पावडर लावल्यानं खरंच कॅन्सर होतो का?

  • भूमिका राय
  • बीबीसी प्रतिनिधी
पावडर

फोटो स्रोत, AFP

पावडर लावल्यानं आपण गोरं होतो ना? मग कॅन्सरचा विषय आला कुठून?

ही बाब ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल कारण बहुतेक सर्वजण पावडर लावतात. पण या पावडरमुळे कॅन्सर होऊ शकतो, असा विचार कुणी करण्याची शक्यता कमीच आहे.

जॉन्सन आणि जॉन्सन कंपनीच्या बेबी पावडरशी संबंधित असे अनेक दावे करण्यात आले आहेत की, या पावडरच्या वापरामुळे गर्भाशयाचा कॅन्सर होऊ शकतो.

जॉन्सन आणि जॉन्सन कंपनीची पावडर वापरल्यामुळे मला गर्भाशयाचा कॅन्सर झाला आहे, असा आरोप एका अमेरिकन महिलेनं केला आहे.

यानंतर कॅलिफोर्नियाच्या एका न्यायालयानं या कंपनीला जवळपास 27 अब्ज रुपयांचा दंड ठोठावला आहे.

या प्रकरणी निकाल देताना न्यायाधीशांनी म्हटलं आहे की, "या पावडरमध्ये अॅस्बेस्टॉसचा वापर केला जातो. पण कंपनीनं याच्या दुष्परिणामाबद्दल वापरकर्त्यांना सांगितलं नाही."

हजारो महिलांचे आरोप

पण हे काही एकमेव प्रकरण नाही.

न्यूजर्सीमधल्या जॉन्सन आणि जॉन्सनच्या मुख्यालयात अनेक महिलांनी दावा केला आहे की, ही पावडर लावल्यामुळे त्यांना गर्भाशयाचा कॅन्सर झाला आहे.

गुप्तांगांमधील घामाला सुकवण्यासाठी त्या ही पावडर वापरत होत्या. त्यानंतर त्यांना या समस्येला समोर जावं लागलं, असा या महिलांचा दावा आहे.

कंपनीनं मात्र या सर्व आरोपांना फेटाळलं आहे. पण आता भारतातही पावडरच्या वापराचे परिणाम दिसून येत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निर्देशानुसार, जॉन्सन आणि जॉन्सन कंपनीच्या पावडरची गुणवत्ता तपासण्यासाठी 100हून अधिक ड्रग्स इन्स्पेक्टरची नेमणूक करण्यात आली आहे.

हे इन्स्पेक्टर कंपनीची देशभरातील कार्यालयं, होलसेलर्स आणि वितरकांकडून पावडरचे नमुने गोळा करतील. नंतर या नमुन्यांची तपासणी करण्यात येणार आहे, असं टाइम्स ऑफ इंडिया आणि इतर मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे.

या प्रकरणी आम्ही केंद्रीय औषधी मानक नियंत्रण संघटनेकडे विचारणा केली तेव्हा त्यांनी हे मान्य केलं की, संबंधित प्रकरण त्यांना माहिती आहे. पण त्यांनी कारवाईबद्दल बोलण्यास नकार दिला.

न्यूज एजन्सी रॉयटर्सनं चौकशी संबंधित रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, पावडरमध्ये अॅस्बेस्टॉस आहे हे गेल्या कित्येक दशकांपासून जॉन्सन आणि जॉन्सनला माहिती होतं.

खरंच कॅन्सर होऊ शकतो का?

टॅल्कम पावडर गुप्तांगांना लावल्यामुळे गर्भाशयाचा कॅन्सर होतो, ही बाब अनेक वर्षांपासून चिंतेचा विषय बनली आहे. पण या बाबीची पुष्टी करण्यासाठी सबळ पुरावे नाहीत.

आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थानांनुसार, गुप्तांगांवर टॅल्कम पावडर वापरल्यास कॅन्सर होऊ शकतो. या टॅल्कम पावडरमध्ये अॅस्बेस्टॉस असतं आणि यामुळे कॅन्सर होतो.

1970च्या दशकापासून बेबी पावडर आणि इतर सौंदर्य प्रसाधनांमध्ये ऍस्बेस्टस मुक्त अभ्रकचा वापर केला जातो.

जननेंद्रियांवर टॅल्कम पावडर लावल्यामुळे गर्भाशयाचा कॅन्सर होण्याची चिंता अनेकदा व्यक्त करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिचर्स ऑन कॅन्सरच्या उपलब्ध पुराव्यांनुसार गुप्तांगांवर टॅल्कम पावडरचा वापर करण्याला कॅन्सरच्या श्रेणीत ठेवण्यात आलं आहे.

