केबल चालकांचं ब्लॅकआऊट : काळजी करू नका, बीबीसी मराठीवर तुम्ही सर्व बातम्या वाचू शकता

केबल ऑपरेटर

फोटो स्रोत, Getty Images

राज्यभरातल्या केबल चालकांनी ट्रायच्या नव्या नियमांचा निषेध करण्यासाठी उद्या संध्याकाळी 7 ते 10 या वेळेत सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच 'ट्राय' यांच्या नवीन नियमावलीच्या विरोधात त्यांनी हे पाऊल उचललं आहे.

प्रकरण काय?

केबल असोसिएशनचे अध्यक्ष अनिल परब यांनी याबाबत आम्हाला सविस्तर माहिती सांगितली. ते सांगतात, "ट्रायच्या नवीन नियमांनुसार, प्रेक्षकांनी हवा असलेला चॅनेल बघावा आणि तेवढ्याच चॅनेलचे पैसे द्यावे अशा प्रकाराच्या जाहिराती टीव्हीवर सतत चालू आहेत. यासाठी सर्व चॅनेल आपापले पॅकेजेस दाखवत आहेत.

ट्रायचा उद्देश चांगला असला तरी वस्तुस्थिती मात्र तशी नाहीए. आताच्या नियमाप्रमाणे ट्रायनं 100 फ्री-टू एअर चॅनेलसाठी 130 रुपये आकारले आहेत. यामध्ये दूरदर्शन आणि इतर 21 चॅनेलचा समावेश होतो. जे काही ठराविक पे- चॅनेल्स आहेत अशा चॅनेल्सचा एक बुके (संच) बनवून त्याचे 25 चॅनेल 20 रुपयांत द्यावे, अशी परवानगी दिली आहे.

त्यानंतर 32 चॅनेल असे आहेत जे प्रत्येक घरात बघितले जातात. यात कार्टून, स्पोर्ट, बातम्या अशापद्धतीच्या चॅनेलचा समावेश होतो. या प्रत्येक चॅनेलची सरासरी किंमत 15 रुपये आहे. म्हणजे 32 चॅनेलचे 480 रुपये होतात.

याचा अर्थ 150 अधिक 480 रुपये आणि त्यावर 18 टक्के जीएसटी असे मिळून एकूण 720 रुपये साधारणपणे होतात.

आमचं म्हणणं असं आहे की, आम्ही 350 रुपयांत तुम्हाला 550 चॅनेल देतो. ग्रामीण भागात 200 रुपयांत 550 चॅनेल देतो. मग हा 700 रुपयांचा बुके तुम्ही देणार याचा अर्थ तुम्ही पैसे वाढवणार आणि चॅनेलची संख्या कमी करणार.

या पैशातील 80 टक्के भाग वितरकांना (चॅनेलचे मालक) जातो. याचा अर्थ ग्राहकाच्या खिशातून पैसे काढून ते चॅनेलच्या खिशात टाकले जात आहेत. यावर आमची हरकत आहे.

ग्राहकाची किंमत वाढली तर तो आमच्यापासून तुटेल आणि डिश टीव्हीकडे वळेल. तुम्ही किंमत वाढवू नका. जेवढे चॅनेल ग्राहक बघतोय तेवढ्याचेच पैसे घ्या.

फोटो स्रोत, Getty Images

त्यामुळे बुकेमध्ये न विकता तुम्ही स्वतंत्र पद्धतीनं विका, अशी आमची मागणी आहे. जो काही महसूल येईल त्यात 40 टक्के भाग केबल ऑपरेटर्सना द्या. सध्या चॅनेलला 80 टक्के, कंट्रोल यंत्रणेला (एमएसओ) 10 टक्के तर केबल ऑपरेटर्सला फक्त 10 टक्के महसूल मिळतो."

"यासाठी आम्ही उद्या संध्याकाळी (27 डिसेंबर) 7 ते 10 या वेळेदरम्यान ब्लॅक आऊट करणार आहोत. मुंबईत 8,000 केबल ऑपरेटर्स आहेत आणि ते जवळपास 32 लाख कुटुंबीयांना सेवा पोहोचवतातं" असं परब सांगतात.

ब्लॅकआऊट नाही - ट्राय

दरम्यान टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, ट्रायच्या नवीन धोरणांमुळे टीव्ही सेवांमध्ये काहीही अडथळा येणार नाही, असं स्पष्टीकरण ट्रायनं दिलं आहे.

29 डिसेंबरनंतर ग्राहकांनी सेवा घेतलेले चॅनेल काही वेळेकरता बंद राहतील, असा मेसेज मीडियात फिरत आहेत. पण चॅनेल, कंट्रोल यंत्रणा आणि केबल ऑपरेटर्स यांना ट्रायनं सांगितलं आहे की, 29 डिसेंबरनंतर कोणत्याही चॅनेलची सेवा खंडित व्हायला नको.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)