राष्ट्रवादी काँग्रेसनं केला उत्पन्नापेक्षा जास्त खर्च, पक्षांच्या निधीचा स्रोत काय?

  • गणेश पोळ
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
शरद पवार

फोटो स्रोत, Getty Images

राजकीय पक्षांचा बराचसा खर्च हा लोकांनी दिलेल्या देणग्यांवर चालतो. त्यामुळे लोकांकडून मिळालेला पैसा कसा आणि कुठे खर्च केला जातो याची माहिती सार्वजनिक करणं महत्त्वाचं ठरतं.

ADR (Association for Democratic Reforms) या संस्थेच्या विश्लेषणानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं गेल्या आर्थिक वर्षांत एकूण उत्पन्नापेक्षा जास्त खर्च केल्याचं दिसून आलं आहे.

2017-18 या आर्थिक वर्षात राष्ट्रवादीचं उत्पन्न 8.15 कोटी रुपये इतकं होतं, तर पक्षाचा एकूण खर्च 8.84 कोटी रुपये म्हणजे एकूण उत्पन्नापेक्षा 69 लाख रुपये जास्त आहे.

याबाबत आम्ही राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना विचारणा केली.

"ज्या वर्षात पक्षाचं उत्पन्न कमी असेल त्या वर्षी पक्षाकडे जमा असलेल्या डिपॉझिटमधून खर्च करण्यात येतो. मागच्या वर्षीची पक्षाची जी सेव्हिंग आहे त्यातून हा खर्च झाला आहे," मलिक यांनी स्पष्टिकरण दिलं.

पण यामुळे लोकांमध्ये वेगळा संदेश जातो का असा पुढचा प्रश्न नबाव मलिक यांना विचारला.

त्यावर मलिक सांगतात, "पक्षाचा मागच्या 19 वर्षांचा एतिहास आहे. मागचं जे काही इन्कम आहे, त्यातील काही रक्कम सेव्हिंग असते, काही डिपॉझिट असते आणि त्यातून हा खर्च झालेला आहे."

काँग्रेसनं ऑडिट रिपोर्ट सादर केला नाही

राजकीय पक्षांनी त्यांचं आर्थिक उत्पन्न आणि खर्चाचा ऑडिट रिपोर्ट भारतीय निवडणूक आयोगाकडे जमा करणं, आयोगानं नोव्हेंबर 2014पासून बंधनकारक केलं आहे.

राजकीय पक्षांच्या वार्षिक जमा खर्चात पारदर्शकता आणण्यामागे हे एक महत्त्वाचं पाऊल आहे, असं ADR संस्थेचं मत आहे.

तसंच पक्षांच्या आर्थिक जमा-खर्चाची माहिती RTIच्या अखत्यारित आणावी, अशी ADR आणि इतर सामाजिक संस्था मागणी करत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

काँग्रेस पक्षानं मात्र 2017-18 मधल्या जमा खर्चाबाबतचा ऑडिट रिपोर्ट अजूनपर्यंत निवडणूक आयोगाकडे सोपवलेला नाही. ऑडिट रिपोर्ट आयोगाकडे पाठवायची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर होती.

याबाबत आम्ही काँग्रेस पक्षाचे खजिनदार खा. अहमद पटेल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही. याशिवाय खासदार अशोक चव्हाण यांना संपर्क साधण्यात आला असता ते व्यग्र आहेत, असं सांगण्यात आलं.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं की, याबाबत मला काही माहिती नाही. माहिती घेऊन कळवतो.

यानंतर आम्ही 22 ऑक्टोबरला राहुल गांधी यांच्या कार्यालयाला मेल करून याबाबत विचारणा केली. अजूनपर्यंत त्यांच्याकडून काहीएक प्रतिसाद मिळालेला नाही. काँग्रेस कार्यालयाकडून प्रतिक्रिया आल्यास ती इथे समाविष्ट करण्यात येईल.

काय सांगतो अहवाल?

Association for Democratic Reforms (ADR) या संस्थेनं नुकतंच 2017-18 या आर्थिक वर्षात राष्ट्रीय पक्षांच्या जमा-खर्चाचं विश्लेषण केलं आहे. राष्ट्रीय पक्षांनी भारतीय निवडणूक आयोगाला दिलेल्या ऑडिट रिपोर्टमधल्या माहितीच्या आधारावर हे विश्लेषण आहे.

फोटो स्रोत, BJP

देशात एकूण 7 राष्ट्रीय पक्ष आहेत आणि अनेक प्रादेशिक पक्षं आहेत. राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या उत्पन्नापैकी 86.9% (1041.80 कोटी रुपये) पैसा हा देणग्यांतून आला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात electoral bonds ची घोषणा केली होती. पण 2017-18 या आर्थिक वर्षात केवळ भाजपने electoral bondsद्वारे 210 कोटी रुपये मिळाल्याचं जाहीर केलं आहे.

पक्षांचे प्रमुख आर्थिक स्त्रोत कुठले?

भाजपला मिळणारं जवळजवळ सर्वच उत्पन्न म्हणजे 989.707 कोटी रुपये (एकूण उत्पन्न 1027.333 कोटी रु.) हे लोकांनी दिलेल्या देगण्यातून मिळालं आहे. याव्यतिरिक्त बँकेकडून ठेवींवर मिळणारं व्याज आहे.

फोटो स्रोत, Getty Images

देणग्यांमध्ये electoral bonds, आजीवन सहयोग निधी, वयक्तिक देणगी, मोर्चा आणि सभेसाठी दिलेल्या देणग्या, तसंच आमदार आणि खासदारांनी दिलेल्या देणग्या यांचा समावेश आहे.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं या वर्षीचं 42.331 कोटी रुपये उत्पन्न हे पक्षाच्या सभासद फीद्वारे आलेलं आहे. तर देणग्यांतून पक्षानं 39 कोटी रुपये उभारले आहेत.

पक्षांचा सगळ्यांत जास्त खर्च कशावर होतो?

भाजपने सर्वांत जास्त खर्च निवडणूक आणि प्रचारावर केला आहे. हा खर्च एकूण उत्पन्नाच्या निम्मा म्हणजे 567.43 कोटी रुपये इतका आहे.

याव्यतिरिक्त पक्षाच्या प्रशासनावर खर्च झाला आहे.

भाजप व्यतिरिक्त इतर राष्ट्रीय पक्षांनी त्यांचा बराचसा खर्च हा पक्षाच्या प्रशासनावर खर्च होत असल्याचं दाखवलं आहे.

भाजप सर्वात श्रीमंत पक्ष

देशातल्या एकूण 7 राष्ट्रीय पक्षांचं गेल्या आर्थिक वर्षातलं उत्पन्न 1198 कोटी रुपये आहे. त्यापैकी जवळजवळ 85% म्हणजे तब्बल 1027 कोटी रुपये उत्पन्न हे एकट्या भाजपचं आहे.

देशात सध्या एकूण 7 राष्ट्रीय पक्ष आहेत.

1.भारतीय जनता पक्ष (BJP)

2.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC)

3.बहुजन समाज पक्ष (BSP)

4.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP)

5.भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI)

6.भारतीय कम्युनिस्ट पक्ष - मार्क्सवादी (CPI-M)

7.अखिल भारतीय त्रुणमुल पक्ष (AITC)

तर प्रादेशिक पक्षांमध्ये आम आदमी पक्ष, शिवसेना, मनसे, समाजवादी पक्ष, AIDMK, DMK, TRS अशा अनेक पक्षांचा समावेश होतो.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)