फक्त ओला, उबरचं स्टिकर पाहून कॅबमध्ये बसत असाल तर सावधान

ओला, उबर, कॅबसेवा, भारत, दिल्ली

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

प्रतीकात्मक चित्र

शहरांत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ओला, उबर आपण सर्रास वापरतो. सोयीच्या आणि सुरक्षित म्हणून आजकाल या अॅपवरच्या कॅब्सना प्राधान्य दिलं जातंय. त्यामुळे त्यांच्यासारख्या काही मोजक्या अॅप कंपन्या आता भरवशाच्या तशाच लोकप्रियही झाल्या आहेत.

मात्र प्रत्येकवेळी या अपेक्षा पूर्ण होतीलच असं नाही. अलीकडेच दिल्लीत अशा कॅब्सच्या माध्यमातून एका टोळीने दोनशेहून अधिक लोकांची लूटमार केल्याचं एक प्रकरण उघडकीस आलं आहे.

ही टोळी तीन कॅब्स वापरायची आणि वेगवेगळ्या मार्गांवर प्रवाशांची ने-आण करायची. सुनसान, निर्जन ठिकाणी प्रवाशांना लुटण्याचं काम या टोळ्यांची माणसं करत असत.

नकतंच 22 डिसेंबरच्या रात्री दिल्लीनजीकच्या नॉयडामधील सेक्टर 39 मध्ये पोलिसांनी रात्री एका गाडीतील चार संशयास्पद व्यक्तींना अटक केली. पोलिसांच्या मते गेल्या वर्षभरापासून ही टोळी कॅबच्या माध्यमातून खतरनाक पद्धतीने प्रवाशांची लूटमार करायची.

22 डिसेंबरच्या उत्तररात्री पोलीस गस्त घालत असताना या टोळीच्या लोकांना पकडण्यात आलं. त्यावेळी सगळं प्रकरण उघड झालं.

ही टोळी लूटमार कशी करायची?

कॅब बुक केल्यानंतर ड्रायव्हरचा तपशील ग्राहकाच्या मोबाइलवर येतो. याव्यतिरिक्त कुठून कुठे जायचं आहे, हा मार्गही ग्राहकाच्या मोबाइलवर दिलेला असतो. अशावेळी लूटमार करणाऱ्या टोळीची माणसं कशी सुटू शकतात, असा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिक आहे.

बरेचदा ऑफिसहून घरी जायला उशीर झालेला असताना किंवा काही कारणानिमित्त बाहेर गेलेलं असताना, घरी परतताना कॅबची आवश्यकता भासते. अशावेळी विश्वासार्हतेसाठी सर्वसामान्य टॅक्सीऐवजी ब्रँडेड कॅबला प्रवासी प्राधान्य देतात.

फोटो स्रोत, Noida Police

फोटो कॅप्शन,

अशा कॅबद्वारे टोळी प्रवाशांची लूटमार करत असे.

मात्र असं करणं धोकादायक असू शकतं. ग्राहकांनी ठेवलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेत ही टोळी काम करत असल्याचं उघड झालं आहे.

ही टोळी बुक न झालेल्या कॅबमध्ये लूटमारी करायची. यासाठी ते रात्रीची वेळ साधायचे.

टोळीतल्या पाच जणांपैकी एक जण कॅब चालवण्याचं काम करायचा. दोन-तीन माणसं या कॅबमध्ये आधीच बसलेले असायचे. रात्री एकट्याने प्रवास करणारे लोक या टोळ्यांचं लक्ष्य असायचे.

रात्रीच्या वेळी घरी किंवा गंतव्यस्थळी जाऊ इच्छिणारी माणसं कॅब समजून या गाड्यांमध्ये बसायची.

लूटमारीआधी ही टोळी कॅबमध्ये इन्स्टॉल करण्यात आलेल्या ओला अॅप डिस्कनेक्ट करून टाकायची, जेणेकरून ती कॅब ते कुठे नेत आहेत, याचा सुगावा लागू नये. निर्जन ठिकाणी कॅब नेल्यानंतर प्रवाशाला लुटून त्याला कॅबबाहेर ते फेकून देत.

