स्वतःच अंत्यविधीचं साहित्य खरेदी करून 'त्या' कर्जबाजारी शेतकऱ्याने संपवलं आयुष्य

  • हृदयविहारी बंडी
  • बीबीसी प्रतिनिधी
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी

"घरातल्या काही किरकोळ वस्तू खरेदी करण्यासाठी ते जवळच्या गावात गेले होते. ते तर घरी परतले नाही. मात्र त्यांनी खरेदी केलेल्या बांगड्या, पांढरं कापड, हळद, कुंकू आणि फुलांचा हार तेवढा घरी पोहोचला. यातलं काहीच घरासाठी लागणारं सामान नव्हतं. ते त्यांनी स्वतःच्या अंत्यविधीसाठी खरेदी केलं होतं", हे सांगताना माधव्वाचा कंठ दाटून आला होता.

माधव्वाचे वडील मल्लप्पा आंध्र प्रदेशमधल्या अनंतपूर जिल्ह्यातल्या रामपूरम गावात राहायचे. त्यांनी आपल्या अंत्यविधीसाठी लागणारं सगळं साहित्य खरेदी केलं, आपला फोटोही लॅमिनेट करून घेतला आणि नंतर आत्महत्या केली.

मल्लप्पांनी शेतीसाठी घेतलेलं कर्ज ते नापिकीमुळे फेडू शकले नाही आणि याच नैराश्यातून त्यांनी ऑगस्ट 2018 मध्ये आत्महत्या केल्याचं कुटुंबीय सांगतात.

मृत्यूनंतर अत्यंविधीचं साहित्य खरेदी करण्याचा भार आपल्या कुटुंबीयांवर पडू नये, म्हणून त्यांनी आत्महत्येपूर्वीच सगळं सामान आणून ठेवलं होतं.

पांढरं कापड, बायकोसाठी बांगड्या आणि मृतदेहावर चढवण्यासाठी फुलांचा हारही खरेदी केला. शेजारच्या गावातून ही सर्व खरेदी करून ते संध्याकाळी आपल्या गावात पोहोचले. रस्त्याला लागून असलेल्या आपल्या शेतात गेले. तिथे वडिलांच्या थडग्यावर हे सर्व साहित्य ठेवलं आणि सोबत एक चिठ्ठीही लिहून ठेवली. वेगवेगळ्या लोकांकडून त्यांनी किती कर्ज घेतलं, याचा ताळेबंद त्या चिठ्ठीत लिहिला होता. पैसे देणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभारही मानले होते.

मल्लप्पा यांना लिहिता वाचता येत नव्हतं. त्यामुळे ही चिठ्ठी लिहिण्यासाठी त्यांनी एकाची मदत घेतली आणि इतर सामानासोबत ही चिठ्ठी बॅगेत ठेवली होती.

यानंतर ते एका झोपडीत गेले. शेताच्या अगदी समोर ही झोपडी आहे. काम करून दमल्यानंतर ते रोज याच झोपडीत विश्रांतीसाठी जायचे. तिथेच त्यांनी कीटकनाशक घेतलं आणि इहलोकाचा निरोप घेतला.

फोटो स्रोत, UMESH

दुसऱ्या दिवशी सकाळी मल्लप्पा यांचा मुलगा माधव्वा गुरं चारण्यासाठी शेतात गेला तेव्हा त्याची नजर आजोबांच्या थडग्यावर ठेवलेल्या पिशवीवर गेली. तिथे असलेला हार, पांढरं कापड आणि वडिलांचा फोटो बघून त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, तशी त्याने आसपास नजर फिरवली आणि त्याला दूरवर एका खाटेवर कुणीतरी झोपलेलं दिसलं.

"मला काहीतरी अघटित घडल्यासारखं वाटलं आणि मी झोपडीकडे धावलो. ते माझे वडीलच होते. मला धक्काच बसला," अश्रुंनी डबडबलेल्या डोळ्यांनी माधव्वा बीबीसीला सांगत होता.

