महिलांनो, छुप्या कॅमेऱ्यांपासून स्वत:ला कसं वाचवाल?

छुपे कॅमेरे, गोपनीयता, मुंबई

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

छुपे कॅमेऱ्यांपासून सावध राहा

आपलं घर ही सर्वात सुरक्षित जागा मानली जाते. पण जिथे आपण राहतो, तिथंच कोणी आपल्यावर नजर ठेवून असेल, आपल्या हालचाली छुप्या कॅमेऱ्यातून रेकॉर्ड करत असेल तर?

अशीच एक घटना मुंबईत घडल्याची माहिती समोर येते आहे. पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या तीन मुलींचं छुप्या कॅमेऱ्याच्या सहाय्यानं चित्रिकरण करणाऱ्या घरमालकाला गिरगाव परिसरातून डी. बी. मार्ग पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी स्थानिक वृत्तपत्रांना दिलेल्या माहितीनुसार, या मुली राहात असलेल्या खोलीत अॅडॅप्टरमध्ये कॅमेरा लपवला होता. त्याबाबत संशय आल्यानं एका मुलीनं अॅडॅप्टरवर कपडा टाकला. पण घरमालकानं खोलीत येऊन मुलींना तो कपडा काढायला सांगितला. ते वागणं पाहून मुलींना संशय आला. इंटरनेटवर सर्च केल्यावर तो अॅडॅप्टर नसून छुपा कॅमेरा असल्याचं समजलं, तेव्हा मुलींनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली. पोलिसांनी अॅडॅप्टरमधला कॅमेरा जप्त केला असून घरमालकाला अटक केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

खिशाला लावलेल्या पेनातही कॅमेरा बसवलेला असू शकतो

मुंबईतली ही घटना समोर येण्याच्या काही आठवडे आधी, तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्येही अशीच घटना घडली होती.

चेन्नईत एका होस्टेलवजा घरात भाड्यानं राहणाऱ्या काही महिला आणि मुलींचं छुप्या कॅमेऱ्यांच्या सहाय्यानं चित्रिकरण करणाऱ्या घरमालकाला पोलिसांनी अटक केली. एका महिलेनं हेअर ड्रायरचा प्लग सॉकेटमध्ये लावला आणि प्लग तुटल्यामुळं तिला तिथं लपलेला कॅमेरा दिसून आला. त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलं.

केवळ सर्वसामान्य महिलाच नाही, तर अगदी कुणीही अशा छुप्या कॅमेऱ्याची शिकार होऊ शकतं. 2015 साली केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनाही एका मोठ्या स्टोरच्या चेंजिंग रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आढळून आला होता.

'हे सारं हादरवणारं'

ही घटना समजताच मुंबईत एकट्यानं राहणाऱ्या किंवा भाड्याच्या घरात राहणाऱ्या मुली आणि महिलांमध्ये चिंता आणि संतापाची भावना दिसून येते आहे.

गेली 11 वर्ष मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी भाड्याच्या घरात राहणाऱ्या पद्मा शिंदे यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं

"हे खूप भयानक आहे. आपलं स्वतःचं घर सोडून जेव्हा आपण इथे शहरात येतो, त्यावेळेला जिथे कुठे आपण राहातो, त्या जागेलाच आपलं घर मानतो. त्या जागेला घरपण द्यायचा प्रयत्न करतो. त्या घरात जर असं काही झालं तर ते खूप हादरवणारं आहे."

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

फ्रान्समधील एका घराचे दृश्य

"सतत ही भीती वाटू शकते की अरे, मला कुणी बघत तर नाहीये ना? माझ्यावर कुणी नजर तर ठेवून नाही ना? मी इथे सुरक्षित आहे का? त्यामुळंच सगळी काळजी घेतली पाहिजे." घरमालकांची आणि ज्या जागी तुम्ही राहता त्या जागेचीही आधीच नीट चौकशी करायला हवी, असं त्या सांगतात.

अॅडव्हर्टायझिंगमध्ये काम करणाऱ्या एस. के. धन्या मूळच्या मुंबईच्याच आहेत. पण रोजचा प्रवास कमी व्हावा म्हणून त्या आठ महिन्यांपासून काही मैत्रिणींसह सांताक्रूझच्या एका फ्लॅटमध्ये राहतात.

"मला नशीबानं आजवर कधी असा अनुभव आलेला नाही. मला हे शहर आजही सुरक्षित वाटतं. त्यामुळं अशा घटनांमुळे भीती वाटली नाही तरी काळजी तर वाटतेच. कुठे हॉटेलमध्ये एखाद्या दिवसासाठी राहायचं असेल किंवा कुठे काही दिवस मुक्काम करणार असेन तरी खोलीत शिरताच पहिल्यांदा सर्व जागा नीट तपासून पाहण्याची खबरदारी घ्यायलाच हवी. रूमच्या कोपऱ्यात, बाथरूममध्ये, वॉर्डरोबजवळ मी तपासून पाहते. टीव्हीवरच्या क्राईम शोजमध्ये पाहूनही तुम्हाला अंदाज येतोच की कुठे काही लपलेलं असू शकतं."

