मोदी-फडणवीस सरकारच्या अपयशात शिवसेनाही भागीदार- उद्धव ठाकरे यांच्यावर विरोधकांची टीका

देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

पंढरपूर येथे झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी मित्रपक्ष भारतीय जनता पार्टीवर टीका करण्याचा एकही मुद्दा सोडला नाही. या भाषणामध्ये राम मंदिरापासून पीकविमा घोटाळ्यापर्यंत सर्व मुदद्यांवर त्यांनी भाष्य केलं. मात्र शिवसेना केवळ आपल्या फायद्यासाठी राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे.

शिवसेना गेली साडेचार वर्षे सत्तेत राहून भारतीय जनता पार्टीवर टीका करण्याचे काम करत आहे. परंतु शिवसेना राजीनामा देऊन युतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेत नाही याची आठवण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केली आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

"रफाल घोटाळ्यामुळे सरकारचं बिंग फुटलं. ज्यांना अनुभव नाही, अशा कंपनीला विमान बनवण्याचं कंत्राट दिलं. देशाचा पहारेकरी आहे, असं सांगणारे चोऱ्या करायला लागले. दुसरीकडे देशासाठी रोज सैनिक शहीद होतायत. त्यांच्या पगारवाढीचा प्रस्ताव केंद्र सरकारने नाकारला. लष्करी जवानाचा पगार वाढवत नाही. पण शस्त्रखरेदीत घोटाळा करता. किती पाप करता?" असा घणाघात उद्धव यांनी केला.

रफाल प्रकरणावरुन थेट आरोप केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराबाबतही भाजपाच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली. "दरवेळी निवडणुका आल्या की तुम्ही आम्हाला मूर्ख बनवता. 30 वर्ष होत आली, आज तुम्ही सांगता की हा मुद्दा न्यायालयात आहे. मग तुम्हाला आधी अक्कल नव्हती की हा मुद्दा कोर्टात जाईल म्हणून. संपूर्ण देशातले हिंदू तुम्ही अयोध्येत बोलावले. तुम्ही त्यांच्याकडून बाबरी पाडून घेतली. तिथं खूनखराबा झाला, बॉम्बस्फोट झाले. आजही कोर्टाच्या केसेस चालू आहेत. सोहराबुद्दीनचे आरोपी निर्दोष सुटले. पण बाबरी पाडणाऱ्यांना आजही समन्स येतायत. राम मंदिराच्या मुद्द्यावर तुम्ही गादी बळकावलीत. तर मग एक जाहिरात करा.. बाबरी पाडली.. होय मी लाभार्थी" अशा शब्दांमध्ये त्यांनी भाजपावर टीका केली.

याबरोबरच त्यांनी नीतिशकुमार आणि रामविलास पासवान यांच्यासमोर भाजपानं नमतं घेतल्याचा उल्लेख केला.

शिवसेना इतक्या लवकर काहीच करणार नाही - नवाब मलिक

रफाल घोटाळा असो वा पी. साईनाथांनी लक्षात आणून दिलेला पीकविमा घोटाळा. प्रत्येक मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट शब्दांमध्ये भाजपावर टीका केली आहे. सरकार काही करताना दिसत नाही म्हणूनच त्यांनी इतकी टोकाची भूमिका घेतलेली दिसते. मात्र शिवसेना सध्या काहीच करणार नाही. निवडणुका जवळ आल्यावर नोटिफिकेशन आल्यानंतर ते निर्णय घेतील. भाजपा पुन्हा सत्तेत आल्यावर शिवसेना राहाणार नाही याचा अंदाज आल्यामुळेच शिवसेना निवडणुका जाहीर झाल्यावर निर्णय घेईल.

शिवसेनेचा विरोध जनहितासाठी नाही तर स्वहितासाठी- सचिन सावंत

शिवसेनेचं गणित जनतेशी निगडीत नसून केवळ स्वतःच्या हिताचा आहे. ज्या प्रश्नांवर शिवसेना टीका करत आहे त्या सरकारच्या अपय़शात त्यांचाही वाटा आहे. तसं असतं तर त्यांनी कधीच पाठिंबा काढला असता. तसं त्यांनी केलं नाही कारण त्यांना सत्तेशिवाय काहीच दिसत नाही.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

उद्धव ठाकरे

शिवसेनेचे सगळे आरोप केवळ जागावाटपाच्या फॉर्म्युलावर आधारीत आहेत. बिहारमध्ये भाजपाला एक पाऊल मागे यावं लागलं हे सेनेला पथ्यावर पाडून घ्यायचं आहे. हा सगळा विरोध जनहिताचा नाही तर स्वहितासाठी आहे.

शिवसेनेच्या आरोपाबाबत भाजपाच्या प्रवक्त्यांशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)