भारतावरच्या सगळ्यांत मोठ्या हल्ल्याचा पर्दाफाश -NIA चा दावा

पोलीस

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन,

प्रातिनिधिक छायाचित्र

देशाच्या अनेक भागात छापे मारून भारतावरील हल्ल्याच्या एक मोठा कट उधळून लावल्याचा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIAने केला आहे. या प्रकरणी दिल्ली आणि उत्तर प्रदेशसह इतर भागातून काही संशयितांना अटक केल्याची माहिती NIA चे पोलीस महानिरीक्षक अलोक मित्तल यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे.

आत्मघातकी हल्ल्यांचा बीमोड करण्यासाठी सुरू असलेल्या अभियानानंतर हे अटकसत्र करण्यात आलं आहे.

NIA चे प्रवक्त्यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं की उत्तर प्रदेश आणि दिल्लीमधून पाच संशयित लोकांना अटक करण्यात आली आहे.

NIA च्या मते, "या गँगचा म्होरक्या इंटरनेटच्या माध्यमातून एका विदेशी हस्तकाशी संपर्कात होता. हे लोक कथित इस्लामिक स्टेटच्या मॉडेलने प्रेरित आहेत. त्यामुळे या लोकांनी हा कट का आखला हे स्पष्ट आहे. या लोकांनी आधीही असा कट आखला होता. मात्र त्याची अधिक माहिती सध्या उपलब्ध नाही."

NIA च्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार "अटक केलेल्या लोकांमध्ये एक महिलादेखील आहे. विशेष म्हणजे या टोळीत एक बॉम्ब तयार करणारी व्यक्तीही होती. या गटाने एका मोठ्या हल्ल्याची तयारी केली होती."

NIA ने दिलेली महत्वाची माहिती

 • NIA नं आतापर्यंत एकूण 16 जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यातील 10 लोकांना अटक करण्यात आली आहे. ते मूळचे दिल्ली किंवा उत्तर प्रदेशचे आहेत. तर आणखी सहा जणांची चौकशी सुरु आहे.
 • मूळचा अमरोहाचा असलेला मुफ्ती सुहैल हा या मॉडेलचा म्होरक्या आहे. तो अमरोहातील एका मशिदीत मौलवी म्हणून काम करायचा. तोच या सगळ्यांना वेगवेगळं सामान आणण्याचा आदेश देत असे. कुणाला भेटायचं, काय बोलायचं हे सर्व मुफ्ती सुहैलच ठरवत असे. आत्मघातकी हल्ल्याची त्यांची तयारी सुरु होती. त्यासाठी लागणारी जॅकेट्स बनवण्याचं काम अमरोहामध्ये सुरु होतं.
 • ज्या पद्धतीनं त्यांची तयारी सुरु होती, ते पाहता लवकरच हल्ल्याची योजना अंमलात आणण्याचा विचार दिसत होता. त्यातही रिमोटच्या पद्धतीनं बॉम्बस्फोट घडवणं आणि ते शक्य झालं नाही तर आत्मघातकी हल्ला करणं अशी दुहेरी योजना आखण्याचं काम सुरू होतं.
 • यासाठी त्यांनी स्वत: पैसा उभा केला. काही जणांनी घरातलं सोनं विकून हत्यारं आणि इतर साहित्याची खरेदी केली
 • त्यांनी आपसात संपर्क आणि संभाषण करण्यासाठी व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामचा वापर केला. हे मॉडेल ISIS वरुन प्रभावित असल्याचं दिसतंय.
 • आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 3 ते 4 महिने आधीपासून ही सगळी तयारी सुरु होती. हे लोक महत्वाची स्थळं, व्यक्ती आणि गर्दीच्या ठिकाणांवर हल्ला करण्याची योजना आखत होते.
 • एका पातळीवर आम्हाला या कटाची माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही काम सुरु केलं. आणि छापेमारी करुन या लोकांना ताब्यात घेतल्याचं NIA ने सांगितलं.
 • अटक केलेल्या लोकांमध्ये बहुतेक जण 20 ते 30 वयोगटातील आहेत.
 • सगळ्यांची पार्श्वभूमी वेगवेगळी आहे. एक दोन जण वेल्डिंगचं काम करतात. एक इंजिनियर आहे. एक बीए च्या तिसऱ्या वर्गात शिकतो. एक ऑटो ड्रायव्हर आहे तर एकाचं कपड्यांचं दुकान आहे.
 • उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आलेल्यांमधील एक जण अमिटी विद्यापीठात इंजिनियरिंगचं शिक्षण घेतोय.
 • 100 हून अधिक मोबाईल फोन आणि एक देशी रॉकेट लॉन्चरही जप्त करण्यात आलं आहे.
 • अटक केलेल्या लोकांकडून एकूण 7.5 लाख रुपये जप्त केलेत.

तसंच अजूनही चौकशी आणि तपासणी सुरु आहे. ही फक्त प्राथमिक माहिती आहे, असं NIA ने सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)