सततचा दुष्काळ आणि नापिकीमुळे कर्ज फेडू न शकलेल्या एका शेतकऱ्याची ही कहाणी. बीबीसी न्यूज तेलुगूच्या प्रतिनिधी हृदयविहारी यांनी त्यांचं गाव गाठून त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यांचा हा वृत्तांत -

'कर्ज फेडण्यासाठी पैसे नसल्यानं माझ्या वडिलांची आशा मावळली'

मल्लप्पा यांनी आत्महत्या केली त्या शेतात आम्ही पोहोचलो होतो. तिथून अर्धा किलोमीटरवर त्यांचं घर होतं. या गावापर्यंत बसही जात नाही. मल्लप्पांचा मुलगा माधव्वा आम्हाला घ्यायला शेतापर्यंत आला होता.

पाऊस नसल्याने सुकून गेलेला भुईमूग आम्हाला दिसला. हा भुईमूग आता गुरांना चारा म्हणून दिला जातो.

त्या कुटुंबासाठी काळा दिवस ठरलेल्या त्या प्रसंगाची आठवण करून देणारी मल्लप्पा यांची पांढऱ्या रंगाने रंगवलेली कबरही आम्ही बघितली. मल्लप्पा यांचा मुलगा आम्हाला त्या झोपडीत घेऊन गेला, जिथे मल्लप्पांनी शेवटचा श्वास घेतला होता.

फोटो स्रोत, NIYAS AHMED

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

मल्लप्पा 60 वर्षांचे होते, असं त्यांच्या मुलाने सांगितलं. मल्लप्पांचा जन्म दाखला नव्हता. खेडोपाड्यात ही सामान्य बाब आहे. त्यामुळे माधव्वाने अंदाजाने त्यांचं वय सांगितलं होतं.

मल्लप्पा यांना तीन मुली आणि दोन मुलं आहेत. त्यांचा मोठा मुलगा गावात शेती बघतो तर लहान मुलाला त्यांनी कामधंदा शोधण्यासाठी बंगळुरूला पाठवलं होतं. त्यांच्या तिन्ही मुलींची लग्न झालेली आहेत आणि त्या जवळपासच्याच गावात राहतात.

त्यांची गावात सहा एकर शेती आहे आणि त्यांनी बँकेकडून 1.12 लाख रुपये तर 1.73 लाख रुपयांचं खाजगी कर्ज घेतलं होतं. मल्लप्पांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत तसा हिशेब लिहून ठेवला होता.

"आमच्याकडे 6 एकर शेती आहे. शेतीला पाणी देण्यासाठी 4 विंधन विहिरी (बोअरवेल) खोदल्या. मात्र त्यातल्या 3 विहिरींना पाणीच लागलं नाही. पाऊस नसल्यामुळे चौथ्या विहिरीतही पुरेसं पाणी नाही. आम्ही तीन एकरांमध्ये टोमॅटो तर उरलेल्या तीन एकरांमध्ये भुईमूग लावला. आम्हाला वाटलं टोमॅटोच्या पिकातून सर्व कर्ज फेडता येईल. या आशेवर सगळं पाणी टोमॅटोला दिलं. त्यामुळे भुईमूगाला पाणी देता आलं नाही. पाणी दिलं नाही आणि पाऊसही नाही. त्यामुळे भुईमूग पूर्ण वाळला," माधव्वा बीबीसीला सांगत होता.

तो सांगतो, टोमॅटोचे भाव कोसळले. त्यामुळे कर्ज फेडण्यासाठी पैसेच येणार नसल्याने त्याच्या वडिलांची सारी आशाच मावळली होती.

9 ऑगस्टच्या सकाळी व्याज देण्यासाठी आणि वाण सामान आणि टोमॅटोसाठी लागणारं खत आणण्यासाठी जातो, असं सांगून मल्लप्पा शेजारच्या कल्याणदुर्गम गावी गेले ते कधी परतलेच नाही.

आपल्या वडिलांचे ते शेवटचे दिवस आठवून माधव्वाला अश्रू अनावर झाले होते. तो म्हणाला, "आत्महत्येचा निर्णय त्यांनी आठवड्याभर आधीच घेतला होता, असं वाटतं. मात्र त्यांच्या वागण्यातून आम्हाला याचा अंदाजच बांधता आला नाही."

मल्लप्पा यांना दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेंशन मिळायची. त्यांनी टोमॅटो विकून मिळालेल्या पैशातले 1000-1500 रुपये बाजूला काढून ठेवले होते आणि काही वाण सामानही आणलं होतं. आपले वडील निराश झाले होते, याची पुसटशी कल्पनाही त्यांनी घरच्यांना येऊ दिली नाही, असं माधव्वा सांगतो.