"एक वर्षापासून ही टोळी सक्रिय आहे. त्यांची लूटमार मोठ्या स्वरूपाची नसायची. हजार रुपये, पाचशे रुपये तसंच मोबाइल चोरून ही टोळी प्रवाशांना सोडून द्यायची. लूटमारीचं स्वरूप किरकोळ असल्यामुळे प्रवासी पोलीस तक्रार करण्याच्या फंदात पडणार नाहीत, असा टोळीचा विचार असायचा. ही टोळी किरकोळ मारहाण करायची. अगदीच आवश्यकता भासली तर लोकांना बंदुकीचा धाक दाखवायची," असं अमित किशोर श्रीवास्तव, ग्रेटर नॉयडा गौतम बुद्ध नगरचे DSP, यांनी सांगितलं.

टोळीला जेरबंद करणं होतं अवघड

दिल्ली, नॉयडा, गाझियाबाद, फरीदाबाद तसंच जवळच्या भागांमध्ये ही टोळी लूटमार करत होती. विविध भागात लूटमार घडत असल्याने एका ठिकाणी गुन्ह्याची नोंद करता येत नसे.

आरोपी लूटमारीसाठी मीडियाचाही वापर करायचे. लूटमार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी याबाबत कुठे बातमी छापून आलेली नाही तसंच टीव्हीवर दाखवण्यात आलेली नाही ना, याची शहानिशा ही टोळी करायची.

लूटमारीची बातमी झाली नसेल तर ही टोळी त्याच गाडीचा वापर करून पुन्हा कोणाला तरी लूटायची. लूटमारीबद्दल कुठे छापून आलं तर ही टोळी वेगळ्या गाड्यांद्वारे प्रवाशांना लूटत असत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

रात्रीच्या वेळी एकट्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ही टोळी लक्ष्य करते

"लूटमारीच्या घटना घडत असल्याच्या वार्ता पोलिसांपर्यंत पोहोचल्या होत्या. मात्र एक विशिष्ट टोळी यामागे कार्यरत असल्याचं समजलं नव्हतं. नॉयडा सेक्टर 39 मध्ये शनिवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास इन्स्पेक्टर उदय प्रताप सिंह यांना एका गाडीत चारजण संशयास्पद स्थितीत आढळले'," असं श्रीवास्तव यांनी सांगितलं.

पोलिसांनी गाडी थांबवून चौकशी केली. गाडीत बंदूक सापडली. पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी केल्यानंतर आरोपींनी दोनशेहून अधिकवेळा लूटमार केल्याचं कबूल केलं.

"या लूटमारीसंदर्भात जवळची राज्यं तसंच पोलीस ठाण्यांना कल्पना देण्यात आली आहे. ओला कंपनीलाही नोटीस देण्यात आली आहे," असं नोएडा सेक्टर 39चे SHO उदय प्रताप सिंह यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

प्रोफेशनल कॅब सेवा प्रसिद्ध आहे.

पोलिसांच्या मते या टोळीचा प्रमुख सोनू कचरी आहे, तो गाजियाबादला राहतो. त्याच्यासह या टोळीत लोकेश, प्रशांत, अतुल, अरुण आणि दीपक हेही आहेत. सोनू अद्यापही फरार आहे. हे सगळे आरोपी अल्पवयीन असून सगळे पंचविशीच्या आतले आहेत

लुटमारीतून कमावलेले 3800 रुपये, एक बंदूक, 17 मोबाइल, तीन लॅपटॉप, दोन गिटार, तीन सोन्याच्या साखळ्या, दोन अंगठ्या आणि तीन गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मॅक्सीकिलर गँग

लोकांना विश्वसनीय ब्रँडच्या कॅबमध्ये बसून अशाप्रकारचे गुन्हे होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 12 वर्षांपूर्वी अशाच प्रकारे एक टोळी पकडण्यात आली होती. ही टोळी प्रवाशांना लुटून त्यांची हत्या करून शव फेकून द्यायची. या गुन्ह्यात 9 जणांना न्यायालयाने जन्मठेप सुनावली होती.

