नसीरुद्दीन शाह : इंस्पेक्टरपेक्षा गायीच्या मृत्यूला जास्त महत्त्व

नसीरुद्दीन शाह Image copyright AFP

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. मला माझ्या मुलांची काळजी वाटते - नसीरुद्दीन शाह

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी केलेल्या एका वक्तव्याने नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

"आजच्या भारताची स्थिती पाहाता मला माझ्या मुलांची काळजी वाटते. माझी मुलं संतप्त जमावाकडून घेरली जातील आणि तुम्ही हिंदू की मुस्लीम असा प्रश्न त्यांना विचारला जाईल, आमच्या मुलांना आम्ही कोणतंही धार्मिक शिक्षण दिलं नसल्यामुळे त्यांना काहीच उत्तर देता येणार नाही", असं मत नसीरुद्दीन शाह यांनी भारतातल्या सद्यस्थितीबद्दल मांडलं आहे.

भारतीय समाजात सध्या विष पसरलं असून हा राक्षस पुन्हा बाटलीत बंद करणं कठीण होईल, असंही ते म्हणाले आहेत. बुलंदशहरमध्ये झालेल्या घटनेबाबत बोलताना ते म्हणाले, पोलीस अधिकाऱ्याच्या मृत्यूपेक्षा आपल्या देशात गायीच्य मृत्यूला जास्त महत्त्व आल्याचं आपण आधीच पाहिले आहे. इंडिया टुडेनं हे वृत्त दिलं आहे.

2. मिठीबाई कॉलेजमध्ये चेंगराचेंगरी

मुंबईमधील मिठीबाई कॉलेजमध्ये एका कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत 8 विद्यार्थी जखमी झाले आहेत. यामध्ये 2 मुलींचा समावेश आहे.

कॉलेजचा वार्षिक कार्यक्रम सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. महाराष्ट्र टाइम्सनं संदर्भातलं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. सभागृहाच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवेशिका वाटल्यामुळे गर्दी वाढली असा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला आहे.

कॉलेजच्या बीएमएस विभागाकडून कॉलेजियम या सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामध्ये रॅप गायकांचा एक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. प्रवेशिका नसतानाही काही मुलांनी कार्यक्रमात घुसखोरी केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

Image copyright AFP

3. पाच दिवस बँकांचे कामकाज बंद

संप, साप्ताहिक सुट्या, सण यामुळे बँकांचं कामकाज 5 दिवसांसाठी ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 21 डिसेंबर (शुक्रवार) रोजी बँक अधिकाऱ्यांचा संप, त्यानंतर 22, 23 डिसेंबर रोजी चौथा शनिवार आणि रविवारची सुटी असेल.

24 डिसेंबर म्हणजे सोमवारी नियमित कामकाज होईल आणि त्यानंतर पुन्हा 25 तारखेला नाताळची सुटी असेल. 26 डिसेंबर रोजी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने संपाची हाक दिली आहे.

21 तारखेचा संप केवळ अधिकाऱ्यांचा असल्याने बँका बंद राहाण्याची शक्यता कमी आहे. मात्र त्यामुळे कामकाजावर परिणाम होईल. महाराष्ट्र टाइम्सनं याबाबत वृत्त दिलं आहे.

Image copyright Reuters

4. कांदा उत्पादकांना क्विंटलमागे 200 रुपये अनुदान

कांद्याचे भाव घसरल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने क्विंटलमागे 200 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2018 या कालावधीमध्ये नवी मुंबई वगळता वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये विक्री झालेल्या सुमारे 75 लाख क्विंटल कांद्यासाठी हे अनुदान दिलं जाणार आहे.

शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सुमारे 40 हजार रुपयांपर्यंत ही मदत मिळणार आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर दीडशे कोटी रुपयांचा ताण पडणार आहे. लोकसत्ताने याबाबत अधिकवृत्त दिलं आहे.

Image copyright AFP

5. पासवान पितापुत्रा भेटणार जेटलींना

गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवरून भाजपावर नाराजी व्यक्त करणाऱ्या रामविलास पासवान आणि चिराग पासवान यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतल्यावर आता केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आज शुक्रवारी लोकजनशक्ती पार्टीचे हे दोन्ही नेते अरुण जेटली यांची भेट घेतील. पासवान यांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी जेटली यांच्याकडे देण्यात आल्याचं सांगण्यात येतं. तसंच बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमारही आज दिल्लीमध्ये असणार आहेत.

गुरुवारी बिहारमध्ये एनडीएविरोधात तेजस्वी यादव, जीतनराम, शरद यादव यांच्याबरोबर उपेंद्र कुशवाहा यांनीही हातमिळवणी केल्यामुळे या भेटींचं महत्त्व वाढलं आहे. इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)