लोकसभा निवडणुका भाजप नरेंद्र मोदींच्याच नेतृत्वाखाली लढवणार - नितीन गडकरी #5मोठ्याबातम्या

नितीन गडकरी

फोटो स्रोत, Getty Images

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे:

1. आगामी लोकसभा निवडणुका मोदींच्याच नेतृत्वाखाली- नितीन गडकरी

आगामी लोकसभा निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच लढवणार आहोत, असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे. फायनान्शिअल एक्सप्रेसने ही बातमी दिली आहे.

"पुण्यात मी केलेल्या वक्तव्याचा मीडियाने विपर्यास केला असून, मी कोणत्याही नेतृत्वाच्या स्पर्धेत नाही. त्यामुळे भाजप नेतृत्व आणि माझ्यात फूट पाडण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल," असंही ते रविवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यात झालेल्या पराभवानंतर पक्ष नेतृत्वाने पराभवाची जबाबदारी स्वीकारायला हवी अशा आशयाचं वक्तव्य गडकरी यांनी पुण्यात केलं होतं. "मी जे वक्तव्य केलं होतं ते बँकिग क्षेत्राला उद्देशून होतं. त्याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा निवडणुकीशी संबंध नाही." असंही ते म्हणाले.

2. पुण्याच्या जागा सोडली नाही - अजित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्याच्या जागेचा दावा सोडलेला नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितल्याचं वृत्त नेटवर्क 18ने दिलं आहे.

लोकसभेच्या एकूण आठ जागांसाठी राष्ट्रवादीची काँग्रेसशी चर्चा सुरू आहे. या आठ जागांमध्ये पुण्याचाही समावेश आहे.

फोटो स्रोत, Facebook

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

"प्रसारमाध्यमांच्या बातमीत तथ्य नाही. काँग्रेस पक्षाबरोबर 40 जागांबाबत निर्णय झाला आहे. मात्र पुण्यासकट आठ जागांसाठीची चर्चा अद्यापही सुरू आहे," असं ते म्हणाले.

पुण्याच्या लोकसभा जागेचं प्रतिनिधित्व अनेक वर्षं काँग्रेसचे सुरेश कलमाडी करायचे. 2014च्या निवडणुकीत भाजपच्या अनिल शिरोळे यांनी काँग्रेसच्या विश्वजीत कदम यांचा पराभव केला होता.

3. उच्च शिक्षण असूनही महिला नोकरी करत नाही

अनेक महिलांनी उच्च शिक्षण घेऊनही त्याचं रूपांतर नोकरीत होत नाही, असं एका सर्वेक्षणात समोर आलं आहे. द हिंदूने दिलेल्या बातमीनुसार Indian Council for Research on International Economic Relations (ICRIER) या संस्थेने हे सर्वेक्षण केलं आहे.

"लग्नासाठी चांगली स्थळं मिळावी म्हणूनच मुलींना शिकवलं जातं तसंच अनेकदा घरकाम हे नोकरीपेक्षा जास्त महत्त्वाचं समजलं जातं. त्यामुळे महिला नोकरी करत नाहीत, अशी अनेक कारणं या सर्वेक्षणात मांडण्यात आली आहेत.

साधारण 30 वर्षं किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या महिलांचं सर्वेक्षण करण्यात आलं. त्यात सुशिक्षित असून सुद्धा काम न करणाऱ्या महिलांचं प्रमाण 62.7% टक्क्यांपासून ते 65.2% इतकं वाढलं आहे. त्याचप्रमाणे मजुरी करणाऱ्या अशिक्षित महिलांचं प्रमाणही 67.6% ते 70.1% पर्यंत वाढल्याचं या सर्वेक्षणात पुढे म्हटलं आहे.

4. आदिवासी भागात दलित, ओबीसींच्या आरक्षणाला कात्री

सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गाच्या आरक्षण कायद्यानंतर आदिवासी बहुल क्षेत्रात शासकीय सेवेतील पदभरतीसाठी आरक्षणाची फेररचना करण्यात आल्याची बातमी लोकसत्ताने दिली आहे.

आदिवासीबहुल आठ जिलह्यात अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कात्री लावलण्यात आली आहे.

फोटो स्रोत, MANPREET ROMANA/AFP/Getty Images

आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये 16 टक्के SEBC आरक्षण कायम ठेवण्यात आलं आहे. या वर्गासाठी नव्याने आरक्षण देण्यात आल्यामुळे त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

पालघर, धुळे, नंदूरबार, नाशिक, रायगड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात शासकीय सेवेतील गट क आणि ड पदांच्या भरतीत अनुसूचित जमातींसाठी त्या-त्या जिल्ह्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात वाढीव आरक्षण देण्यात आलं आहे. त्यासाठी अन्य प्रवर्गाच्या आरक्षणाला कात्री लावण्यात आली आहे.

5. बिहारमध्ये जागावाटपात भाजपचं नमतं धोरण

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षप्रणित NDAचं बिहारमधील जागावाटप निश्चित झालं आहे. भाजप आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे जनता दल युनायटेड हे दोन पक्ष प्रत्येकी 17 जागा लढवणार आहेत, तर रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाच्या वाट्याला सहा जागा आल्या आहेत.

पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांनंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मागण्यांपुढे भाजपने काहीसं नमतं घेतल्याचं यातून स्पष्ट दिसतंय, अशी बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान NDAसोबत राहतील की नाही, याबाबत तर्कवितर्क सुरू असताना पासवान या वाटाघाटी झाल्या. त्यानुसार पासवान यांना लवकरच राज्यसभेवरही धाडण्यात येईल.

भाजप अध्यक्ष अमित शहा, नितीश कुमार आि पासवान यांच्यात रविवारी दिल्लीत चर्चा झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी बिहारच्या 40 लोकसभा जागांच्या वाटपाची घोषणा केली.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)