IPL 2019 : लिलावाविषयी जाणून घ्यावेत असे 6 मुद्दे

आयपीएल 2019 Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा शे होप

IPL 2019साठी जयपूरमध्ये आज पुन्हा लिलाव होत आहे. दुपारी अडीच वाजता लिलावाची ही प्रक्रिया सुरू होईल. जगभरात ट्वेन्टी-20 लीगमध्ये दमदार प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना आपल्या ताफ्यात समाविष्ट करण्यासाठी संघ उत्सुक आहेत.

जगभर उत्साहाने पाहिल्या जाणाऱ्या या स्पर्धेबद्दल जाणून घ्यावे असे हे 6 मुद्दे :

1. IPL साठी पुन्हा लिलाव कशाला?

यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीलाच झालेल्या लिलावानंतर आयपीएल संघांची पुनर्रचना झाली. बहुतांशी संघांचा गाभा पक्का आहे. बॅटिंग तसंच बॉलिंगमध्ये वैविध्य आणण्याच्या दृष्टीने सगळे संघ प्रयत्न करणार आहेत. पुढच्या वर्षी वनडे वर्ल्डकप मे-जून या काळात होणार आहे. IPLनंतर खेळाडूंना विश्रांती मिळावी, जेणे करून वर्ल्डकपसाठी ते नव्या दमाने तयार असतील असा आयोजकांचा विचार आहे.

2. आयपीएल 2019 कुठे होणार?

यंदाची IPL स्पर्धा भारतात होणार का? याविषयी साशंकता आहे. पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. निवडणुका आणि आयपीएल एकाच कालावधीत होणं सुरक्षायंत्रणेसाठी आव्हानात्मक ठरू शकतं. म्हणूनच IPL स्पर्धेच्या आयोजनासंदर्भात अनेक पर्याय आहेत. IPL 2019 दक्षिण आफ्रिकेत आयोजित होऊ शकते किंवा स्पर्धेचा पहिला टप्पा भारतात आणि दुसरा टप्पा संयुक्त अरब अमिराती येथे आयोजित होऊ शकतो. मात्र यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा IPL प्रशासनाने केलेली नाही.

3. विदेशी खेळाडूंची उपलब्धता?

IPL स्पर्धेनंतर लगेचच वर्ल्डकप होणार असल्याने बहुतांशी बोर्डांनी खेळाडूंच्या उपलब्धतेवर मर्यादा आणल्या आहेत. IPL स्पर्धेत सहभागी होणारे अनेक विदेशी खेळाडू स्पर्धेच्या उत्तरार्धात मायदेशी परतणार आहेत. संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध असणाऱ्या खेळाडूंना प्राधान्य मिळू शकते. न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान वगळता अन्य बोर्डांनी खेळाडूंना राष्ट्रीय संघासाठी खेळण्याला प्राधान्य देण्याची सूचना करण्यात आली आहे.

4. किती खेळाडूंचा लिलाव होणार?

या लिलावासाठी हजारहून अधिक खेळाडूंनी नोंदणी केली होती. बीसीसीआयच्या चाळणीनंतर लिलावासाठी 346 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यामध्ये 228 भारतीय खेळाडू आहेत. कॅप्ड खेळाडूंची संख्या 119 आहे तर अनकॅप्ड खेळाडू 229 आहेत. दोन खेळाडू असोसिएट देशांचं प्रतिनिधित्व करत आहेत.

5. बेस प्राईसच्या निमित्ताने

केवळ 10 खेळाडूंना 2 कोटी बेसप्राईस मिळाली आहे. लसिथ मलिंगा, ब्रेंडन मॅक्क्लुम, कोरे अँडरसन, सॅम करन, कॉलिन इन्ग्राम, शॉन मार्श, अँजेलो मॅथ्यूज, डी आर्की शॉर्ट, ख्रिस वोक्स, इऑन मॉर्गन यांना ही किंमत मिळाली आहे.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा भारताविरुद्ध चांगली कामगिरी करणारा सॅम करन
बेस प्राईस एकूण खेळाडू भारतीय खेळाडू विदेशी खेळाडू
2 कोटी 10 - 10
1.5 कोटी 10 1 9
1 कोटी 19 4 15
75 लाख 18 2 16
50 लाख 62 18 44

6. कोणत्या संघाकडे किती पैसे?

गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने संघाचा गाभा कायम राखत फारसे बदल केलेले नाहीत. म्हणूनच या लिलावात चेन्नईला केवळ तीन खेळाडूंची आवश्यकता आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाइट रायडर्स संघाला महत्त्वपूर्ण खेळाडूंची भर घालायची आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचं नामकरण दिल्ली कॅपिटल्स असं झालं आहे. दिल्लीने पुन्हा एकदा संघाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी लिलाव महत्त्वाचा आहे.

संघ आतापर्यंत खर्च केलेली रक्कम लिलावासाठी हातात असलेली रक्कम
चेन्नई सुपर किंग्स 73.6 कोटी 8.4 कोटी
किंग्ज इलेव्हन पंजाब 45.8 कोटी 36.20 कोटी
मुंबई इंडियन्स 70.85 कोटी 11.15 कोटी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 63.85 कोटी 18.15 कोटी
राजस्थान रॉयल्स 61.05 कोटी 20.95 कोटी
सनरायझर्स हैदराबाद 72.3 कोटी 9.7 कोटी
कोलकाता नाइट रायडर्स 66.8 कोटी 15.2 कोटी
दिल्ली कॅपिटल्स 56.5 कोटी 25.5 कोटी

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)