मिनिमम बॅलन्सवरील दंडामुळे बँका मालामाल, तिजोरीत आले 10 हजार कोटी

बँक

फोटो स्रोत, Getty Images

सरकारी बँकांत खातं उघडताना ग्राहकांना काही किमान रक्कम खात्यात ठेवावी लागते. त्याला बँकेच्या परिभाषेत Minimum Balance असं म्हणतात.

तसंच ATM मधून पैसे काढण्याच्या व्यवहारावरही काही बंधनं आहेत. उदा. काही बँकांच्या एका महिन्यात ATMमधून तीनदा विनाशुल्क पैसे काढू शकतो तर काही बँकांनी ही मर्यादा पाच व्यवहारांपर्यंत ठेवली आहे. त्यापुढे पैसे काढले तर बँक ग्राहकांकडून काही शुल्क आकारतात.

सरकारी बँकांनी गेल्या तीन वर्षांत ग्राहकांकडून त्यांच्या अकाउटमध्ये किमान रक्कम ठेवण्याबाबत लावलेली बंधनं आणि ATMमधून एका महिन्यात करावयाच्या व्यवहारांची मर्यादा, या दोन गोष्टीत वेळोवेळी बदल केले आहेत. या दोन नियमांची पूर्तता केली नाही तर ग्राहकांना दंड भरावा लागतो.

आणि गेल्या तीन वर्षांत बँकांनी याप्रकारे दहा हजार कोटी रुपये गोळा केल्याचं समोर आलं आहे. यापैकी किमान बॅलन्स न ठेवल्यास दंडाच्या रूपात 6,246 कोटी रुपये बँकांच्या तिजोरीत गोळा झाले आहेत. तर महिन्याअखेरीस मर्यादित व्यवहारांपेक्षा (Transaction) जास्त व्यवहार केल्यामुळे तब्बल 4,515 कोटी रुपये सरकारी बँकेमध्ये आले आहेत. या कमाईत स्टेट बँक ऑफ इंडिया सगळ्यात जास्त आघाडीवर आहे.

पश्चिम बंगालच्या तमलूक भागातील तृणमूल काँग्रेसचे खासदार दिब्येंदू अधिकारी यांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात अर्थ मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. संसदेने अर्थ मंत्रालयाला दिलेल्या लिखित उत्तरात सांगितलं की स्टेट बँक खात्यात किमान रक्कम ठेवली नाही तर ग्राहकांकडून दंड वसूल करत होती. त्यानंतर 31 मार्च 2016 पर्यंत त्यांनी हा प्रकार थांबवला होता. मात्र खासगी बँकांनी दंड वसूल करायला सुरूच ठेवलं.

फोटो स्रोत, Getty Images

मात्र एप्रिल 2017 पासून SBIने किमान रक्कम ठेवली नाही तर दंड आकारायला पुन्हा सुरुवात केली आहे. स्टेट बँकेने जून 2017 मध्ये किमान रक्कम पाच हजार केली.

मात्र त्याला कडाडून विरोध झाला आणि त्या किमान रकमांच्या मर्यादांची चार वर्गात विभागणी झाली. त्यानंतर ही वर्गवारी तीनवर आणण्यात आली.

विविध बँकांमधली मुदत किती?

रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार बँकांना आपल्या विविध सोयीसुविधांसाठी एक फिक्स चार्ज घेण्याची परवानगी आहे.

वेगवेगळ्या बँकांमध्ये मेट्रो, शहरी, निमशहरी, आणि ग्रामीण भाग यावर आधारित मासिक किमान अनिवार्य रक्कम वेगवेगळी आहे. जर ग्राहकांनी ती किमान रक्कम ठेवली नाही तर GST सकट त्यांच्यावर दंड आकारला जातो. या दंडाची पद्धतसुद्धा वेगवेगळ्या बँकांची वेगवेगळी आहे.

Sbi.co.in या वेबसाईटवरील माहितीनुसार त्यांच्या बचत खात्यात शहरी भागात किमान 3000 रुपये, निमशहरी भागात किमान 2000 रुपये तर ग्रामीण भागात किमान 1000 रुपये ठेवणं बंधनकारक आहे. तेवढी रक्कम जर ठेवली नाही स्टेट बँकेत कमीत कमी 5 रुपये + GST आणि जास्तीत जास्त 15 रुपये + GST इतका दंड आकारू शकते.

