भीमा कोरेगाववर यंदा 11 ड्रोन्सची नजर : #5मोठ्याबातम्या

भीमा कोरेगाव

आज वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या या आहेत पाच महत्त्वाच्या बातम्या :

1. भीमा कोरेगाववर यंदा 11 ड्रोन्सची नजर

येत्या 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगावमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारनं पावलं उचलली आहेत.

या दिवशी संपूर्ण परिसरावर ११ ड्रोन्सद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसंच पाण्याचे 300 टँकर, 150 पीएमपी बसेस आणि 11 ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आगे. गेल्या वेळेपेक्षा यावर्षी 15 पट बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

30 डिसेंबरपासून 2 जानेवारी पर्यंत या परिसराला हजारो नागरिक भेट देत असतात. सुरक्षेच्या दृष्टीने विजयस्तंभ परिसराचा ताबा राज्यसरकारकडे देण्यात यावा अशी विनंती उच्च न्यायालयाकडे करण्यात आली होती.

बुधवारी न्यायालयाने त्याला मान्यता दिली. १२ जानेवारीपर्यंत या परिसराचा ताबा राज्य सरकारकडे असेल. सरकारनामाने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

2. मेट्रो 3 वरील भुयारीकरणाचा दुसरा टप्पा पूर्ण

मुंबईतील मेट्रो लाइन क्रमांक 3 च्या सिप्झ स्थानकावरील भुयारीकरणाचा दुसरा टप्पा पूर्ण करण्यात आला. सारीपूतनगर लाँचिंग शाफ्ट येथून वैनगंगा 2 या टनेल बोअरिंग मशिनने भुयारीकरणाचे काम सुरु केलं होतं. 125 दिवसांमध्ये 568 मीटरचे भुयारिकरण 250 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी पूर्ण केलं आहे.

मुंबई 3 मेट्रो मार्ग हा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, आरे कॉलनी त्याचप्रमाणे वर्सोवा-अंधेरी- घाटकोपर मेट्रो १ मार्गिका आणि स्वामी समर्थ नगर- जोगेश्वरी- कांजुरमार्ग-विक्रोळी मेट्रो ६ मार्गिका आणि सिप्झ , एमआयडीसी सारख्या व्यावसायिक क्षेत्राला जोडला जाणार आहे.

एमएमआरसीने आतापर्यंत १५ किलोमीटर इतकं भुयारीकरण पूर्ण केलं आहे, यासाठी एकूण १० टीबीएम शाफ्ट मधून तब्बल १७ टीबीएम मशीन कार्यरत आहेत. याबाबतचं वृत्त लोकमतनं प्रसिद्ध केलं आहे.

3. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी धर्मा पाटील यांच्या पत्नीला घेतलं ताब्यात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धुळे दौऱ्यामुळे धर्मा पाटील यांची पत्नी सखुबाई आणि मुलगा नरेंद्र यांना पोलिसांनी सकाळी 6 वाजल्यापासून ताब्यात घेतले होते.

दौऱ्यानंतर दोघांनाही मुक्त करण्यात आलं. मात्र आता मंत्री आल्याशिवाय आपण बाहेर पडणार नाही असा पवित्रा नरेंद्र पाटील यांनी घेतला.

फोटो स्रोत, BBC/PRAVIN THAKARE

फोटो कॅप्शन,

सखुबाई पाटील आणि नरेंद्र पाटील

कोणताही मंत्री गावात आला की आपल्याला अशी वागणूक मिळणार का, असा प्रश्न पाटील यांनी केला आहे. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावरून ट्विटरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

धुळ्यातील प्रकल्पामध्ये 5 एकर जमिन गेल्यानंतर अत्यल्प मोबदला मिळाल्यामुळे धर्मा पाटील यांनी सरकारदरबारी गाऱ्हाणं मांडलं होतं. मात्र योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसल्यावर त्यांनी मंत्रालयातच विषप्राशन केलं होते. त्यातच त्यांचं निधन झालं होतं. एबीपी माझानं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

4. मेघालयमधील खाणकामगार अजून अडकलेलेच

मेघालयमधील कोळसा खाणीत अडकलेल्या 15 कामगारांना बाहेर काढण्यात अजूनही यश आलेले नाही. 13 डिसेंबरपासून हे कामगार खाणीमध्ये अडकले आहेत.

यासंदर्भात आसाममधील बोगीबील पूलाच्या उद्घाटनासाठी गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली आहे. पंतप्रधानांनी फोटोपेक्षा या कामगारांना बाहेर काढण्याकडे लक्ष द्यावं अशी टिप्पणी त्यांनी केली आहे.

या कामगारांना बाहेर काढण्यासाठी पंतप्रधानांनी हायप्रेशर पंप्स उपलब्ध करावेत अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

कामगारांना बाहेर काढण्यासाठी आपलं सरकार पूर्ण प्रयत्न करत असल्याचं तसंच आतापर्यंत १२ लाख लिटर्स पाणी बाहेर काढल्याचं मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांनी सांगितलं आहे. इकॉनॉमिक टाइम्सनं याबाबतच वृत्त दिलं आहे.

5. गोल्फर ज्योती रंधवाला अटक

प्रसिद्ध गोल्फखेळाडू ज्योती रंधवा याला उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये अटक करण्यात आली आहे. ज्योती रंधवा हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा गोल्फ खेळाडू आहे. त्याला एका साथीदारासह ताब्यात घेण्यात आलं आहे.

या दोघांनाही बहराइचच्या कतर्नियाघाटमधल्या मोतीपूर रेंजच्या जंगलामध्ये शिकार केल्याच्या आरोपामुळे अटक होऊन 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, PTI

या दोघांकडून सांबराचं कातडं, 0.22 बोअर रायफल, गाडी आणि शिकारीचं साहित्य ताब्यात घेण्यात आल्याचं दुधवा कतर्निया घाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक रमेश पांडेय यांनी सांगितलं. बिझिनेस हेडनं याबाबत वृत्त दिलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)