'ठाकरे' सिनेमाचा शिवसेनेला निवडणुकांमध्ये किती फायदा होणार?

  • गुलशनकुमार वनकर
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
ठाकरे सिनेमा

फोटो स्रोत, YouTube

फोटो कॅप्शन,

ठाकरे सिनेमात

बाळासाहेबाच्या जीवनपट 'ठाकरे' शुक्रवारी देशभरात प्रदर्शित होतोय. नवाजुद्दीन सिद्दिकी यात बाळासाहेबांच्या पात्रात दिसणार आहे.

'बेधडक, वादग्रस्त आणि भारी' अशा शब्दांत बाळासाहेबांना व्यक्त करणारा ट्रेलर काही आठवड्यांपूर्वी रिलीज झाला होता, तेव्हाच हा सिनेमा सेंसॉर बोर्डच्या कात्रीत अडकला होता. तेव्हा यासिनेमावरून जे वाद होणार होते, ते झालेच. ऐन लोकसभा निवडणुकांपूर्वी रिलीज होतोय, म्हणून याच्या टायमिंगवरूनही बरंच काही बोललं जात आहे.

त्यामुळे 'ठाकरे'ची आवश्यक तेवढी हवा करण्यात निर्मात्यांना यश आलंय, हे नक्कीच.

सोशल मीडियावर एवढा प्रतिसाद तर उद्धव ठाकरेंना नोव्हेंबरमध्ये महिन्यात त्यांनी सहकुटुंब अयोध्येत जाऊन केलेल्या पूजेच्या वेळी सुद्धा मिळाला नव्हता.

दक्षिणेतील पॅटर्न महाराष्ट्रात

पण या सिनेमाचं निमित्त काय? यातून शिवसेना काही सिद्ध करू पाहतेय का? आणि याचा पक्षाला काही फायदा होईल का?

'ठाकरे'ला प्रतिसाद चांगला असेल, मात्र या सिनेमाचा सध्याच्या राजकीय वातावरणात खूप प्रभाव पडण्याची शक्यता कमी आहे, असं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांना वाटतं.

बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "मागे बाळासाहेबांवर 'बाळकडू' नावाचा एक सिनेमा आला होता, तो काही लोकांनी फारसा पाहिला नाही. पण यावेळी मात्र प्रतिसाद चांगला असेल, कारण नवाजुद्दीन सिद्दिकीसारख्या दमदार अभिनेत्याला बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी घेणं, यातून सेनेला या सिनेमाची राष्ट्रीय छाप पाडायची आहे, असं दिसतंय."

फोटो स्रोत, Twitter/ThackerayMovie

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

'ठाकरे'चा ट्रेलर मराठी आणि हिंदीतून काढण्यात आला असून हा सिनेमाही दोन्ही भाषांमध्ये आहे. पण राजकीय अजेंडा पुढे करणाऱ्या अशा सिनेमांचा खरंच नेत्यांना फायदा होतो का? यावर देसाई दक्षिणेकडची उदाहरणं देतात.

"दक्षिणात्य सिनेमांमध्ये तर हे या आधीही अनेकदा झालं आहे. तिथं चित्रपटांमध्ये पौराणिक पात्र साकारून अभिनेत्यांना देवत्व प्राप्त झालं होतं. त्यामुळे मतदार आपल्या हिरोला देव म्हणून निवडून देतात. याची अनेक उदाहरणं आहेत - NTR, MGR, कर्नाटकमध्ये राजकुमार नावाचे एक नट होते.

"असं काही महाराष्ट्रात आजवर झालेलं नाही, पण शिवसेना त्या पद्धतीने आपला प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतेय," असं देसाई म्हणाले.

याबद्दल चेन्नईस्थित ज्येष्ठ पत्रकार कल्याण अरुण सांगतात की आजही तामिळनाडूमध्ये चित्रपटांमधून मोठी राजकीय विधानं केली जातात.

"सुरुवातीच्या काळात पेरियार, त्यानंतर करुणानिधी यांनी आपल्या चित्रपटांसाठीच्या लिखाणातून राजकीय संदेश देण्याचंच काम केलं. M.G. रामचंद्रन आणि अलीकडच्या काळात रजनीकांत तसंच विजयसारखे सुपरस्टार (अनुक्रमे) 'काला' आणि 'सरकार'सारख्या चित्रपटांमधून राजकीय भूमिका घेताना दिसतात."