कर्जासाठी विकले मुलीचे दागिने

आम्ही रामपूरम गावी पोहोचलो आणि मल्लप्पा यांच्या एका खोलीच्या घरी गेलो. दलित कॉलनीतल्या एका चिंचोळ्या गल्लीत ते राहायचे.

उदास चेहऱ्याने मल्लप्पाच्या पत्नीने आमचं स्वागत केलं. त्यांचीही तब्येत साथ देत नव्हती आणि त्यांना ऐकूही कमी येत होतं.

"बँक आणि खासगी कर्जाव्यतिरिक्त त्यांनी पेरणीसाठी मुलींचे दागिने तारण ठेवूनही कर्ज काढलं होतं," मल्लप्पाच्या पत्नी मरेक्का यांनी बीबीसीला सांगितलं.

ते शेतीसाठी सतत कर्ज घ्यायचे. पण सततच्या दुष्काळामुळे नेहमी पीक वाया जायचं. यावर्षी तरी चांगलं पीक येईल, अशी आशा त्यांना होती, मात्र यावर्षीही आमची आशा धुळीस मिळाली, हे सांगताना मरेक्काचा बांध फुटला होता," असं त्यांनी सांगितलं.

त्या दिवशी नेमकं काय घडलं?

मल्लप्पांवर 1 लाख 73 हजार रुपयांचं खासगी कर्ज होतं, अशी माहिती माधव्वाने दिली. काही खासगी सावकार या कर्जफेडीसाठी मल्लप्पावर सतत दबाव टाकत होते.

फोटो स्रोत, UMESH

फोटो कॅप्शन,

कर्ज आणि फेडलेल्या रकमेची माहिती

मरेक्का यांनी सांगितलं, "एक सावकार कर्जवसुलीसाठी माणूस पाठवेन, अशी धमकी देऊन गेला होता. असं झालं तर आपली बेअब्रू होईल, अशी भीती कदाचित त्यांना वाटत असावी. त्या सावकाराकडून त्यांनी फक्त दहा हजार रुपये घेतले होते."

त्या दिवशी सकाळी ते गुरं घेऊन शेतावर जाणार एवढ्यात एक माणूस त्यांच्या घरी गेला होता. त्याने काहीतरी सांगितलं आणि मल्लप्पा त्याच दिवशी दुसऱ्या गावी गेले. मात्र कधी परतलेच नाही. त्या दिवसाची आठवण करून त्यांच्या बायकोला हुंदके अनावर झाले होते.

'माझ्याकडे वेळ नाही'

आम्ही अनंतपूरहून आमच्या परतीच्या प्रवासात कल्याणदुर्गम गावीही जाऊन आलो आणि ज्या फोटोग्राफरने मल्लप्पांचा फोटो लॅमिनेट केला होता, त्याला भेटलो.

त्यांचं नाव गोविंदू. फोटोग्राफीसोबतच ते फ्रीलान्स रिपोर्टर म्हणूनही काम करतात. आम्ही मल्लप्पाविषयी विचारपूस करण्यासाठी कॉल केला तेव्हा त्यांनी आम्हाला त्यांच्या स्टुडिओमध्ये भेटायला बोलावलं. दुःखी अंतःकरणाने त्याने त्या दिवशी घडलेला संपूर्ण प्रसंग सांगितलं.

फोटो कॅप्शन,

गोविंदू

"मल्लप्पा एक दिवस माझ्याकडे आले आणि स्वतःचा फोटो लॅमिनेट करून द्यायला सांगितला. मी त्यांच्याकडून अॅडव्हान्स घेतला आणि फोटो घ्यायला दोन दिवसांनंतर या, असं सांगितलं. ते दोन दिवसांनंतर आले. पण मी फोटो लॅमिनेट केलेला नव्हता," गोविंदू सांगत होता.

