नरेंद्र मोदी बिहारमध्ये नितीशकुमार यांच्यासमोर अखेर का झुकले?

  • मणिकांत ठाकूर
  • बीबीसी हिंदीसाठी, पाटण्याहून
अमित शाह

फोटो स्रोत, Twitter

आगामी लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये जागांच्या विभागणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं जे चित्र समोर आलं आहे त्यात भारतीय जनता पक्षाची परिस्थिती अतिशय अगतिक झालेली बघायला मिळते.

भाजपने तिथले दोन मित्रपक्ष जनता दल युनायटेड (JDU) आणि लोकजनशक्ती पक्षाला (LJP) सोबत ठेवण्यासाठी अप्रत्यक्षरित्या तडजोड केली आहे.

नीतीश कुमार त्यांच्या पक्षासाठी (JDU) 17 जागा आणि रामविलास पासवान त्यांच्या लोकजनशक्ती पक्षासाठी 6 जागा पटकावण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे भाजपला त्यांच्या जिंकलेल्या 5 जागांवर पाणी सोडावं लागलं आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत बिहारच्या लोकसभा निवडणुकीत 40 जागांपैकी फक्त 2 जागांवर JDU, 7 जागांवर लोकजनशक्ती पार्टी आणि 22 जागांवर भाजपला विजय मिळाला होता.

अशात 22 पैकी 17 जागांवर निवडणूक लढवण्याची वेळ भाजपवर आली आहे त्यामुळे ते अगतिक झाले आहेत. त्यातच जागावाटपाच्या या संघर्षात NDA चे जुने मित्रपक्ष उपेंद्र कुशवाहा यांनीही युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हा भाजपसाठी मोठा धक्का होता.

हे सर्व होत असतानाच रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवान यांनी बंडखोरी करायला सुरुवात केली. याचा परिणाम असा झाला की लोकसभेच्या 6 जागांसाठीचा दावा आणि रामविलास पासवान यांच्यासाठी राज्यसभेची एक जागा निश्चित झाली.

फोटो स्रोत, PTI

राष्ट्रीय लोक समता पार्टीच्या उपेंद्र कुशवाहा यांचा दबावही कामास आला नाही. मात्र रामविलास पासवान यांचा दबाव चांगलाच कामात आला.

चिराग पासवानांचं दबावतंत्र

उपेंद्र कुशवाहा यांच्यावर नितीश कुमार यांचा थोडा राग होता. मात्र तितका राग रामविलास पासवान यांच्यासाठी नव्हता.

दुसऱ्या बाजूला दलितांचं समर्थनही भाजपा गमावू इच्छित नाही.

बिहारमध्ये जी युती आकारला येत आहे त्यामुळे लोकजनशक्ती पार्टीला धाकधूक आहे. मात्र भाजप-जदयू पासून वेगळी चूल मांडत आरजेडी- काँग्रेस या युतीतही एक चांगलं स्थान प्रस्थापित करण्याची शक्यताही त्यांना वाटत नसावी.

राजकीय वातावरणाचं चांगलं ज्ञान असणारे रामविलास पासवान सध्या द्विधा मनस्थितीत आहेत. युवा आणि शेतकऱ्यांसाठी काहीही ठोस पावलं या सरकारने उचलली नाहीत असं वक्तव्य लोकजनशक्ती पक्षाच्या नेत्यांनी केलं होतं. तसंच जागेची विभागणी योग्य पद्धतीने झाली नाही तर दुसरा मार्ग अवलंबण्याची धमकीही या नेत्यांनी भाजपला दिली होती.

त्यात चिराग पासवान यांची आक्रमक भाषा बघून भाजपचा नाइलाज झाल्याचं राजकीय निरीक्षक सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images

काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत दहापेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत अशी शक्यता वाटू लागली तेव्हा JDU ने भाजपला आपले रंग दाखवायला सुरुवात केली.

नितीश कुमारांनी अशी हवा निर्माण केली की अमित शाह यांनी त्यांना लोकसभा निवडणुकीत बरोबरीचा भागीदार असल्याचं घोषित केलं.

थोडं आणखी खोलात शिरायचं झालं तर RJD- काँग्रेसच्या युतीची शक्यता लक्षात आल्यामुळेच अमित शाह यांनी JDU ला लोकसभा निवडणुकीत बरोबरीचा भागीदार असल्याचं घोषित केलं.

अमित शहांची रणनिती

जेडीयूसाठी 17 जागांचा त्याग करण्यामागे भाजप अध्यक्ष यांच्या रणनीतीत दोन बाबी स्पष्टपणे समोर येतात.

पहिली अशी की NDA मध्ये JDU सारख्या शक्तिशाली पक्षाला आपल्याबरोबर ठेवणं किंवा नितीशकुमार यांना विरोधी गटात जाऊ न देणं.

दुसरी गोष्ट अशी की बिहारमध्ये नितीशकुमार यांच्याशी निगडीत बहुआयामी पक्षांना एकत्र घेतलं तर यादव-मुस्लिम गटाचं वर्चस्व असलेल्या महागठबंधनचा सामना करणं शक्य होईल असं भाजपला वाटलं.

अशा प्रकारे पासवान समाजाचा पाठिंबा गमावण्याच्या भीतीमुळे भाजपला लोकजनशक्ती पक्षाचीही मागणी मान्य करावी लागली.

फोटो स्रोत, PTI

तीन राज्यात झालेल्या पराभवानंतर लोकजनशक्ती पक्षाकडून भाजपवर दबाव वाढत गेला. बदललेल्या परिस्थितीत भाजपाने जास्त वर्चस्व दाखवलं असतं तर परिस्थिती आणखी बिकट झाली असती.

म्हणूनच ही रणनीती भाजपकडून व्यावहारीक असल्याचं सातत्याने सांगण्यात येत आहे. मात्र त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्याचं मनोबल कमी झालं हे मात्र तितकंच स्पष्ट आहे.

बिहारमध्ये तर मोदी सरकारच नाही तर नितीश कुमार यांच्या सरकारकडूनही अपेक्षाभंग झाल्याची चर्चा सुरू आहे. गंमतीची गोष्ट अशी आहे की तिथल्या जनतेला RJD- काँग्रेसचा पर्यायही मान्य होईल का? याबद्दल राजकीय निरीक्षकांना शंका वाटते.

जे मतदार जातीच्या जोखडात अडकलेले नाहीत. ज्यांना महागाई, भ्रष्टाचार अशा समस्याचा जास्त गंभीर वाटतात त्यांना अशा कोणत्याच युतीवर विश्वास उरलेला नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)