राजीव गांधींचा भारतरत्न काढून घ्या: दिल्ली विधानसभेत प्रस्ताव मंजूर #5मोठ्याबातम्या

राजीव गांधी Image copyright Getty Images

सर्व वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात पाहूया:

1. राजीव गांधींचा भारतरत्न काढून घेण्याचा प्रस्ताव मंजूर

भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांचा भारतरत्न पुरस्कार परत घेण्याचा प्रस्ताव दिल्ली विधानसभेत संमत करण्यात आला आहे.

लोकसत्ताने दिलेल्या बातमीनुसार सत्ताधारी आम आदमी पार्टीच्या बहुतांश आमदारांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

1984 मध्ये उसळलेल्या शीख दंगलीत राजीव गांधी दोषी होते, असा आरोप आप सरकारने करत गांधी कुटुंबाकडून हा पुरस्कार परत घेण्यात यावा, अशी मागणी या प्रस्तावात नमूद केली आहे.

दरम्यान, हा प्रस्ताव मंजूर केल्यामुळे आम आदमी पार्टीत रणकंदन माजल्याची बातमी इंडियन एक्सप्रेसने दिली आहे. आप पक्षाचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी पत्रकारांना सांगितलं की त्यांना मिळालेल्या मूळ प्रतीत राजीव गांधी यांच्याशी संबंधित ओळी नव्हत्या. मालवीय नगर भागातील आमदार सोमनाथ भारती यांच्या मागणीनुसार या ओळी मूळ प्रस्तावात घालण्यात आल्या.

तसंच आप पक्षाच्या आमदार अलका लांबा यांनी या प्रस्तावाला असहमती दर्शवली आहे. पक्षाने त्यांच्याविरोधात शिस्तभंगाच्या कारवाई केली असून त्यांना राजीनामा देण्याचा आदेश दिला आहे.

2. दिल्लीत पेट्रोलचा दर 34 रुपये, पण...

राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 34.04 रुपये आणि डिझेलचा दर प्रतिलिटर 38.67 रुपये आहे, कर आणि वितरकांचे कमिशन वगळता, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. लोकसभेत दिलेल्या एका लेखी उत्तराचा संदर्भ घेऊन सकाळने ही बातमी दिली आहे.

दिल्लीत कर आणि वितरकांचे कमिशन पेट्रोलवर 96.9 टक्के आणि डिझेवर 60.3 टक्के आहे. दिल्लीत 19 डिसेंबरला पेट्रोलचा दर प्रतिलिटर 70.63 रुपये होता. यामध्ये केंद्रीय उत्पादन शुल्क 17.98 रुपये, राज्याचा मूल्यवर्धित कर 15.02 रुपये आणि वितरकाचे कमिशन 3.59 रुपये आहे.

Image copyright Getty Images

दिल्लीत डिझेलचा दर 19 डिसेंबरला प्रतिलिटर 64.54 रुपये होता. यात केंद्रीय उत्पादन शुल्क 13.83 रुपये, राज्याचा मूल्यवर्धित कर 9.51 रुपये आणि वितरकाचे कमिशन 2.53 रुपये होतं.

पेट्रोल आणि डिझेलचा दर दररोज बाजारभावानुसार बदलत असून, प्रत्येक राज्यात स्थानिक करांच्या प्रमाणानुसार वेगवेगळे दर आहेत, असे शुक्‍ला यांनी उत्तरात नमूद केले आहे.

3. केंद्राकडून दुष्काळाच्या स्थितीची पाहणी

गेल्या उन्हाळ्यात आणि पावसाळ्यातील दुष्काळाच्या परिस्थितीचं अवलोकन करण्यासाठी केंद्राने विविध मंत्रालयातून काही टीमची स्थापना केली आहे. द हिंदूने दिलेल्या बातमीनुसार दुष्काळाने प्रभावित झालेल्या दोन कोटी हेक्टर जमिनीसाठी जवळजवळ 17,000 कोटीं रुपयांच्या मदतीची मागणी राज्य सरकारांनी केंद्राकडे केली आहे.

Image copyright Getty Images

या दुष्काळाचा सगळ्यांत जास्त फटका महाराष्ट्राला बसला असून 85 लाख हेक्टर जमीन या दुष्काळाने प्रभावित झाल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी गेल्या आठवड्यात संसदेत दिली आहे.

4. आनंद तेलतुंबडे यांची याचिका फेटाळली

कोरेगाव भीमा प्रकरणात दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यात यावा, या मागणीची आनंद तेलतुंबडे यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. लोकमतने ही बातमी दिली आहे.

कोरेगाव भीमा हिंसाचाराशी माझा काही संबंध नाही आणि मी कोणत्याही बेकायदेशीर कामात सहभागी नाही, असा दावा करत तेलतुंबडे यांनी न्यायालयात धाव घेतली होती.

31 डिसेंबर 2017 ला पुण्यातील शनिवार वाड्यात एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत चिथावणीखोर भाषणं केल्यामुळे 1 जानेवारीला कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. दरम्यान, या निर्णयावर अपील करण्यासाठी उच्च न्यायालयाने तीन आठवड्यांची मुदत दिली आहे.

5. 30,000 बेस्ट कर्मचारी संपावर जाणार

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागणीसाठी 7 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून 30,000 कर्मचारी संपावर जाणार असल्याची बातमी एबीपी माझाने दिली आहे. बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने 30 हजार कर्मचारी संपावर जाणार असल्याचा दावा केला आहे.

या संपामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यासाठी कामगार संघटनांनी आज संपाच्या निर्णयाबाबत मतदानाचा निर्णय घेतला होता. यामध्ये संप करण्याच्या बाजूने भरघोस मतदान झालं आणि हा संपाचा निर्णय घेण्यात आला.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)