कर्नाटकात मंदिरात जेवणातून विषबाधा; 11 मृत्युमुखी

मंदिर Image copyright ANURAG BASAVARAJ

कर्नाटकातील चामराजनगर येथील मारम्मा मंदिरात अन्नातून झालेल्या विषबाधेत 11 लोकांना जीव गमवावा लागला आहे. तर प्रकृती बिघडलेल्या 70 जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यातील 11 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

या संदर्भात 2 जणांना अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी बीबीसीला दिली. हा प्रकार अन्नातून विषबाधेचा असावा, अशी माहिती एका आरोग्य अधिकाऱ्याने दिली आहे.

या मंदिरात एका कार्यक्रमानंतर भाविकांना जेवण देण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित एका व्यक्तीने त्यांना टोमॅटो राईस दिला असल्याची माहिती दिली. ते म्हणाले, "या जेवणातून वास येत होता. ज्यांनी हे जेवण फेकून दिले, त्यांची प्रकृती चांगली आहे. पण ज्यांनी ते खाल्लं त्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाला."

"मंदिरामध्ये अभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यासाठी शेजारच्या गावांमधील लोकही येथे आले होते," असे एका उपस्थिताने सांगितले. या घटनेवर समाज माध्यमांमध्ये प्रतिक्रिया उमटत आहेत.

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री कुमार स्वामी यांनी हॉस्पिटलला भेट देऊन रुग्णांची चौकशी केली.

Image copyright ANURAG BASAVARAJ
प्रतिमा मथळा कुमार स्वामी यांनी हॉस्पिटलला भेट देऊन विचारपूस केली

पोलीस महानिरीक्षक एच. सी. शरत चंद्र यांनी मृतांत 3 महिलांचा समावेश असल्याचं सांगितलं.

घटनास्थळावरून अन्नाचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे हे अन्न खाल्याने कावळे मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे अन्नात कीटकनाशक मिसळले गेले का अशी शंका व्यक्त होत आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)