पहिला 'इंडियन आयडॉल' अभिजित सावंत सध्या काय करतो?

अभिजित सावंत

फोटो स्रोत, FACEBOOK

फोटो कॅप्शन,

अभिजित सावंत

इंडियन आयडॉल या गाण्याच्या स्पर्धेचा 10 व्या सिझनचा विजेता काल घोषित करण्यात आला. सलमान अली याला 10वा इंडियन आयडॉल होण्याची संधी मिळाली. 2005 साली पहिल्या सिझनमध्ये अभिजित सावंतला पहिला इंडियन आयडॉल झाल्यानंतर रिअॅलिटी शोकडे देशाचे अधिक लक्ष गेले.

रिअलिटी प्रोग्रॅम्सची मालिका देशात सुरू झाल्यानंतर हिंदीसह विविध भाषांमध्ये असे कार्यक्रम, स्पर्धा आयोजित होऊ लागल्या.

इंडियन आयडॉलचे दहा सिझन झाल्यानिमित्ताने पहिले आयडॉल अभिजित सावंत यांनी बीबीसी मराठीकडे आपल्या आजवरच्या प्रवासाबद्दल मत व्यक्त केलं. गेल्या 13 वर्षांमध्ये देशामध्ये झालेले बदल पाहिले की विविध स्पर्धा, कार्यक्रम, प्रेक्षक आणि समाजमाध्यमांमध्ये बदल झाल्याचं दिसतं असं ते म्हणतात.

त्यांच्या मते,"सोशल मीडियाचा उदय हा गेल्या दशकातील सर्वात मोठा बदल आहे. सोशल मीडियामुळे स्पर्धकांना लोकांपर्यंत जाणं आणि लोकांना स्पर्धकांपर्यंत पोहोचणं सोपं झालं आहे. अर्थात या काळामध्ये अनेक रिअॅलिटी शो सुरू झाल्यामुळे एका कार्यक्रमावर लक्ष केंद्रीत करणं लोकांना कठीण जातं." अभिजित सावंत काही त्याचे गाण्याचे कार्यक्रम होतात तसेच तो गाण्याच्या स्पर्धांमध्ये जज आहे.

अभिजित सावंत पुढे म्हणाले,"2005 साली स्पर्धा, जिंकून येणं, त्यानंतर मिळालेला प्रतिसाद हे सगळं अगदीच अनपेक्षित होतं. एका नव्या जगाचा उंबरठा मी ओलांडला होता. तो सगळा काळच आपल्या देशासाठी संक्रमणाचा होता. कित्येक लोकांच्या आठवणी त्या सिझनशी जोडलेल्या आहेत.

फोटो स्रोत, FACEBOOK

आजही कोणी भेटले की आपल्या 2005च्या आठवणी सांगितल्या जातात. मध्यंतरी एका व्यक्तीने सिनेमा पाहात असताना मध्यंतरात सर्वांसमोर जाऊन कोणीतरी मोठ्याने अरे अभिजित सावंत जित गया असं जाहीर केलं होतं असं सांगितलं. हा सर्व भारी अनुभव होता."

लहान मुलांच्या रिअॅलिटी शोमध्ये त्यांना त्रास होतो, किंवा त्यांना योग्य प्रकारे वागवले जात नाही असा समज आहे. त्यावरही सावंत यांनी मत मांडले आहे.

ते म्हणतात, "लहान मुलांना गाण्याच्या स्पर्धांमध्ये त्रास होतो असा एक पूर्वग्रह पसरलेला आहे. मी जेव्हा आजची लहान मुले पाहातो तेव्हा ती आमच्या पिढीपेक्षा जास्त प्रगत वाटतात. म्हणजे आम्ही 20-22 वर्षांचे असताना जी समज होती, जो सराव होता तो आता 15-16 वर्षे वयाच्या मुलांकडे असल्याचं दिसतं. मी तर या स्पर्धेकडे एक उंबरठा म्हणून पाहतो.

फोटो स्रोत, Getty Images

या स्पर्धा म्हणजे अंतिम ध्येय नाही तर आता तुमची जगातील स्पर्धेत तयारी झाली असा त्याचा अर्थ आहे. परंतु बहुतांशवेळा मुलांना मी स्पर्धेत उतरलो म्हणजे पहिला आलोच पाहिजे असं वाटतं. पण पहिलं येण्यासाठी ही स्पर्धा नाही. आपली तयारी किती आहे हे ओळखण्याची ही स्पर्धा आहे. एकदा ते समजलं की आपण पुढच्या तयारीला लागावं ही अपेक्षा आहे. त्यामुळे रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होणाऱ्या लहान मुलांचं किंवा इतरांचंही समुपदेशन व्हावं असं मला वाटतं. या स्पर्धा म्हणजे करिअरचा शेवट नाही. हे त्यांना स्पर्धेआधीच सांगितलं पाहिजे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)