त्याशिवाय पंजाब नॅशनल बँकेत फक्त दोन वर्ग करण्यात आले आहेत. मेट्रो, शहरी, निमशहरी भागांमधल्या खात्यांसाठी दोन हजार रुपये आणि ग्रामीण बँकेच्या अकाउंटसाठी एक हजार रुपये, इतकी मर्यादा ठेवण्यात आली आहे.

खासगी बँकेमध्ये दंड अधिक

किमान रक्कम खात्यात ठेवली नाही तर सरकारी बँकेपेक्षा खासगी बँकेत जास्त दंड आकारला जातो. HDFC बँकेत शहरी भागात ही रक्कम 10 हजार रुपये, निमशहरी भागात पाच हजार आणि ग्रामीण भागात ही रक्कम अडीच हजार इतकी आहे. ही रक्कम ठेवली नाही तर कमीत कमी 150 रुपये आणि जास्तीत जास्त 600 रुपये इतका दंड आहे.

फोटो स्रोत, Reuters

देशातली सगळ्यांत मोठी खासगी बँक ICICI बँकेने महानगरांमध्ये आणि शहरांमध्ये बचत खात्यात ही मर्यादा 10 हजार रुपये, छोट्या शहरासाठी 5,000 रुपये तर ग्रामीण भागात एक हजार रुपये ठेवली आहे. इतकी रक्कम जर खात्यात नसेल तर 100 रुपये + GST इतका दंड आकारला जातोच.

ग्रामीण भागात रक्कम जितकी कमी त्यावर पाच टक्के इतका दंड आकारला जातो.

किमान रकमेची गणना

बचत खात्यात किमान रक्कम ठेवावी लागते, ही बाब ग्राहकांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. ही रक्कम बँकांनुसार बदलत असते. आता ही रक्कम कशी ठरवतात हेही जाणून घेऊया.

किमान रकमेची गणना तुमच्या अकाउंटमध्ये प्रतिदिन किती रक्कम आहे, या आधारे होते. एका महिन्यात जितकी रक्कम ठेवली आहे, त्याला महिन्याच्या एकूण दिवसांनी भागलं जातं.

आता डिसेंबर 2018च्या वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळी रक्कम खात्यात असेल तर त्याची सरासरी खालीलप्रमाणे निघेल

  • 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर या काळात प्रतिदिन 10,000 रुपये असतील तर त्याची गणना पाच दिवसांत 50 हजार रुपये इतकी असेल.
  • सहा डिसेंबर ते 14 डिसेंबर या काळात प्रतिदिन 4,000 रुपये रक्कम असेल तर त्याची गणना नऊ दिवसात 36 हजार रुपये असेल.
  • 15 डिसेंबर ते 24 डिसेंबर दरम्यान 3500 रुपये असेल तर त्याची गणना 10 दिवसांत 35 हजार इतकी होईल.
  • 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर प्रतिदिन 1000 रुपये असेल तर त्याची गणना सात दिवसांत सात हजार रुपये असेल.

म्हणजे 31 दिवसांत ही गणना 1.28 लाख होईल आणि त्याची सरासरी 1,28,000/31 दिवस म्हणजे 4,129 रुपये इतकी असेल.

झिरो बॅलन्सची सोयही उपलब्ध

जर काही कारणास्तव किमान रक्कम ठेवण्यास असमर्थ असाल तर बेसिक बँक बचत खातंही उघडू शकता. अशा प्रकारची सेवा देणंसुद्धा अनिवार्य आहे, असा आदेश रिझर्व्ह बँकेने बँकांना दिला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

म्हणजे या खात्यात कोणत्याच प्रकारची किमान रक्कम ठेवण्याची गरज नाही. इतर खात्यांवर जसं व्याज मिळतं तसं या खात्यावरही मिळतं.

मात्र यात व्यवहांरांची संख्या मर्यादित असते आणि तसंही एकाच बँकेत तुम्ही सेव्हिंग आणि झिरो बॅलन्स अकाउंट एकत्र ठेवू शकत नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)