"जवळपास सर्वच प्रकारच्या पावडरमध्ये अॅस्बेस्टॉस असतं आणि अॅस्बेस्टॉस अधिक प्रमाणात शरीरात गेलं तर कॅन्सर होऊ शकतो," असं सर गंगाराम हॉस्पिटलमधील त्वचा रोगतज्ज्ञ डॉ. रोहित बत्रा यांचं म्हणणं आहे.

"कोणत्याही एका पावडरच्या प्रकाराचं नाव घेणं उचित ठरणार नाही. बहुतेकदा पावडरच्या वापराचं प्रमाण कमी असतं. अशावेळी कॅन्सर होणं दुर्मिळ असतं. पण कुणी पावडरचा वापर अधिक करत असेल तर यामुळे कॅन्सरची शक्यता वाढू शकते.

यामुळे सर्वांत महत्त्वाचं म्हणजे पावडरचा संतुलित वापर करायला हवा आणि अंघोळ करताना जिथं पावडर लावली आहे त्या शरीराच्या भागाला चांगल्या प्रकारे स्वच्छ करायला हवं," बत्रा सांगतात.

कंपनीचा दावा

जॉन्सन आणि जॉन्सन कंपनीची पावडर वापरल्यामुळे गर्भाशयाचा कॅन्सर होतो, असं न्यूज एजन्सी रॉयटर्सचा रिपोर्ट आणि अनेक महिलांनी म्हटलं आहे. कंपनीनं मात्र ही बाब फेटाळून लावली आहे.

रॉयटर्सचा रिपोर्ट पूर्णपणे एकांगी आहे आणि जॉन्सन आणि जॉन्सन कंपनीची पावडर संपूर्णरित्या सुरक्षित आणि अॅस्बेस्टॉस फ्री आहे, असं कंपनीनं बीबीसीला पाठवलेल्या मेलमध्ये स्पष्ट केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

1 लाख महिला आणि पुरुषांवरील अध्ययनानंतर पावडर पूर्णत: सुरक्षित असल्याचा कंपनीनं दावा केला आहे. या संबंधीच्या अभ्यासाचा अहवालही रॉयटर्सला पाठवला आहे, असं कंपनीनं म्हटलं आहे.

कंपनीनं पावडर सुरक्षित आहे असा दावा केला आहे कारण...

1. या पावडरचा वापर अनेक वर्षांपासून केला जात आहे.

2. ही पावडर सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय आहे.

3. या पावडरशी संबंधित स्वतंत्र अभ्यास करण्यात आला आहे.

4. या अभ्यासानुसार, या पावडरमुळे कॅन्सर होण्याची शक्यता नाही.

पावडरचा वापर धोकादायक?

प्रत्येक कंपनी स्वत:च्या पद्धतीनं पावडर बनवत असते. एखाद्या कंपनीच्या पावडरमध्ये एखादं तत्व अधिक असू शकतं तर एखाद्या कंपनीच्या पावडरमध्ये दुसरं एखादं तत्व अधिक असू शकतं.

पावडर बनवण्यासाठी सर्वसाधारपणे सिलिकॉन डायऑक्साईड, मॅग्नेशियम ऑक्साईड, आयर्न ऑक्साईड, अल्युमिनियम ऑक्साईड, जिंक आक्साईड, बेंजॉन आणि कॅल्शियम कॉर्बोनेट यांचा वापर होतो. याशिवाय ऑरगॅनिक आईलचाही वापर केला जातो.

सामान्य भाषेत सांगायचं झाल्यास टॅल्कम पावडर ही अनेक खनिजांच्या मिश्रणातून तयार होत असते.

फोटो स्रोत, Getty Images

"एखादं बाळ आणि वयस्क व्यक्तीसाठी बनलेल्या पावडरमध्ये काहीच अंतर नसतं. बेबी सॉफ्ट वगैरे शब्दांचा वापर केवळ मार्केटिंगचा भाग असतो," असं डर्मेटॉलॉजिस्ट डॉ. ऋषी पराशर सांगतात.

"गेली काही वर्षं अशी धारणा होती की, पावडरमुळे आपण गोरं होतो, पावडरमुळे घाम सुकतो, पण खरंच असं होतं का? खरंतर पावडर खनिजांचं आणि रसायनांचं मिश्रण असतं. पावडरचा वापर अधिक केल्यास धोका तर होणारच."

पावडरचा वापर करणं धोकादायक अशू शकतं, पण कोणत्याही एका विशिष्ट ब्रँडची पावडर धोकादायक असण्याची शक्यता ते फेटाळून लावतात.

शक्य असल्यास अशा पावडरचा वापर टाळावा, असं ते सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)