रामदेव बाबा म्हणतात, पुढचा पंतप्रधान कोण होईल माहिती नाही #5मोठ्याबातम्या

रामदेव आणि नरेंद्र मोदी Image copyright Getty Images

आजची विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या खालीलप्रमाणे:

1) पुढचा पंतप्रधान कोण होईल हे सांगू शकत नाही - रामदेव बाबा

सध्याची राजकीय परिस्थिती कठीण आहे. पुढील पंतप्रधान कोण असेल, हे आताच सांगू शकत नाही, असं सूचक वक्तव्य रामदेव बाबा यांनी केलं आहे. ते मदुराईमध्ये बोलत होते. अशी बातमी महाराष्ट्र टाइम्सने दिली आहे.

"मी राजकारणावर लक्ष केंद्रीत केलं नाही. मी कुणाचंही समर्थन किंवा विरोधही करत नाही. जातीय किंवा हिंदू भारत करण्याचा माझा उद्देश नाही. आम्हाला भारतासह हे जगही अध्यात्मिक करायचे आहे," असं रामदेव म्हणाले.

2014च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान नरेंद्र मोदींची तोंडभरून स्तुती करणारे योगगुरू बाबा रामदेव यांनी आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं विधान केलं आहे.

2) सोशल मीडिया वापरण्यासंदर्भात केंद्र सरकार आणणार नियम

सोशल मीडियावरील बेकायदेशीर माहिती पसरवणाऱ्यांचा छडा लावण्यासाठी केंद्र सरकार लवकरच एक कायदा आणणार आहे. यासंदर्भात केंद्रानं एक मसुदा प्रसिद्ध केल्याची बातमी द हिंदूनं दिली आहे.

Image copyright Getty Images

दरम्यान याआधी सुप्रीम कार्टानं दिलेल्या एका निकालाच्या आधारावरच माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे) सुधारणा नियम - 2018 हा कायदा आणला जात आहे.

इंटरनेटवरील बेकायदेशीर माहितीवर त्वरीत आळा घाला अशी ताकीद सुप्रीम कोर्टानं सरकारला दिली होती.

3) मराठा आरक्षण कोर्टात कितपत टिकेल याबाबत शंका - शरद पवार

राज्यात भाजपा सरकारकडून मराठा आरक्षण दिले गेलं आहे ते न्यायालयात किती टिकेल? याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शंका व्यक्त केली आहे.

102 व्या घटना दुरुस्तीतील तरतुदीचा अभ्यास करण्याची गरज असल्याचं सांगत तरतुदीतील मुद्दे सरकारनं लक्षात घेतले नसावेत, अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे, अशी बातमी ABP माझाने दिली आहे.

Image copyright Getty Images

यावेळी शरद पवार यांनी गांधी कुटुंबातील पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या हौतात्म्याचे उदाहरण देत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचं कौतुक केले. राहुल गांधी हेच देशाचं नेतृत्व करण्यास योग्य आहेत असंही ते म्हणालेत.

4) अंदमानमधल्या तीन बेटांचं नाव बदलणार

सुभाषचंद्र बोस यांच्या सन्मनार्थ मोदी सरकार अंदमान बेट समुहातील तीन बेटांची नावं बदलणार आहे. या बेटांची नावं स्वराज बेट, शहीद बेट आणि नेताजी सुभाष चंद्र बोस बेट अशी ठेवण्यात येणार आहेत. द प्रिंटने ही बातमी दिली आहे.

हॅवलॉक बेटाला स्वराज बेट, नील बेटाला शहीद बेट आणि रॉस बेटाला नेताजी सुभाष चंद्र बोस बेट अशी नावं देण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. ही तीनही बेटं अंदमान द्वीप समुहाचा भाग आहेत.

Image copyright Getty Images

येत्या 30 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी याची औपचारिक घोषणा करतील.

भाजपचे पश्चिम बंगालचे उपाध्याक्ष चंद्रकुमार यांनी एक महिन्यापूर्वी या संदर्भात एक पत्र नरेंद्र मोदी यांना दिलं होतं. अंदमान निकोबारचं नाव बदलून शहिद आणि स्वराज अशी नावं द्यावीत, असं त्या पत्रात म्हटलं होतं.

5) फेसबुकवरून जुळलेल्या प्रेमासाठी आईची हत्या

फेसबुकवरून जमलेल्या प्रेमसंबंधांमुळे 19वर्षीय एका तरुणीनं आपल्या आईची हत्या केली आहे. ही घटना तमिळनाडूत घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलीला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.

50 वर्षांच्या महिलेची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एस. सुरेश या तरुणीच्या प्रियकराला आणि आणखी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. अशी बातमी लोकसत्ताने दिली आहे.

त्यांचं वयं 16 आणि 17 असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही तरुणी थिरुवेल्लूरमधल्या अंजनेयपूरम येथे राहत होती. ती बीकॉमच्या दुसऱ्या वर्षात शिकत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Image copyright Getty Images

तरुणीची आई तिच्या एस. सुरेश याच्यासोबत असलेल्या नात्याला विरोध करत असल्याने तिने आईची हत्या केल्याचं सांगितलं. तर सुरेश याचं वयही 19वर्षे असून तो तंजावरला राहत होता. या दोघांची मागील वर्षी फेसबुकद्वारे ओळख झाली होती. ते अद्याप प्रत्यक्षात एकमेकांना भेटलेले नव्हते, मात्र फेसबुकद्वारे त्यांचं नातं घट्ट झालं होतं.

सुरेशनं तो म्हैसूरमध्ये आयटीत काम करत असल्याचं सांगितलं होतं. तर तरुणीने आपल्या आईला आपल्या या प्रेमप्रकरणाविषयी कल्पना दिली. मात्र आईने मुलीला अशाप्रकारे फेसबुकद्वारे झालेले प्रेम विश्वासार्ह नसतं असं सांगितलं. यापेक्षा अभ्यासावर लक्ष केंद्रित कर असं आईने मुलीला वारंवार सांगितलं होतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)