आसामच्या बोगीबील पुलाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन: सर्वांत लांब डबलडेकर ब्रिजचं महत्त्व

  • दिलीप कुमार शर्मा
  • बीबीसी हिंदीसाठी, गुवाहाटीहून
व्हीडिओ कॅप्शन,

आसामचा डबलडेकर बोगीबील ब्रिज - पाहा व्हीडिओ

आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीवरच्या डबलडेकर पुलाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण झालं. रस्ते आणि रेल्वे अशी दुहेरी वाहतूक करणारा हा 'बोगीबील ब्रिज' देशातला सर्वांत लांब डबलडेकर पूल आहे.

1. 1997 मध्ये तत्कालीन पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या हस्ते पुलाची पायाभरणी करण्यात आली. पण काही कारणास्तव कामाला सुरुवात होण्यास विलंब झाला.

2 2002 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात या पुलाच्या कामाला सुरुवात झाली. आणि अखेर आज तब्बल 16 वर्षांनंतर त्यांच्या 94व्या जन्मदिनी या पुलाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होत आहे.

3 रेल्वे आणि रस्ता अशी वाहतुकीची व्यवस्था असणारा देशातला सगळ्यांत मोठा पूल आहे, असं नॉर्थइस्ट फ्रंटियर रेल्वेचे मुख्य प्रवक्ते प्रणव ज्योती शर्मा यांनी सांगितलं.

4. हा डबलडेकर पूल 4.94 किलोमीटर लांबीचा आहे. भारतातला सगळ्यांत लांब डबलडेकर पूल आहे.

5. 5,920 कोटी रुपये खर्च करून या पुलाची उभारणी करण्यात आली आहे.

6. ब्रह्मपुत्रा नदीवर हा पूल बांधण्यात आला आहे. या प्रदेशात प्रचंड पाऊस पडतो तसंच हा भाग भूकंपप्रवण क्षेत्रात येतो. त्यामुळे इथे पुलाची उभारणी करणं मोठं आव्हान होतं. हा पूल रिश्टर स्केलवर 7.0 पर्यंतच्या भूकंपाचा सामना करू शकतो, असं आसामच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर सांगितलं.

फोटो स्रोत, Twitter / @sarbanandsonwal

फोटो कॅप्शन,

बोगीबील पूल

7. तिनसुकिया-नाहरलागून इंटरसिटी एक्स्प्रेस या ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा कंदील दाखवणार आहेत. त्यानंतर हा पूल औपचारिक वाहतुकीसाठी खुला होईल. ही ट्रेन आठवड्यातून पाचवेळा धावणार आहे.

8. या पुलामुळे आसाममधील तिनसुकिया आणि अरुणाचल प्रदेशमधील नाहरलागून या शहरामधलं अंतर दहा तासांनी कमी होणार आहे.

9. या पुलाच्या खालच्या बाजूला दोन समांतर रेल्वे मार्ग आहेत. वरच्या बाजूला तीन पदरी रस्ता मार्ग आहे. रस्त्यावरची तसंच रेल्वेच्या माध्यमातून सातत्याने चालणारी वाहतूक पेलण्यास हा पूल सक्षम आहे.

10. अरुणाचल प्रदेश, आसामसह पूर्वांचलातील राज्यांमध्ये पायाभूत सुविधांमध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने हा पूल महत्वाचा मानला जात आहे. या पुलामुळे दिब्रूगढच्या सर्वांगीण विकासात मोलाची भर पडेल, अशी अपेक्षा केली जात आहे.

भारतीय लष्करासाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा

पण एवढंच या पुलाचं वैशिष्ट्य नाहीये. सुरक्षेच्या दृष्टिनंही 'बोगीबील ब्रिज' महत्त्वाचा आहे. आसाम आणि अरुणाचल प्रदेशला जोडणारा हा पूल भारतीय लष्करासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

अरुणाचलची सीमा चीनला लागून आहे. इथे चीनकडून कोणताही हालचाल झाल्यास भारतीय लष्कर या पुलाच्या माध्यामातून लवकरात लवकर अरुणाचल प्रदेशमध्ये पोहोचू शकते. 'बोगीबील ब्रिज'च्या खाली दोन रेल्वे लाइन टाकण्यात आल्या आहेत आणि त्याच्यावर तीन पदरी रस्ता आहे. या रस्त्यावरून सैन्याच्या अवजड वाहनं, रणगाड्यांची सहज वाहतूक करता येऊ शकते.

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

'बोगीबील ब्रिज' योजना 1985 मध्ये करण्यात आलेल्या आसाम कराराचा एक भाग असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र 'बोगीबील ब्रिज'ची मागणी सर्वांत प्रथम 1965 साली करण्यात आली होती.

1962च्या चीनी आक्रमणानंतर डिब्रूगढच्या जवळ ब्रह्मपुत्रा नदीवर पूल बनविण्याच्या मागणीने जोर धरला होता.

दिब्रुगढमधल्या इस्टर्न आसाम चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीचे अध्यक्ष भूदेव फुकन यांनी सांगितलं, "चीनी आक्रमणाच्या वेळी चीनी सेना आसामच्या तेजपूरपर्यंत आली होती. त्यांनी सरकारी कार्यालयासह स्टेट बॅंकेच्या शाखांमध्येही आग लावली होती. तेव्हा इथल्या लोकांनी ब्रह्मपुत्रेवर पूल बांधण्याची मागणी केली होती. 1965 मध्ये जेव्हा केंद्रीय कृषी मंत्री जगजीवन राम डिब्रुगढच्या दौऱ्यावर आले होते, तेव्हा इस्टर्न आसाम चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीने त्यांना एक लेखी निवेदन दिलं होतं."

संरक्षण आणि सामरिक तज्ज्ञ रुपक भट्टाचार्य यांनी म्हटलं की या पुलामुळे सेनेला लामबंदी आणि फॉरवर्ड भागात दळणवळण करणं सोपं जाईल. भारतीय लष्कर आता अरुणाचल प्रदेशाच्या शेवटच्या टोकापर्यंत जाऊ शकते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)