ही गँग गुरुग्राम, दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सक्रिय होती. 25 पेक्षा अधिक लोकांची त्यांनी हत्या केली होती. त्यांची इतकी दहशत होती की लोक त्यांना 'मॅक्सीकिलर गँग' म्हणू लागले होते.

गुरुग्राममधील एक युवक अचानक गायब झाल्यानंतर पोलिसांची नजर मॅक्सी कॅबचालकांवर गेली आणि मग हे आरोपी पकडले गेले. हे सर्व लोक वेगवेगळ्या जागी मॅक्सी कॅब चालवत असत. एकटा उतारु कॅबमध्ये बसला की त्याला गाडीच्या मागील सीटवर बसवत आणि निर्जन जागी त्याला दोरीने बांधून लुटत व नंतर त्याला ठार मारत असत.

फोटो स्रोत, Noida Police

फोटो कॅप्शन,

टोळीकडून ताब्यात घेण्यात आलेला ऐवज

या सर्व हत्या लूट करण्याच्या उद्देशानेच केल्या होत्या. कधीकधी तर फक्त दोन रुपयांपासून दहा रुपयांपर्यंत हत्या केल्याचे या गुन्हेगारांनी सांगितले.

त्यामुळे केवळ एखादा ब्रँड प्रचलित आहे म्हणून त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला जावा का असा प्रश्न उपस्थित झाला. रात्री वाहन न मिळाल्याने लोक अशा टॅक्सीमधून प्रवास करतात. यामध्ये खर्च कमी येतो आणि कॅब बुक करण्याचा अवधीही वाचतो.

मात्र ही सुविधा मोठ्या घटनांना आमंत्रण देऊ शकते कारण गुन्हा घडल्यानंतर आपल्याकडे गाडीचा नंबर नसतो किंवा ड्रायव्हरची ओळख पटेल असे काहीही शिल्लक नसते.

कॅब घेताना सावधगिरी कशी बाळगावी?

गुन्हे होतात म्हणून आपण आपली कामं थांबवू शकत नाहीत. रात्री उशिरापर्यंत ऑफिस आणि कार्यक्रमांमुळे बाहेर येणं-जाणं होतं. अशा वेळेस कॅबने प्रवास करावा लागला तर काही गोष्टी लक्षात ठेवता येतील.

  • याबाबत इन्सपेक्टर उदय प्रताप सिंह यांच्या मते नेहमी रस्त्यावरून जाणाऱ्या कॅब पकडणाऱ्या लोकांबरोबर अशा घटना घडतात. त्यामुळे नेहमी बुकिंग करून कॅब बोलवावी. जर कॅब बुक केली नाही तर गुन्हेगारांना पकडणं अवघड होईल, तसेच कॅब सर्व्हिस याची जबाबदारी घेणार नाही.
  • बुकिंगविना घेतलेल्या कॅबमुळे त्या कंपनीच्या अपवर ट्रॅक करता येणार नाही. अॅपशी डिस्कनेक्ट झाल्यास कॅब एखाद्या सामान्य कारसारखीच होते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

अॅपपासून डिस्कनेक्ट करून लूटमार करण्यात येते.

  • जर कधी कॅब घ्यावीच लागली तर गाडीचा नंबर जरूर लिहून घ्या तसंच गाडी आणि चालकाचा फोटो काढून ठेवा. ही सगळी माहिती एखाद्या ओळखीच्या माणसाला पाठवा.
  • कॅबमध्ये आधीच बसलेली व्यक्ती उतारूच असेल असं नाही. केवळ या आधारावर कॅबला सुरक्षित समजू नये.
  • शक्य होईल तसं कॅबमध्ये बसून चालकासमोरच कॉल करून कुणाला तरी गाडीचा नंबर, ओळख, आणि मार्ग याबद्दल सांगावं. तुम्ही GPSच्या सहाय्याने आपलं लोकेशनही शेअर करू शकता. यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये पकडलं जाण्याची भीती वाढेल आणि गुन्हे करण्यापासून ते दूर राहातील.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)