श्रीपाद छिंदमः नगरसेवकपद रद्द झालेले हे नेते कोण आहेत?

  • अभिजित करंडे
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
श्रीपाद छिंदम

फोटो स्रोत, facebook/shripad chhindam

फोटो कॅप्शन,

श्रीपाद छिंदम

अहमदनगर महानगरपालिकेतील नगरसेवक श्रीपाद छिंदम यांचं पद रद्द करण्यात आलं आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती विधानपरिषदेत दिली.

श्रीपाद छिंदम कोण आहेत, ते कसे निवडून आले

श्रीपाद छिंदम. अहमदनगर महापालिकेतील भाजपचे माजी उपमहापौर. फेब्रुवारी महिन्यात सफाई कंत्राटदाराशी बोलताना छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढले. महाराष्ट्रभर त्याचे पडसाद उमटले. भाजपनं त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. पोलिसांनी शहरातून तडीपार केलं. मात्र यानंतरही नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत श्रीपाद छिंदम प्रभाग 9 मधून 1900 मतांनी निवडून आले. यामुळे महाराष्ट्रभरातून आश्चर्य व्यक्त होतंय. अर्थात छिंदम कसे निवडून आले? त्याची ही गोष्ट.

श्रीपाद छिंदम पद्मशाली समाजाचे आहेत. अहमदनगर शहरात या समाजाची 15 हजार मतं आहेत. ज्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये छिंदम राहतात, तिथं पद्मशाली समाजाची 2500 हून अधिक मतं आहेत.

स्थानिक पत्रकार शिवाजी शिर्के यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं "छिंदम यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. गुंडगिरी करणारं तरुणांचं टोळकं कायम त्यांच्यासोबत असायचं. पण जेव्हा छिंदम यांनी महाराजांबद्दल अपशब्द काढले, तेव्हा लोकांनी छिंदम यांच्यासोबतच त्यांच्या साथीदारांच्या घरावरही दगडफेक केली.

महाराष्ट्रभर मोर्चे आणि आंदोलनं झाली. छिंदम यांच्यासोबत त्यांच्या साथीदारांनाही नगर सोडावं लागलं. त्यामुळे हा समाज असुरक्षित झाला. छिंदम यांनी पद्मशाली समाजाच्या मनात इतरांबद्दल भीती निर्माण करून त्याचा फायदा घेतला. छिंदम ज्या प्रभाग 9 मधून निवडणूक लढले, तिथं 11 हजार 229 मतं आहेत. त्यात पद्मशाली समाजाची 2500 मतं आहेत."

छिंदम यांच्याविरोधात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि शिवसेना या अशा चारही पक्षांनी उमेदवार दिले होते. अर्थात भाजपनं नगरची निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने मुख्यमंत्र्यांपासून, केंद्रीय मंत्र्यांपर्यंत अनेक नेते प्रचाराला आले.

मात्र कुणीही छिंदम प्रकरणावर भाष्य केलं नाही. तर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही निवडणूक स्थानिक नेतृत्वावर सोपवली. ज्यांनी छिंदम प्रकरण बाजूला ठेवणं पसंत केलं.

शिवाजी शिर्के यांच्या मते "खरंतर छिंदम निवडणुकीपर्यंत पोहोचलेच नसते. कारण छिंदम यांचं नगरसेवकपद रद्द करून त्यांना निवडणूक लढवण्यापासून दूर ठेवावं अशी मागणी सभागृहात झाली. त्याविरोधात छिंदम यांनी नगरविकास राज्यमंत्र्यांकडे अपील केलं. मंत्री रणजित पाटील यांनी सुनावणीही घेतली. मात्र छिंदम प्रकरणावरचा निकाल 3 महिने लटकवून ठेवला. तोवर निवडणूक आली, आणि छिंदम पुन्हा राजकीय आखाड्यात. भाजप याला जबाबदार आहे असं मला वाटतं."

