बाबा आमटे : कार रेसिंगपासून कुष्ठरोग्यांच्या सेवेपर्यंतचा जीवनप्रवास

बाबा आमटेंचं डुडल

फोटो स्रोत, Google

कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी आपलं आयुष्य समर्पित करणारे समाजसेवक बाबा आमटे यांचा 26 डिसेंबर हा जन्मदिन आहे. त्यांच्या कार्याची प्रचिती एवढी की गुगलनेही त्यांना डूडलच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. बाबांच्या आयुष्यातले वेगवेगळे टप्पे उलगडून दाखवणारा एक स्लाईड-शोच गुगलनं यानिमित्तानं केला आहे.

जमीनदार घराण्यामध्ये जन्मलेल्या, व्यवसायाने वकील असलेल्या मुरलीधर देवीदास आमटेंचा कुष्ठरोगी, आदिवासी, वंचितांसाठीचे 'बाबा' बनण्याचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

"गुगल टीमनं एक वर्षापूर्वी या संदर्भात आमच्याशी संपर्क साधला होता. आम्ही सर्वांनी त्यांना बाबा आमटे यांच्यावर गुगल डुडलसाठी होकार दिला. या निमित्ताने बाबांचं काम जगभर पोहोचलं आहे. आम्ही गुगलचे आभारी आहोत," अशी भावना या गुगल डुडलच्या निमित्ताने अनिकेत आमटे यांनी बीबीसी मराठी बोलताना व्यक्त केली आहे.

या निमित्ताने नवीन पिढीला बाबा आमटे समजतील अशी अपेक्षाही अनिकेत यांनी व्यक्त केली आहे.

बाबा आमटेंचा जन्म 26 डिसेंबर 1914 साली वर्धा जिल्ह्यातल्या एका जमीनदार कुटुंबात झाला होता. त्यांच्या आवडीनिवडीही तशाच उच्चभ्रू होत्या.

त्यांना वेगाने गाडी चालवायला प्रचंड आवडायचं. इंग्रजी चित्रपट पाहण्याचीही बाबा आमटेंना आवड होती. ते केवळ चित्रपट पहायचेच नाहीत तर त्यांची समीक्षाही लिहायचे. त्यांच्या समीक्षांना अनेकांनी पसंतीची पावतीही दिली होती.

वकिलीचं शिक्षण घेतल्यानंतर बाबा गांधीजींसोबत सेवाग्राम आश्रमात रहायला लागले. त्याचवेळी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेऊन त्यांनी तुरुंगवासही भोगला. त्यानंतर बाबा आमटेंनी स्वतःला समाजकार्यात गुंतवून घेतलं.

कुष्ठरुग्णांना सन्मानं जगता यावं यासाठी बाबा आमटेंनी आनंदवनची स्थापना केली. गडचिरोलीमधल्या हेमलकसामध्ये बाबांच्याच मार्गदर्शनाने डॉ. प्रकाश आमटे यांनी लोकबिरादरी प्रकल्पही सुरु केला.

फोटो स्रोत, Google

तिथल्या आदिवासींचा विकास हे लोकबिरादरीचं प्रमुख वैशिष्ट्य होतं. आमटे कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीनेही या कामात स्वतःला तितक्याच तन्मयतेनं झोकून दिलं आहे. बाबांचे चिरंजीव डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांची मुलं अनिकेत-दिगंत लोकबिरादरी प्रकल्पाची जबाबदारी सांभाळतात.

नवीन पिढी पुढं नेत आहे बाबांचा वारसा

कोणत्याही व्यक्तीला सन्मानाचं आयुष्य जगता आलं पाहिजे हा बाबांच्या कामामागचा विचार होता. तोच आम्ही आजही पुढे नेत आहोत. लोकबिरादरी प्रकल्पात आम्ही विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देतो तसंच त्यांच्यावर मोफत उपचारही करतो, असं अनिकेत आमटे यांनी सांगितलं.

इथे शिकलेले अनेक विद्यार्थी सरकारी अधिकारी बनले आहेत, पोलीस सेवेमध्ये आहेत. मात्र 99 टक्के विद्यार्थी पुन्हा इथंच काम करायला प्राधान्य देतात. बाबा आमटेंच्या विचार आणि व्यक्तिमत्त्वानं प्रभावित होऊन ही मुलं इथे काम करतात. आमच्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, असं अनिकेत आमटे म्हणतात.

"आपलं काम केवळ कुष्ठरुग्णांपुरतं मर्यादित न ठेवणं ही बाबांची दूरदृष्टी होती. जेव्हा मी त्यांना सांगितलं की मला आदिवासींसाठी काम करायचंय तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. बाबांनीच स्थापन केलेल्या आनंदवनच काम माझा मोठा भाऊ विकास सांभाळतो. लोकबिरादरीची स्थापना मी आणि माझी पत्नी मंदाकिनीने 1973 मध्ये केली," असं डॉ. प्रकाश आमटे सांगतात.

माध्यम कोणतंही असो, समाजाची सेवा घडणं गरजेचं आहे हा बाबांचा विचार होता. ते दहा वर्षें नर्मदा बचाव आंदोलनात काम करत होते. त्याकाळात ते आनंदवनमध्ये आले नाहीत, डॉ. प्रकाश आमटे आणखी माहिती देतात.

बाबा आणि प्रकाश आमटेंच्या आयुष्यातली साम्यस्थळं

हेमलकसामध्ये आदिवासी मुलांसाठी शाळा सुरू करण्यात आली होती. आज शेकडो मूलं तिथं शिक्षण घेत आहेत. डॉ. प्रकाश आणि त्यांच्या पत्नी मंदाकिनी आदिवासींसाठी आरोग्यसेवा चालवतात.

केवळ इथल्या माणसांसाठीच नाही तर प्राण्यांसाठीही त्यांच्या मनात करुणा आहे. आदिवासींनी शिकार केलेल्या जंगली जनावरांच्या पिल्लांसाठी प्रकाश आमटेंनी एक अनाथाश्रमच सुरु केला आहे.

गडचिरोलीच्या या भागात नक्षलवादाची समस्या आहे. त्यामुळे अनेक सुविधांचा इथं अभाव आहे. डॉ. प्रकाश आमटेंनी सांगितलं, आजपर्यंत इथे एक सुसज्ज हॉस्पिटल नाहीये. कधी-कधी 200 रुग्ण बाहेरच्या जागेत झोपायचे. आम्ही एक नवीन रुग्णालय बनवलं. आता इथं रुग्णांसाठी बऱ्यापैकी सोयी आहेत.

बाबांचा वारसा पुढे नेणाऱ्या डॉ. प्रकाश आमटेंचं अनेक बाबतीत आपल्या वडलांशी साधर्म्य आहे. त्यांच्या आयुष्यात 'सारख्या'चे काही योगायोगही आहेत.

म्हणजे बाबा आणि प्रकाश आमटे यांचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे 26 डिसेंबरला असतो. बाबांना 1985 साली रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. डॉ. प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांनाही 2008 मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

बाबांचा वारसा समर्थपणे पुढे नेला जात असल्याची ही एकप्रकारे पावतीही आहे.

(बीबीसी हिंदीसाठी देवीदास देशपांडे यांनी गडचिरोलीचा दौरा करून बाबा आमटेंशी संबंधित संस्थांची माहीती घेतली होती.)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)