फोटो स्रोत, Getty Images

अरुण यांच्यामते अशा सिनेमांचा काही न काही राजकीय परिणाम नक्कीच होत असावा, "नाहीतर आणीबाणीच्या काळात अनेक चित्रपटांवर बंदी आणल्याची गरज नसती भासली. 'आँधी' रिलीज झाल्यानंतर त्याचं प्रदर्शन बंद पाडण्यात आलं होतं. त्यानंतर 'किस्सा कुर्सी का'च्या सर्व फिल्म्स तो सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच जाळून टाकण्यात आल्या होत्या," ते आठवून सांगतात.

आजही अनेक चित्रपटांवर रिलीज होण्यापूर्वीच काही न काही राजकीय कारणास्तव बंदीची मागणी होतेच. त्यामुळे कधी 'पद्मावती'चं पद्मावत करावं लागतं तर कधी निर्मात्यांना ते कधीच पाकिस्तानी कलाकारांना भूमिका देणार नाही, अशी जाहीर घोषणा करावी लागते.

सेनेला राजकीय फायदा होणार?

पण 'ठाकरे' हा सिनेमा एका अशा राजकीय व्यक्तिमत्त्वाभोवती केंद्रित आहे, जे आज हयात नाहीत. मग या सिनेमाद्वारे सेना कोणता फायदा होईल?

शिवसेना या सिनेमाद्वारे मराठी मनात एक राजकीय नोस्टॅल्जिया जागवू पाहत आहे, असं ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांना वाटतं.

ते सांगतात, "आजची शिवसेना फक्त बाळासाहेबांच्या इमेजवर उभी आहे. तीच इमेज वारंवार लोकांपुढे आणणे आणि त्यातून शिवसैनिकांना प्रेरणा देणे, यासाठीच हा सिनेमा काढला जात आहे."

फोटो स्रोत, Twitter/Thackeray Movie

नवाजुद्दीन सिद्दिकीला बाळासाहेबांच्या भूमिकेत कास्ट करणं, याविषयी विचारल्यावर अकोलकर सांगतात, "बाळासाहेब म्हणायचे की आमचा सर्वच मुस्लिमांना विरोध नाही. आम्हालाही अझरुद्दीन आणि मोहम्मद रफी आवडतात. अगदी तेच इथे लागू होतं. त्यामुळे नवाजुद्दीन सिद्दिकीला मुख्य रोलमध्ये जाणूनबुजून घेण्यात आलंय."

शिवाय नवाज दमदार अभिनेता आहे आणि चेहऱ्याने, अंगीकाठीने त्या पात्रात तो बसतोही, असं अकोलकर सांगतात.

राम मंदिराचा मुद्दा इथेही

'ठाकरे' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये 1960च्या दशकापासून बाळासाहेबांच्या प्रवासाची सुरुवात, शिवसेनेची स्थापना, 1992मधला बाबरीचा मुद्दा, 1993च्या मुंबई दंगली, त्यानंतरचा खटला आणि महाराष्ट्राचं राजकारण, असा पाच-सहा दशकांचा प्रवास यात दाखवण्यात आला आहे.

त्यात एक लक्षवेधी मुद्दा म्हणजे राम मंदिर आंदोलनाचा. ट्रेलरमध्ये कोर्टातल्या एका सीन आहे, ज्यात 'रामाचा जन्म 'तिथेच' (अयोध्येच्या वादग्रस्त ठिकाणी) झाला, याचा पुरावा काय?' असा प्रश्न बाळासाहेबांना (अर्थातच नवाजला) विचारला जातो.

"नाहीतर काय पाकिस्तानात झाला होता?" बाळासाहेब उत्तर देतात.

फोटो स्रोत, BBC/Niranjan Chhanwal

फोटो कॅप्शन,

धर्मसभेसाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या हातात असे फलक होते.

सध्या देशात शिवसेना आणि विश्व हिंदू परिषदेने अयोध्येच्या मुद्द्याला उचलून धरलं आहे. काही आठवड्यांपूर्वी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी अयोध्येत भव्य सभा घेत, राम मंदिरासाठी पुन्हा हाक दिली होती, तीसुद्धा हिंदीतून.

