गरोदर महिलेने घेतला गळाफास, तरीही दिला मुलाला जन्म

लहान मूल Image copyright Getty Images

मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यात एका महिलेने गळाफास लावला तरीही तिने एका मुलाला जन्म दिल्याचं प्रकरण समोर आलं आहे.

महिलेच्या मृत्यूनंतर मुलाची स्थिती आता ठीक आहे.

लक्ष्मी सिंह नावाच्या एका महिलेने काही अज्ञात कारणांमुळे गळाफास लावला आणि फासावर लटकलेल्या अवस्थेतच तिने एका मुलाला जन्म दिला.

बाईची नाळ बाळाशी जुळलेली होती. ते पाहून नातेवाईकांनी तातडीने पोलीस आणि हॉस्पिटलला संपर्क साधला.

मृत महिलेला नुकत्याच जन्मलेल्या बाळाबरोबर जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं. तिथं डॉक्टरांना मुलाची तब्येत नाजूक असल्याचं लक्षात आलं. मुलाला लगेच आयसीयूमध्ये हलवण्यात आलं. आता मुलाची तब्येत बरीच सुधारली आहे.

आपात्कालीन अॅम्ब्युलन्स सेवेशी निगडीत असलेले डॉ. माखनलाल सेन म्हणाले, "आम्हाला निरोप मिळाला की एका महिलेने गळाफास लावला असून तिचं मूल अडकलेलं आहे. आम्ही लोक जेव्हा तिथे पोहोचलो तेव्हा महिलेची प्रसुती झाली होती आणि मूल प्लॅसेंटामध्ये अडकलं होतं.

त्याचवेळी कटनी जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ.यशवंत शर्मा यांनी या घटनेबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणतात, "महिला गरोदर होती. तिला नववा महिना सुरू होता. मुलाचं वजन अंदाजे दोन किलो होतं. जेव्हा महिला गळाफास लावून लटकली तेव्हा गुरुत्वाकर्षणामुळे मुल खाली आलं."

आत्महत्येचं कारण माहिती नाही

महिलेचे पती संतोष सिंह यांच्या मते त्यांच्या कुटुंबात सगळं सुरळीत होतं.

ते म्हणतात, "नेहमीसारखं आम्ही जेवून सगळे झोपी गेलो. सकाळी सहा वाजता जेव्हा उठलो तेव्हा ती कुठे दिसली नाही."

संतोष सिंह म्हणाले की तेव्हा त्यांची इतर मुलं झोपली होती. आधी त्यांनी पत्नीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती सापडली नाही. मग त्यांनी गायीच्या गोठ्यात जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न केला.

तिथे त्यांची पत्नी गळाफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. त्यांचा मुलगा पोटातून निघून लटकलेला दिसला.

Image copyright Getty Images

संतोष सिंह यांनी आरडाओरडा केल्यावर आसपासचे लोक आले. त्यांनी रुग्णालय आणि पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

संतोष सिंह यांना चार मुलं आहे. त्यात दोन मुलं आणि दोन मुली आहेत. महिलेचे भाऊ अजमेर सिंह म्हणाले की त्यांनाही आत्महत्येच्या कारणांची कल्पना नाही.

कटनीचे पोलीस अधीक्षक कुमारलाल म्हणाले, "हे प्रकरण नक्की काय आहे याची चौकशी अजून सुरू आहे. महिलेचा मृत्यू झाला होता. मुलाची तब्येतही ठीक आहे. महिलेच्या मृत्यूची पोलीस चौकशी करत आहेत. आत्महत्येचा कारणांचा शोध घेतला जात आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)