कमल हसन लोकसभेची निवडणूक समविचारी पक्षांबरोबर लढवणार - #5मोठ्याबातम्या

कमल हसन Image copyright TWITTER/KAMAL HAASAN
प्रतिमा मथळा कमल हसन

आज देशभरातील विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्या पुढीलप्रमाणे:

1. कमल हसन 2019ची विधानसभेची निवडणूक लढवणार

अभिनेते कमल हसन यांनी 2019 मध्ये लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केल्याची बातमी NDTV ने दिली आहे.

'मक्कल निधी मैय्यम' हा त्यांचा पक्ष तामिळनाडूच्या विकासावर भर देणार असून समविचारी पक्षांशी युती करण्याची तयारीही त्यांनी दाखवली आहे. ते एखाद्या युतीचा भाग होतील किंवा स्वत:च युती करतील, हे आता सांगणं योग्य होणार नसल्याचंही ते म्हणाले.

"मी निवडणूक लढणार. उमेदवार निवडण्यासाठी लवकरच एक समिती गठित केली जाईल," असं ते पुढे म्हणाले.

2. काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा आताचे सरकार 'बेकार' - राज ठाकरे

"काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा आताचे सरकार बेकार आहे. आता पाच राज्यांच्या निवडणुकीत मोदींवर असलेला राग मतांतून बाहेर पडला आहे. भाजप स्वतःच स्वतःचे खड्डे खणत आहे," असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्याचं वृत्त सकाळने दिलं आहे.

Image copyright STRDEL/GETTY IMAGES
प्रतिमा मथळा राज ठाकरे

नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सरकारवर टीकास्त्र सोडलं. तेव्हा इतर विषयांवर बोलताना राज ठाकरे यांनी मुलगा अमित ठाकरे याचे लग्न साध्या पद्धतीने होणार असल्याचंही सांगितलं.

3. आणखी किती स्वातंत्र्य हवं?- अनुपम खेर

अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी देशात जमावाकडून केल्या जाणाऱ्या हत्या आणि मुलांच्या सुरक्षेची चिंता व्यक्त करणाऱ्या वक्तव्यावरून वाद पेटला आहे.

अभिनेते अनुपम खेर यांनी शहा यांचे नाव न घेता "आणखी किती स्वातंत्र्य हवं?" असा सवाल केल्याचं वृत्त महाराष्ट्र टाइम्सने दिलं आहे.

Image copyright Twitter

"आपल्या देशात इतकं स्वातंत्र्य आहे की लष्कराबदद्ल अपशब्द बोलले जातात. नौदलप्रमुखांची उघडपणे बदनामी केली जाते. जवानांवरही दगडफेक करण्यात येत आहे. आणखी किती स्वातंत्र्य हवं तुम्हाला?" असा सवाल खेर यांनी केला आहे.

"त्यांना (नसीरुद्दीन शहा) जे सांगायचं होतं ते त्यांनी सांगितलं. मात्र ते खरंच आहे, असं म्हणण्याची गरज नाही," असा टोलाही त्यांनी लगावला.

4. फक्त 68 टक्के अंगणवाडीत प्रसाधनगृहाची सुविधा - सरकारची माहिती

झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना, गरिबांना तसंच देशभरात पसरलेल्या अंगणवाड्यांना प्रसाधनगृहाची सुविधा पुरवणं हा खरंतर केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत योजनेचा मुख्य उद्देश आहे. मात्र एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत येणाऱ्या अंगणवाड्यांपैकी फक्त 68% टक्के अंगणवाड्यांतच ही सुविधा आहे, असं केंद्र सरकारने संसदेत सांगितलं आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.

महिला आणि बाल विकास मंत्रालयाने राज्यसभेत ही माहिती देताना 13,63,000 अंगणवाड्यांपैकी फक्त 9,29,339 अंगणवाड्यांतच या सोयीसुविधा उपलब्ध असल्याचतं सांगितलं. त्याचप्रमाणे 1,90,404 अंगणवाड्यांत पिण्याच्या पाण्याची सोयसुद्धा नसल्याचं सरकारने सांगितलं आहे.

5. एसटीची विठाई सोमवारपासून धावणार

पंढरपूरला येण्यासाठी राज्यभरातून एसटीच्या नियमित बसेससह प्रासंगिक करारावर बसेस उपलब्ध करून देण्यात येतात. अनेक भाविक खासगी वाहनाने प्रवास करतात तेव्हा त्यांना मार्गावर विविध अडचणींचा सामना करावा लागतो.

तेव्हा त्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाची 'विठाई' नावाची नवीन बससेवा सोमवारपासून सुरू होणार असल्याची बातमी एबीपी माझाने दिली आहे.

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे या सेवेचं उद्घाटन करणार आहेत, असं या वृत्तात म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)