येशू ख्रिस्तानं श्रीनगरमध्ये घालवले होते अखेरचे दिवस?

येशू ख्रिस्त

जुन्या श्रीनगरमधली रौजाबल नावाने ओळखली जाणारी इमारत. इथे कायम सुरक्षा दलांचा जागता पहारा असतो. या सैनिकांना कधीमधी दहशतवादी हल्ल्यांचा, असंतुष्ट कश्मिरी तरुणांच्या रोषाचा सामना करावा लागतो. या परिसरात अस्वस्थता असली, तरी पर्यटक विशेषतः परदेशी पर्यटक रौजाबलला भेट द्यायला आवर्जून येतात. असं काय आहे या इमारतीमध्ये?

शिक्षेपासून वाचून येशू ख्रिस्तानं आपले अखेरचे दिवस इथेच घालवले होते, अशी एक आख्यायिका सांगितली जाते. याच कारणामुळे श्रीनगरमधल्या रौजाबल इमारतीमध्ये येशू ख्रिस्ताची मजार बनविण्यात आली आहे. त्यामुळेच अनेक परदेशी पर्यटकांसाठी ही जागा श्रद्धास्थान बनली आहे.

गेल्यावेळेस आम्ही जेव्हा रौजाबल कुठे आहे, हे पहायला गेलो होतो तेव्हा टॅक्सीचालकानं त्या भागातल्या वेगवेगळे दर्गे आणि मशिदी दाखवत फिरवलं. शेवटी विचारत विचारत येशू ख्रिस्ताच्या त्या चर्चित मजारीपर्यंत पोहोचलो. एका गल्लीच्या कोपऱ्यावर रौजाबलची दगडी इमारत आहे.

या इमारतीच्या दरबानाने मला आत नेले. लाकडाने बनवलेली एक खोली मला दाखवली. या खोलीत काचेच्या तावदानामागे हिरव्या रंगाच्या जाळीने आच्छादलेली एक कबर मी पाहिली.

दोन हजार वर्षांपूर्वीची गोष्ट

साधारणतः दोन हजार वर्षांपूर्वी सुळावर चढविण्याच्या शिक्षेतून वाचून येशू ख्रिस्त काश्मिरमध्ये आले होते आणि इथेच त्यांनी आपला देह ठेवला होता, असा एक मतप्रवाह आहे. आधुनिकतावादी ख्रिश्चन, उदारमतवादी मुसलमान आणि 'दा विंची कोड'चे समर्थक रौजाबलामध्ये येशूचीच मजार असल्याचे मानतात. मात्र ही मजार मध्ययुगीन मुस्लिम धर्मगुरु यूजा आसफ यांचा मकबरा आहे, असे इतिहासकार सांगतात.

रियाज नावाची व्यक्ती आणि त्याचे कुटुंबिय या मजारची व्यवस्था पाहतात. इथंच येथू ख्रिस्ताचं दफन झाल्याच्या कथेवर त्यांचा विश्वास नाही. त्यांच्या मते ही गोष्ट इथल्या स्थानिक दुकानदारांनी पसरवली आहे.

"इथे एक परदेशी प्रोफेसर आले होते. त्यांनी येशूच्या अखेरच्या दिवसाची गोष्ट सांगून ही त्यांचीच मजार असल्याचं बोलता बोलता सांगितलं. दुकानदारांनी विचार केला, की आपल्या व्यवसायासाठी ही चांगली गोष्ट आहे. यांमुळे अधिक पर्यटक येतील," रियाजनं सांगितलं.

त्यानंतर या मजारीबद्दल 'लोनली प्लॅनेट'मध्ये लिहून आलं आणि पर्यटकांचा ओघ वाढला, रियाज सांगत होता. एकदा एका परदेशी पर्यटकाने मकबऱ्याचा एक तुकडा तोडून नेल्याचंही त्यांनं व्यथित होऊन सांगितलं.

येशूची ओढ

रियाजनं एका ऑस्ट्रेलियन जोडप्याचाही किस्सा सांगितला. लोनली प्लॅनेटचा अंक हातात घेऊन हे जोडपं येशूची मजार शोधत आलं होतं. त्यांच्या भारत दौऱयात येशूची मजार हे ठिकाण आवर्जून पाहण्याच्या यादीत त्यांनी सामील केलं होतं.

त्यावेळी मजार बंद होती, त्यामुळे त्यांनी इमारतीच्या बाहेरच त्यांचा फोटो काढायला लावल्याचं रियाजनं सांगितलं.

येशूशी संबंधित अन्य कथा

श्रीनगरच्या उत्तर भागातील पर्वतीय प्रदेशात एका बौद्ध विहाराचे अवशेष आहेत. या विहाराची माहिती लोनली प्लॅनेटच्या अंकात नव्हती. पण या विहाराशीदेखील येशू ख्रिस्ताचा संबंध आल्याचं सांगितलं जातं. या ठिकाणी एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि प्रसिद्ध बौद्ध संमेलन भरवण्यात आलं होतं. या संमेलनामध्ये येशू ख्रिस्तानंही सहभाग घेतला असल्याची गोष्ट इथल्या सुरक्षा रक्षकानं सांगितली. त्या संमेलनाच्यावेळी येशू ख्रिस्त कुठे बसले होते, हेसुद्धा त्यानं अधिकारवाणीनं सांगितलं.

येशू ख्रिस्ताबद्दलच्या या गोष्टी भारतात साधारणतः १९ व्या शतकाच्या दरम्यान प्रचलित व्हायला सुरुवात झाली. यादरम्यान भारतातील बुद्धिजीवी वर्ग बौद्ध आणि ख्रिश्चन धर्मातील साम्यस्थळं शोधण्याचा प्रयत्न करत होता. भारतात धर्मप्रसार करणारा ख्रिश्चन समुदायही येशूचे काही संदर्भ भारताशी जोडता येतील का, हे पाहत होता.

येशूच्या आयुष्यातील काही वर्षांचा संदर्भ लागत नाही. वयाच्या १२ व्या वर्षापासून ते तिशीपर्यंत येशू ख्रिस्त कोठे होते, हे कोणालाच माहित नाही. ते या काळात भारतात बौद्ध धर्माचे ज्ञान प्राप्त करत असल्याचं काही लोकांचं म्हणणं आहे. अर्थात, या तर्काला अभ्यासक मान्यता देत नाहीत.

(बीबीसी हिंदीवर सॅम मिलर यांचा हा लेख पहिल्यांदा २०१० मध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता.)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)