मतदाना आधीच छिंदम यांनी आपण निवडून येणार हे माध्यमांना छातीठोकपणे सांगितलं होतं. आणि या आत्मविश्वासामागे कारण होतं अहमदनगरचं राजकारण.

फोटो स्रोत, facebook/shripad chhindam

फोटो कॅप्शन,

निवडणूक जिंकल्यानंतर छ.शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करताना श्रीपाद छिंदम.

राजकीय निरीक्षकांच्या मते छिंदम यांनी महाराजांबद्दल अपशब्द काढल्यानंतर मुख्य राजकीय पक्षांनी त्याविरोधात आंदोलनं, मोर्चे काढले. त्यावेळी राजकीय फायदा डोळ्यासमोर होता.

मात्र अहमदनगरमध्ये विधानसभा किंवा लोकसभेवर निवडून यायचं असेल तर पद्मशाली समाजाची 15 हजार मतंही तितकीच महत्त्वाची आहेत. त्यामुळे एकट्या छिंदम प्रकरणाभोवती प्रचार केंद्रीत करणं, पद्मशाली समाजाला असुरक्षित करणं धोकादायक होतं.

आता एकदा छिंदम यांच्या प्रभाग 9 मधील उमेदवारांना पडलेल्या मतांवर नजर टाकूयात. इथं भाजपच्या प्रदीप परदेशींना 2561 मतं मिळाली. शिवसेनेच्या सुरेश तिवारींना 1613 मतं, मनसेच्या पोपट पाथरे यांना 1425, तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या अनिता राठोड यांना फक्त 715 मतं मिळाली. तर श्रीपाद छिंदम यांना 4532 मतं मिळाली. म्हणजे छिंदम यांना पद्मशाली समाजासह इतर समाजातील मतदारांनीही मतदान केल्याचं स्पष्ट आहे.

स्थानिक पत्रकार शिवाजी शिर्के यांच्या मते "श्रीपाद छिंदमच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती असतानाही सर्व पक्षातील नेत्यांनी मदत केली. सुरुवातीला ते काँग्रेस आणि नंतर शिवसेनेत होते. या काळात जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारातून त्यांनी मुबलक पैसाही कमावला. पण महाराजांबद्दल अपशब्द काढल्यानंतर त्यांना राजकीय पक्ष आणि नेत्यांनी दूर केलं. छिंदम यांनी वैयक्तिक संकटाची भीती समाजाच्या मनात घातली. भीतीलाच शस्त्र बनवलं. पद्मशाली समाजही असुरक्षित भावनेमुळे छिंदम यांच्या पाठिशी उभा राहिला."

सार्वमतचे स्थानिक पत्रकार अनंत पाटील यांनीही छिंदम प्रकरणावर बीबीसीशी बोलताना म्हटलं की, "राजकीय पक्ष बाहुबलींना उमेदवारी देतात. कारण त्यांच्यासह निवडणूक जिंकणं सोपं जातं. छिंदम यांच्या बाबतीतही तेच झालं. आधी इतर पक्षांनीही छिंदम यांना मदत केली आहे. पण जेव्हा ते वादग्रस्त ठरले, तेव्हा त्यांना अंतर दिलं मात्र पद्मशाली समाज एकवटल्याने आणि इतरांनीही छिंदम यांना साथ दिल्याने त्यांचा विजय झाला"

अर्थात या सगळ्या आरोपांवर बीबीसीशी बोलताना छिंदम यांनी "माझ्यावर गुन्हेगारीचे आणि इतर आरोप करणाऱ्यांबद्दल मला काहीच बोलायचं नाही. त्यांच्याबद्दल मला राग, द्वेष किंवा इतर कुठलीही भावना नाही. मी माझ्या प्रचारासाठी अहमदनगरमध्येही नव्हतो. तरीही मला जनतेनं निवडून दिलं आहे. त्यामुळे हा जनतेचाच विजय आहे," असं म्हटलंय.

हेसुद्धा वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)