"त्यांनी मला तात्काळ फोटो लॅमिनेट करायला सांगितलं आणि म्हणाले हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते आणखी वाट बघू शकत नाही. मी त्यांना म्हटलं जुना फोटो लॅमिनेट करण्याऐवजी तुम्ही नवा फोटो काढा. मात्र ते नकार देत म्हणाले, "'माझ्याकडे वेळ नाही. कृपा करून लवकरात लवकर फोटो द्या.' मी माझं सगळं काम बाजूला ठेवलं आणि फोटो लॅमिनेट केला. ते साडे अकरा-बाराच्या जवळपास आले आणि त्यांनी फोटो घेतला," त्याने सांगितलं.

"मी एका शेतकऱ्याच्या आत्महत्येची बातमी स्थानिक वर्तमानपत्रात वाचली आणि त्या दिवशी मी ज्यांचा फोटो लॅमिनेट करून दिला ते हेच होते, हे लगेच लक्षात आलं. ते पहिल्यांदा आले तेव्हा मी त्यांना दोन दिवसांनी या म्हणून सांगितलं होतं. मी त्यांचा मृत्यू केवळ दोन दिवस थांबवू शकलो होतो," सांगताना गोविंदूलाही गहिवरून आलं होतं.

कर्जमाफीने दिला असता दिलासा?

मल्लप्पांचं 40,000 रुपयांचं कर्ज राज्य सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेअंतर्गत दोन टप्प्यात माफ झालं होतं आणि तिसरा टप्पा येऊ घातला होता.

"तिसरा टप्पा लवकर लागू झाला असता तर मल्लप्पांच्या खांद्यावरचं ओझं आणखी कमी झालं असतं आणि त्यांना थोडा दिलासा मिळाला असता," माधव्वा सांगत होता.

स्थानिक पत्रकार शफिउल्लाहने बीबीसीला सांगितलं मल्लप्पांना खाजगी सावकाराचं केवळ दहा हजार रुपयांचं कर्ज फेडायचं होतं.

टोमॅटोचं मार्केट

एका एकरात टोमॅटोचं पीक घ्यायला 30,000 रुपये पडतात. एका हंगामात सातवेळा काढणी करता येते. एका एकरात जवळपास 4,500 किलो टोमॅटो घेता येतो. म्हणजेच 15 किलो टोमॅटोच्या 300 क्रेट. एका एकरातल्या पिकाची तोडणी करण्यासाठी 15 मजूर लागतात.

फोटो स्रोत, ANJI

प्रत्येकाला 150 रुपये मजुरी द्यावी लागते. म्हणजे दररोज 2,250 रुपये निव्वळ मजुरीमध्ये जातात. याव्यतिरिक्त क्रेट बाजारात पोहोचवण्यासाठी प्रत्येक क्रेटच्या मागे 16 रुपये लागतात. म्हणजे 300 बॉक्स बाजारात नेण्यासाठीचा वाहतूक खर्च जवळपास 4,800 रुपये येतो.

भरीस भर म्हणजे दलालाला 10% कमिशन जातं आणि बाजारात प्रत्येक क्रेटमागे मिळतात केवळ 40 रुपये. एकूण हिशेब मांडला तर टोमॅटोची शेती हजार रुपये तोट्यातच आहे.

यामुळे शेतकरी इतका उद्विग्न झाला आहे की कमी किमतीत माल विकण्यापेक्षा तो टोमॅटो रस्त्यावर फेकून रोष व्यक्त करू लागला आहे.

गेल्या 54 वर्षातला सर्वात मोठा दुष्काळ

"गेल्या 54 वर्षांत इतका भीषण दुष्काळ आम्ही बघितलेला नाही. अनंतपूर जिल्ह्यात पाऊस झालाच नाही. हांद्रीनीवा प्रकल्पातून आम्हाला कृष्णा नदीतलं पाणी मिळतं. त्यामुळे परिस्थिती जरा बरी आहे. इतका दीर्घकाळ दुष्काळ आणि काळ्या मातीत निपिकी आम्ही कधीच बघितलेली नाही," असं अनंतपूर जिल्हा कृषी सहसंचालक हबीब सांगतात.

"मला शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा विचार करून खरंच भीती वाटते," ते आपली काळजी व्यक्त करतात.