'आमचा अंत पाहू नका. कोर्टात प्रकरण लवकर मार्गी लागत नसेल तर सरकारने संसदेत अध्यादेश आणावा,' असा त्यांचा दबाव तेव्हापासून नरेंद्र मोदी सरकारवर कायम आहे.

यामुळे बाळासाहेबांनंतर थोडी आक्रमकता गमावलेल्या सेनेत थोडी तरतरी आली खरी, पण याचं रूपांतर मतांमध्ये होईल का, हे आत्ताच सांगण्याची घाई कुठलाही विश्लेषक करू इच्छित नाही.

त्यातच 2015 साली बनून तयार असलेला 'मोहल्ला अस्सी' नावाचा एक हिंदी सिनेमा प्रदर्शित करण्यात आला, ज्याचं वादग्रस्त कथानक अयोध्या आंदोलनाभोवतीच आहे. आता 'ठाकरे'चा ट्रेलरसुद्धा राम मंदिराचा मुद्दा ठळकपणे मांडताना दिसतो. त्यामुळे हा सिनेमा आणखी थोडं वादळ निर्माण करेल, असं बोललं जातंय.

पण याचा शिवसेनेला प्रत्यक्ष राजकारणात काही फायदा होईल?

अकोलकर यावर आपलं निरीक्षण नोंदवतात, "मंदिराच्या मुद्द्यावरून जर मतं मिळत असती तर भाजप नुकतीच तीन हिंदी भाषिक राज्यांमध्ये पराभूत झाली नसती. आणि जे लोक मंदिरासाठी मतं देतात, त्यांची निष्ठा आधीच भाजप किंवा संघाशी आहे. त्यामुळे याच मुद्द्यासाठी महाराष्ट्रात त्यांच्यापुढे शिवसेना हा नवा पर्याय खुला झाला तरी त्यामुळे सेनेकडे मतं वळण्याचं प्रमाण खूप कमी आहे."

देशात राजकीय चित्रपटांचा ट्रेंड

निवडणुकांआधी माध्यमांमध्ये राजकीय जाहिरातबाजी होतेच. शिवाय असे चित्रपटही थेट प्रचार न करता राजकीय विचारांचे वाहक बनतात.

अलीकडच्या काळात अक्षय कुमार राजकीय आणि देशभक्तीवरील चित्रपट करताना दिसतोय. सत्तेतल्या पक्षाच्या प्रचारासाठी तो हे सिनेमे करत असल्याचा त्याच्यावर आरोप झाला. या आरोपावर उत्तर देताना तो म्हणतो, " जे देशासाठी योग्य आहे तेच मी करत आहे."

मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन आणखी मोठे सिनेमे काही दिवसांपूर्वी आलेत - 'The Accidental Prime Minister' आणि 'URI - The Surgital Strikes'.

'The Accidental Prime Minister' हा सिनेमा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे सचिव संजय बारू यांच्या याच नावाच्या पुस्तकावर आधारित आहे.

काही दिवसांपूर्वी या पुस्तकातून समोर आलेल्या काही गोष्टींमुळे डॉ. मनमोहन सिंग व्यथित झाले होते, त्यामुळे साहजिकच ऐन निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी हा सिनेमा रिलीज होणं, हा योगयोग म्हणता येणार नाही.

याशिवाय, सप्टेंबर 2016मध्ये भारतीय सैन्यानं सीमेपार केलेल्या 'सर्जिकल स्ट्राइक्स'वर आधारित 'उरी' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. त्यामुळे सध्या 'How's The Josh? High Sir!' हा डायलॉग सर्वत्र गाजतोय.

पण याच सर्जिकल स्ट्राइक्सची गरजेपेक्षा जास्त चर्चा करून त्याचा राजकीय फायदा भाजपने घेतला, असं खुद्द लष्कराच्या नॉर्दर्न कमांडचे तत्कालीन प्रमुख लेफ्टनंट जनरल D. S. हूडा नुकतंच म्हटलं आहे.

"सर्व पक्षांनी पाकिस्तानला राजकीय शत्रू म्हणून वेळोवेळी निवडणुकीत स्वतःचा फायदा करून घेतला आहे. त्यामुळे सर्जिकल स्ट्राइक्सवरील 'उरी' सिनेमाचा नक्कीच याही निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो," असं अकोलकर बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)