सायबर तज्ज्ञ कर्णिका सांगतात, "कुठल्याही महिलेच्या संमतीशिवाय कॅमेऱ्यानं तिचा फोटो काढणं किंवा व्हीडिओ काढणं आणि तो लोकांमध्ये पसरवणं हा कायद्यानं गुन्हा आहे. असं केल्यास आयटी अक्टच्या कलम 67-अ आणि 66-ई नुसार, भारतीय दंडविधानाच्या कलम 354 अंतर्गत खटला दाखल केला जाऊ शकतो. आरोपीला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि आर्थिक दंड ठोठावला जाऊ शकतो.

छुप्या कॅमेऱ्याचा शोध कसा घ्याल?

सायबर एक्सपर्ट्सनी दिलेल्या सल्ल्यानुसार, एखाद्या खोलीत कॅमेरा लपवलेला आहे की नाही, हे शोधायचं असेल तर सर्वात आधी असे छोटे कॅमेरे कुठे लपवलेले असतात, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

छुप्या कॅमेऱ्यांद्वारे होणाऱ्या चित्रीकरणाविरोधात दक्षिण कोरियात महिलांनी चळवळ

आरशाच्या मागे, दरवाजात, भिंतीच्या एखाद्या कोपऱ्यात, छतावर, एखाद्या दिव्याच्या आत, लँपशेडमध्ये, टिश्यू पेपरचा डबा, स्मोक डिटेक्टर, फोटो फ्रेम किंवा एखाद्या फुलदाणीतही कॅमेरा लपवून ठेवलेला असू शकतो.

1. सतर्कता सर्वात महत्त्वाची. कधीही पब्लिक टॉयलेट, चेंजिग रूम किंवा हॉटेलमधल्या खोलीत जाल, तेव्हा आधी चारी बाजूंना नीट पाहा. आसपास ठेवलेलं सामान आणि छपराच्या कोपऱ्यांवरही नजर टाका.

2. कुठे एखादं छिद्र दिसलं तर तिथे कॅमेरा तर लपलेला नाही ना? हे नीट निरखून पाहा.

3. कुठे एखादी अनावश्यक तार दिसली तर ती कुठे जाते आहे, कशाला जोडलेली आहे हे पाहा. ती एखाद्या कॅमेऱ्यापर्यंत किंवा रेकॉर्डिंग डिव्हाईसपर्यंत जात असेल तर त्याचा तपास लागेल. पण आजकाल बहुतेक कॅमेऱ्यात कोणतीही तार नसते. बॅटरीवर चालणारे आणि कुठेही सहज चिकटवता येतील असे कॅमेरे तासनतास रेकॉर्डिंग करू शकतात. त्यांचा शोध घेणं सोपं नसतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

छुप्या कॅमेऱ्यांचा सर्वाधिक त्रास महिलांना होतो.

4. मिरर टेस्टः चेंजिंग रूम, बेडरूम, बाथरूम सगळीकडे आरसे लावलेले असतात. ज्यांच्यासमोर आपण अनेकदा कपडे बदलतो, टॉयलेटला जातो. पण आरशाच्या पलीकडून, कॅमेऱ्याद्वारा कोणीही आपल्यावर नजर ठेवत असू शकतं. त्यामुळं आरसे तपासून पाहायला हवेत. त्यासाठी आरशावर बोट ठेवून पाहा. तुमच्या बोटात आणि आरशातल्या बोटाच्या प्रतिबिंबात थोडं अंतर राहायला हवं. जर असं अंतर राहात नसेल, तर त्या आरशात काही गडबड असू शकते.

5. खोलीचा लाईट बंद करून पाहा. कुठे एलईडी चमकत असेल, तर तो कॅमेरा असू शकतो. काही कॅमेऱ्यांमध्ये नाईट व्हिजन सुविधा असते. म्हणजे ते अंधारातही हालचाली रेकॉर्ड करू शकतात. अशा कॅमेऱ्यांत एलईडी इंडिकेटर असतो. अंधारात तो चटकन दिसू शकतो.

6. लाईट बंद केल्यावर एखाद्या टॉर्चच्या किंवा मोबाईलच्या फ्लॅशलाईटच्या सहाय्यानं सगळे कोपरे तपासून पाहा. अशावेळी कॅमेऱ्याच्या काचेवरून तो प्रकाश परावर्तित होऊ शकतो. त्यामुळं एखाद्या ठिकाणाहून प्रकाश परावर्तित झाला, तर तिथे नीट तपासून पाहा.

7. अप आणि डिटेक्टर - एखाद्या ठिकाणी कॅमेरा, रेकॉर्डर किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरण लपवलं आहे की नाही, हे तपासण्यासाठी काही मोबाईल अप मदत करू शकतात. अशी अप्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमधला फरक दर्शवतात. पण सायबर एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार अशी अप्स फेकही असू शकतात. ती तुमच्या फोनमध्येच व्हायरस सोडू शकतात. मार्केटमध्ये काही डिटेक्टर डिव्हायसेसही उपलब्ध आहेत, पण ती फारच महाग असतात.

8. एखाद्या ठिकाणी छुप्या कॅमेऱ्याचा तपास लागला तर घाबरू नका. पोलिसांना लगेच संपर्क करा. कॅमेऱ्याला स्पर्श करू नका कारण त्यावर आरोपीच्या फिंगरप्रिंट असू शकतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)