फोटो स्रोत, NIYAS AHMED

मानवाधिकार कार्यकर्ते एस. एम. भाषा विचारतात, "मल्लप्पा यांची आत्महत्या म्हणजे जिल्ह्यात पडलेल्या दुष्काळाची भीषणता दाखवणारं जळजळीत उदाहरण आहे. जमीन आणि शेतीतून शेतकऱ्याला सुरक्षिततेची हमी मिळायला हवी. मात्र त्याऐवजी ती जोखमीची ठरू लागली आहे. शेतकऱ्यांच्या हाती पीक येतं त्यावेळी बाजारात किमान हमी भाव मिळाला नाही तर ते काय करतील?"

"मी गेल्या 30 वर्षांपासून दुष्काळाचा अभ्यास करतोय. मात्र तरीही शेतकरी आत्महत्येविषयी विचार करण्याचं धाडस होत नाही. ग्रामीण भागातली परिस्थिती चिघळत चालली आहे. राज्यातल्या अनेक भागात दुष्काळी परिस्थिती गंभीर होत चालली आहे. अनेक गावं ओस पडली आहेत. गावात फक्त म्हातारी माणसं दिसतात. गावात पिण्याच्या पाण्याचंही दुर्भिक्ष्य आहे."

ते सांगतात, "प्रत्येक जिल्ह्याचं थोडंफार वेगळेपण आहे आणि तिथल्या परिस्थितीनुसार सरकारने योजना आखली पाहिजे आणि तेच घडत नाही."

"मध्य प्रदेश आणि राजस्थानात भाजपच्या पराभवासाठी काँग्रेस जबाबदार नाही. समाजातल्या शेतकरी आणि बेरोजगारांमधल्या वाढत्या नैराश्याचा तो परिणाम आहे. सरकार बदलतं मात्र परिस्थिती बदलत नाही. राजकीय पक्ष बदलण्याऐवजी शाश्वत विकासाकडे नेणारा रचनात्मक बदल घडवून आणण्याासाठी मोठी चळवळ उभी करण्याची गरज आहे."

माधव्वा उदरनिर्वाहासाठी अजूनही त्याच भुईमुगाच्या शेतीवर अवलंबून आहे. त्याच्या पिकाला किमान हवी भाव मिळेल, एवढी एकच आशा त्याला आहे. मात्र आम्ही त्याला विचारलं, पीक आलंच नाही तर काय होणार?

"आमच्या नशिबात काय आहे, आम्हाला माहीत नाही. कर्जावरचं 40,000 रुपयांचं व्याज मला फेडायचं आहे. ते कसं फेडणार, मला माहीत नाही. पैसे मिळतील या एकमेव आशेवर मी टोमॅटोचं पीक घेतोय. पाऊस पडला नाही आणि पीक आलंच नाही तर घरदार आणि गुरढोरं विकून शहरात जाण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय उरणार नाही," माधव्वा सांगतो.

नुकसान भरपाई मिळणार

कल्याणदुर्गमचे महसूल अधिकारी श्रीनिवासुलू यांनी बीबीसीला सांगितलं, "मल्लप्पा यांच्या कुटुंबाला लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळेल, असं आश्वासन आम्ही दिलं आहे आणि त्यांची फाईल आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवली आहे."

"मल्लप्पाच्या कुटुंबाला अजून प्रशासनाकडून 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळालेली नाही आणि त्यांनी बँकेकडून घेतलेलं दीड लाख रुपयांचं कर्जही आम्ही माफ करून घेऊ."

श्रीनिवासुलू यांनी बीबीसीला सांगितलं, "त्यांना जी नुकसान भरपाई मिळेल त्यातून ते खाजगी कर्ज फेडू शकतील. आम्ही मल्लप्पा यांचा मुलागा आणि त्यांच्या पत्नी यांच्या नावाने एक संयुक्त खातं उघडू आणि टप्पटप्प्याने भरपाई या खात्यात जमा होईल."

अनंतपूर जिल्हा प्रशासनाने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार 1998-2017 याकाळात जिल्ह्यात एकूण 932 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जिल्ह्यातल्या भूजल विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार जिल्ह्यात 2002 पासून म्हणजे गेल्या 17 वर्षात तब्बल 9 वर्षं भूजल दुष्काळ वर्षं ठरली आहेत. 2011 ते 2018 डिसेंबरपर्यंत भूजल पातळी 12.90 मीटरवरून 27.21 मीटरपर्यंत खाली गेली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)