उद्धव ठाकरेंची पंढरपूर वारीः मंदिराचं राजकारण शिवसेनेला किती तारणार?

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे

शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत. अयोध्या दौऱ्यानंतर महिन्याभरातच आखलेल्या पंढरपूर दौऱ्यामुळे शिवसेनेचा हिंदुत्वाचा अजेंडा अधोरेखित होत आहे.

अयोध्येमध्ये राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शिवसेनेनं 'पहले मंदिर, फिर सरकार' ही घोषणा दिली होती. आता पंढपूरमध्ये शिवसेना काय घोषणा करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरेंच्या पंढरपूर दौऱ्याचा कार्यक्रमही अयोध्या दौऱ्याप्रमाणेच आखण्यात आला आहे. पंढरपूरमध्ये उद्धव ठाकरे विठठ्ल-रुक्मिणीचं दर्शन घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दोन संतांचा सत्कारही या दौऱ्यात करण्यात येईल. सरतेशेवटी इस्कॉन घाटावर उद्धव ठाकरे चंद्रभागेची आरती करतील. राम आणि आता विठोबा... मंदिरांचं, हिंदुत्वाचं राजकारण शिवसेनेला किती उपयोगी ठरणार हा प्रश्न आहे.

हिंदुत्वाची 'स्पेस' व्यापण्याचा प्रयत्न

हिंदुत्वाचा अजेंडा शिवसेनेला नक्कीच मदत करेल, असं मत पत्रकार सुजाता आनंदन यांनी व्यक्त केलं. "शिवसेना स्वतंत्र लढेल असं चित्र सध्या तरी दिसत नाही. पण समजा निवडणुकीच्या आधी शिवसेनेनं युती तोडली तर त्यांच्यासाठी 'हिंदुत्वाची स्पेस' व्यापणं गरजेचं आहे. कारण मराठीच्या मुद्द्यावर देण्यासारखं शिवसेनेकडे फार काही उरलं नाही. त्यामुळे हिंदू मतदारांसाठी भाजपने गेल्या साडेचार वर्षांत केलं काय, असा प्रश्न विचारुन आपल्या हिंदू मतांची टक्केवारी वाढवणं शिवसेनेसाठी सोयीचं आहे," असं सुजाता आनंदन यांनी सांगितलं.

"युती करावी लागली तरी शिवसेनेसाठी हिंदुत्वाचा मुद्दा फायद्याचाच आहे. हिंदू व्होट शेअर वाढवून भाजपला बॅकफूटवर नेण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असले. स्वबळाची कितीही घोषणा केली तरी एकट्यानं सत्तेत येणं शिवसेनेला शक्य नाही. शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यास शिवसेना-भाजपलाही सोबत जावं लागेल. त्यामुळे जागावाटप किंवा सत्तेतील भागीदारीमध्ये भाजपला कोंडीत पकडण्यासाठी सेनेला मंदिराचं राजकारण फायदेशीर ठरेल," असंही सुजाता आनंदन यांचं म्हणणं आहे.

भाजपवर दबाव वाढविण्याची भूमिका

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून या दौऱ्यामागची भूमिका आधोरेखित करताना अयोध्येची वारी राममंदिर प्रश्नी झोपलेल्या कुंभकर्णास जागं करण्यासाठी होती, पंढरपूरची वारी मरगळ आलेल्या महाराष्ट्राला जागं करण्यासाठी आहे, असं म्हटलं आहे. मात्र मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थानमध्ये भाजपच्या पराभवानंतर बदललेल्या राजकीय पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याकडे पाहिले जात आहे.

या निकालानंतर भाजपला मित्रपक्षांची गरज भासणार, असं निरीक्षण राजकीय विश्लेषक नोंदवत आहेत. रविवारी बिहारमधल्या जागावाटपाबाबत भाजपने नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दल आणि रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षासमोर नमतं घेतल्याचं चित्र दिसून आलं.

फोटो स्रोत, TWITTER

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

बिहारमधल्या जागावाटपावरुन ज्या घडामोडी झाल्या, त्याचं प्रतिबिंब महाराष्ट्रातही पडेल, असं मत ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी व्यक्त केलं. "मात्र हिंदुत्वाच्या, मंदिराच्या राजकारणाचा शिवसेनेला किती फायदा होईल याबद्दल मला शंका आहे. कारण पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये राम मंदिराचा मुद्दा फारसा प्रभावी ठरला नाही. त्यामुळे तोच मुद्दा लावून धरल्यामुळे शिवसेनेला राजकीय लाभ होणार नाही. अर्थात, भाजपचाच हिंदुत्वाचा मुद्दा वापरुन त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न मंदिराच्या राजकारणातून शिवसेना करत आहे, हे नक्की," असंही अकोलकर यांनी म्हटले.

पंढरपूर, सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील दुष्काळाचा मुद्दा या दौऱ्याच्या निमित्ताने 'सामना'च्या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकात भाजपला सर्वाधिक फटका शेतकऱ्यांच्या नाराजीचा बसला होता. हे लक्षात घेऊन पंढरपूरमध्ये शिवसेना शेतकऱ्यांच्या प्रश्नांनाही हात घालण्याचा प्रयत्न करत आहे.

सत्तेत राहूनही विरोधकांची भूमिका निभावण्याचा समतोल साधणं एव्हाना शिवसेनेला जमलं आहे. आता महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे प्रश्न आणि हिंदुत्व अशी सांगड घालण्याच्या प्रयत्नात शिवसेना आहे. पंढरपूर हे त्याचंच प्रतीक म्हणता येईल.

कारण पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांमध्ये महाराष्ट्रभरातून येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र इथलं अजून एक वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे सर्वसमावेशकता. पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्याची जात, धर्म, पंथ विचारला जात नाही. मात्र महाराष्ट्रामध्ये धर्मनिरपेक्षतेची व्याख्या प्रत्यक्षात आणणाऱ्या पंढरपूरला शिवसेना राजकारणासाठी हिंदुत्वाच्या भगव्या रंगात रंगवत आहे का, या प्रश्नाचा विचार करणं गरजेचं आहे.

हे वाचलतं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)