेल आणि भाजपला युतीची गरज भासू शकेल. त्यामुळे भाजपला शिवसेनेसाठी अधिक जागा सोडाव्या लागतील. त्यामुळे भाजपने कमी जागा लढवल्या तर त्यातून जिंकून येणाऱ्या जागा कमी होऊ शकतात. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपची पंचाईत होईल असा या निकालाचा अर्थ आहे."

बार्गेनिंग पॉवर

त्यात पाच राज्यांच्या निमित्तानं साडेचार वर्षांत पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने मोदींचा विजयाचा अश्वमेध रोखण्यात आला आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची साथ हवी असेल तर आता भाजपला "हार्ड बार्गेनिंग" करावं लागणार आहे, अशी चिन्हं आहेत.

ज्येष्ठ राजकीय पत्रकार अभय देशपांडे यांच्या मते, "भाजपसोबत जे मित्रपक्ष होते, त्यांपैकी आता शिवसेना हा एकमेव महत्त्वाचा घटक त्यांच्यासोबत उरला आहे. बाकीचे पक्ष शिवसेनेच्या तुलनेत ताकदीनं लहान आहेत. त्यामुळे आजच्या निकालानंतर शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढणार आहे. शिवसेना आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घ्या, म्हणून भाजपला आग्रह करू शकते. अर्थात याआधीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही निवडणुकांच्या जागावाटपाची बोलणी एकाच वेळी करण्यास आम्ही तयार आहोत, असं सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे शिवसेना आता बेरजेत आहे."

2014ची विधानसभा निवडणूक शिवसेना-भाजप स्वबळावर लढले. मोदींची लाट कायम असतानाही शिवसेनेनं ते धाडस दाखवलं. शिवसेनेनं जिल्हा परिषदा आणि पालिका स्वबळावर लढवल्या. त्यामुळे शिवसेनेनं निवडणुकांची तयारी आधीच सुरू केली आहे. अर्थात राम मंदिर आणि हिंदुत्व या मुद्द्यांवर एकमत असलं तरी कडवं हिंदुत्व शिवसेनेचंच असल्याचं ठसवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौराही केला. राजकीय विश्लेषक जरी शिवसेना-भाजप युती होईल, असं भाकीत वर्तवत असले तरी शिवसेना अजूनही स्वबळाचीच भाषा करत आहे.

संजय राऊत म्हणात, "शिवसेनेनं राष्ट्रीय कार्यकारिणी घेऊन एकला चलो रेचा नारा दिला आहे. गेली दोन वर्षं आम्ही सातत्यानं याबाबत पक्षातील नेते, कार्यकर्ते यांच्याशी बोलत आहोत. त्यामुळे 2014 ला हिंदुत्व आणि राम मंदिरावर आमचं एकमत असतानाही भाजपनं युती तोडली होती. बरं NDAचा सातबारा काही भाजपच्या नावावर नाही. भाजप म्हणजे NDA नव्हे. त्यामुळे आम्ही आमचा मार्ग निवडला आहे."

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पर्यायाने भाजपची लाट या निवणुकांमध्ये ओसरली का?

महाराष्ट्राची सध्याची राजकीय स्थिती पाहता शिवसेना भाजपसोबत जाईल असं काही राजकीय निरीक्षकांना वाटतं. स्वबळाची भाषा हा दबाव वाढवण्याचा प्रयत्न आहे, असं त्यांना वाटतं.

राजकीय निरीक्षक डॉ. श्रीकांत पाटील म्हणतात, "शिवसेना यापुढे ग्रामीण भागातलं आपलं नेटवर्क वाढवण्यावर भर देईल. कारण भाजपनं 2014च्या निवडणुकीत शहरी भागात अधिक पाय पसरले आहेत. गेल्या विधानसभेत मुंबईमध्ये शिवसेनेपेक्षा एक जागा भाजपनं अधिकची जिंकली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठवाडा आणि इतर ग्रामीण भागात प्रभाव वाढवण्यासाठी शिवसेना अधिक प्रयत्न करेल."

गेल्या 4 वर्षांत महत्त्वाच्या मुद्द्यांवर काँग्रेस-राष्ट्रवादी जितकी आक्रमक राहिली, त्यापेक्षा थोडा अधिक कडवा विरोध शिवसेनेनं केला. त्यामुळे शिवसेनेनं सत्तेत राहूनही विरोधी पक्षाची प्रतिमा लोकांच्या मनावर ठसवली.

आघाडीचं आव्हान

दुसरीकडे एकत्रित निवडणुका लढल्याशिवाय अपेक्षित यश मिळणार नाही, याची जाणीव असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी नेतृत्वाने जुळवून घेण्यास सुरुवात केली. आघाडीचे संकेतही दिले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली तर त्यांचं आव्हान पेलण्यासाठी भाजप आणि शिवसेनेवर एकत्र येण्यासाठी दबाव वाढेल.

पाच राज्यांच्या पराभवानंतर भाजपचे अध्यक्ष अमित शाह आणि इतर ज्येष्ठ नेत्यांनी मौन बाळगणं पसंत केलं आहे. मात्र शिवसेनेच्या टीकेवर भाजपचे खासदार अमर साबळे यांनी सावध उत्तर दिलंय: "आत्मपरीक्षण करण्याच्या शिवसेनेच्या सल्ल्याचं भाजप स्वागतच करेल. आणि कुठल्याही पराभवानंतर आत्मपरीक्षण करणं हे स्वाभाविकसुद्धा आहे."

मात्र शिवसेनेनं मांडलेल्या इतर मुद्द्यांना साबळे यांनी स्पर्श केला नाही.

आता लोकसभा निवडणुका अवघ्या 4 महिन्यांवर आहेत. महाराष्ट्र विधानसभा विसर्जित होण्यासाठी 10 महिन्यांचा वेळ आहे. त्यामुळे 5 राज्यातील मतदारांच्या बेडरपणाचं, मतपरिवर्तनाचं अभिनंदन करणारे उद्धव ठाकरे शिवसेनेचं भविष्य कुठल्या वाटेनं घेऊन जातात हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)