सोनिया गांधी यांचं नाव गुगलमध्ये 'Bar girl in India' सर्च केल्यावर का पुढे येतं?

सोनिया गांधी

फोटो स्रोत, Getty Images

या आठवड्यात अमेरिका, भारत आणि पाकिस्तानमध्ये दोन नेत्यांच्या गुगल सर्च रिझल्टनी बातम्यांमध्ये स्थान मिळवले.

गुगलवर 'Idiot' असे टाइप करुन शोधल्यास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रंप यांचे आणि 'Bhikari' असे टाइप केल्यास पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे नाव येत असल्याचा दावा शेकडो यूजर्सनी ट्वीटर आणि फेसबूकवर केला आहे.

अशाच प्रकारच्या काही पोस्ट्स भारतात बुधवारपासून दिसू लागल्या आहेत. गुगल सर्च इंजिनवर 'Italian Bar girl' सर्च केल्यास काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव रिझल्ट्समध्ये प्रथम दिसू लागले आहे.

हे केवळ गुगल सर्च इंजिनवर दिसत नसून बिंग सर्च इंजिनवरही दिसत असल्याचा दावा काही लोकांनी केला आहे.

सोनिया गांधींचे नाव सर्चमध्ये का आले?

'Bar girl in India' सर्च केल्यावर सोनिया गांधी यांचे नाव कसे येऊ लागले असा प्रश्न काही लोकांनी उपस्थित केला आहे.

फोटो स्रोत, Alamy

ज्या की-वर्डसना जोडून यूजर कोणत्याही नेत्याचे नाव सर्च करतो तेव्हा त्याचा परिणाम सर्च रिझल्टवर होतो असे गूगलने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर स्पष्ट केले होते.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांनंतर सोनिया गांधी यांच्याविरोधात सोशल मीडियावर एक मोहीम चालविण्यात आली. सोनिया गांधी या गांधी परिवारात येण्यापूर्वी बार डान्सर होत्या असा दावा उजव्या विचारसरणीच्या लोकांनी फेसबूक पेजेस आणि ग्रुप्समध्ये केला होता.

हा दावा सिद्ध करण्यासाठी काही छायाचित्रेही प्रसिद्ध करण्यात आली होती.

काही फेसबूक यूजर्सनी तर, जर या फोटोंची सत्यता तपासायची असेल तर आहे तर 'Italian Bar girl in India' सर्च करा म्हणजे आपल्याला समजेल असंही लिहून ठेवलं आहे. मायक्रोब्लॉगिंग संकेतस्थळ कोरावरही याच्याशी संबंधित प्रश्नावर पोस्ट करण्यात आले आहे.

फोटो स्रोत, GOOGLE TRENDS

या गोष्टीची सत्यता पडताळण्यासाठी ज्या लोकांनी सोनिया गांधी यांच्या नावासह 'bar', 'India', 'girl' और 'Italian' असे की-वर्ड वापरले असतील त्यांच्या रिझल्ट्समध्ये सोनिया गांधी यांचे नाव येण्याची शक्यता वाढली असेल असे इंटनेटच्या अल्गोरिदमबद्दल माहिती असणारे लोक मानतात.

सोनिया गांधी यांची बनावट छायाचित्रे

अशाच प्रकारचे काही फोटो प्रसिद्ध करून त्यांचा दाखला देत राहुल गांधी यांच्याविरोधात अनुचित टिप्पणी करण्यात आली होती. या पोस्टच्या मुख्य छायाचित्रामध्ये सोनिया गांधी एका नेत्याच्या मांडीवर बसलेल्या दाखवण्यात आल्या होत्या. त्याची चौकशी करण्याचा प्रयत्न करता त्याचे उत्तर सापडण्यास वेळ लागला नाही.

फोटो स्रोत, FACEBOOK VIRAL POST

2005 साली एएफपी आणि गेटी इमेजेस या फोटो एजन्सीसाठी छायाचित्रकार प्रकाश सिंह यांनी हा फोटो काढला होता.

29 मार्च 2005 साली मालदीव तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन गयूम भारतात आले होते. तेव्हा त्यांनी यूपीएच्या अध्यक्षा आणि तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली होती. ही भेट दिल्लीमध्ये झाली होती.

फोटो स्रोत, Getty Images

खोट्या छायाचित्रांमध्ये ज्या व्यक्तीच्या मांडीवर सोनिया गांधी बसलेल्या दाखवल्या जात आहेत ती व्यक्ती अब्दुल्ला यामीन अब्दुल गयूमच आहेत.

याचप्रकारे 1955 साली आलेल्या एका सिनेमाच्या पोस्टरवरील हॉलीवूड अभिनेत्री मर्लिन मन्रोचा फोटो एडिट करुन त्याला सोनिया गांधींचा फोटो करण्यात आला आहे. तसेच त्यावर सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याविरोधात अनुचित टिप्पणी करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

मर्लिन मन्रोच्या चेहऱ्याच्या जागी सोनिया गांधी यांचा चेहरा लावण्यात आला.

तसेच काही इतर मुलींचे फोटो टाकून ते सोनिया गांधी यांचे असल्याचे सांगूनही काही पोस्ट्स ट्वीटरवर करण्यात आल्या आहेत.

काही लोकांनी तर सोशल मीडियावर, "सोनिया गांधी कधीकाळी बार डान्सर असल्या तरी त्याने काय फरक पडणार आहे? हे जाणूनबुजून चारित्र्यहनन केल्यासारखे आहे." असं लिहिलं आहे.

फोटो स्रोत, @IIII_ROHIT_IIII

भारतीय जनता पार्टीचे काही नेते सोनिया गांधी या मूळच्या परदेशातील असल्याच्या मुद्द्यावरुन प्रश्न उपस्थित करत आले आहेत. तर काँग्रेस पक्षाने अशा प्रश्नांवर नेहमीच टीका केली आहे. सोनिया गांधी यांच्या खोट्या छायाचित्रांचा वापर याआधीही राजकारणात केला गेला आहे. त्या बार डान्सर होत्या हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)