कोल्हापुरात ख्रिश्चनांच्या प्रार्थनासभेवर हल्ला, 12 जखमी #5मोठ्याबातम्या

चर्चचे प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, AFP

आज विविध महत्त्वाच्या वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे:

1. कोल्हापुरात ख्रिश्चनांच्या प्रार्थनासभेवर हल्ला

कोल्हापुरातील चंदगड तालुक्यातील कोवाड गावात एका प्रार्थनासभेवर 10-15 अज्ञात इसमांनी हल्ला केला आहे. त्यात 12 लोक जखमी झाल्याची बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोल्हापुरपासून अंदाजे 100 किमी अंतरावर असलेल्या या गावात एका भाड्याने घेतलेल्या खोलीत ही प्रार्थनासभा भरली होती. या सभेला अनेक महिलाही उपस्थित होत्या. तेवढ्यात काही अज्ञात लोकांनी हॉकी स्टीक, काचेच्या बाटल्या, दगड आणि सुऱ्यांनी हा हल्ला केला.

हा हल्ला उजव्या विचारसरणीच्या लोकांकडून झाल्याची शक्यता पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी वर्तवली. घटनेची सर्व बाजूंनी चौकशी सुरू असल्याचंही ते म्हणाले.

2. दुरसंचार कंपन्यांना 56 लाखांचा दंड

कॉल ड्रॉप आणि दूरसंचार सेवांच्या मानकांचं पालन न केल्याप्रकरणी दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) काही मोबाइल सेवा पुरवठादारांना गेल्या सहा महिन्यांमध्ये 56 लाख रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती केंद्र सरकारतर्फे नुकतीच संसदेत देण्यात आली. महाराष्ट्र टाइम्सने यासंदर्भात ही बातमी दिली आहे.

दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वाधिक दंड टाटा टेलिसर्व्हिसेसला (23 लाख) ठोठावण्यात आला आहे. याशिवाय आयडिया (व्होडाफोन-आयडिया) आणि BSNL या कंपन्यांना जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून या तिमाहीत कॉल ड्रॉपसाठी दंड ठोठावण्यात आला आहे.

3.यवतमाळ-कळंब रस्त्यावर झालेल्या अपघातात 11 ठार

यवतमाळ कळंब रोडवर चापर्डानजीक ट्रक आणि क्रुझर जीप यांच्यात जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात 11 जण ठार तर सात जण जखमी झाल्याची बातमी लोकसत्ताने दिली आहे.

सोमवारी रात्री 10 च्या सुमारास ही घटना घडली. अपघातात जखमी झालेले सगळेजण कळंब तालुक्यातील पारडी गावातील रहिवासी होते. जखमी झालेले लोकही पारडीचे आहेत अशी माहिती मिळाली आहे.

क्रुझर जीपमधून प्रवास करणारे लोक यवतमाळमध्ये कामासाठी आले होते. मात्र या भीषण अपघातात हे सर्व 11 प्रवासी ठार झाले आहेत. अपघातातील जखमींना कळंब येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

4. नॉयडात सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करण्यास मनाई

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

उत्तर प्रदेशातील एक महत्त्वाचं औद्योगिक क्षेत्र असलेल्या नॉयडात मुस्लीम कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा केल्यास त्या कंपनीला जबाबदार ठरवलं जाईल, अशी नोटीस उत्तर प्रदेश पोलिसांनी पाठवली आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार मागच्या आठवड्यात पोलिसांनी ही अधिसूचना जारी केली आहे.

आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेता धार्मिक आणि सामाजिक शांततेसाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं स्पष्टीकरण उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली आहे.

या नोटिशीमुळे सर्व उद्योजकांमध्ये काळजीचं वातावरण आहे. यासंदर्भात कंपनीच्या उच्चाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. कंपनीला जबाबदार ठरवण्याबाबतच्या कलमाबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.

5.GST एका पातळीवर आणण्याचे प्रयत्न- अरुण जेटली

केंद्र आणि राज्य सरकार वस्तू आणि सेवा कराला एका समान पातळीवर आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार 28%च्या वर्गवारीतून बहुतांश वस्तू वगळण्यात येणार असून 12% आणि 18% या वर्गवारीचं विलिनीकरण होणार असल्याचंही ते पुढे म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images

अर्थमंत्री हे GST परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. मात्र 12% आणि 18% या वर्गवारीचं विलिनीकरण होऊन किती टक्के होणार याबाबातचं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं नाही.

"एक सुवर्णमध्य साधला जाईल," असं विधान त्यांनी केलं. अनेक करतज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ GSTचा दर 15% करण्याबाबत सरकारला सूचना देत आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)