स्वतःच्या मेंदूवर शस्त्रक्रिया सुरू असताना तो हनुमान चालिसा म्हणत होता #5मोठ्याबातम्या

हनुमान

फोटो स्रोत, FACEBOOK/KARAN ACHARYA

आज वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या या आहेत पाच महत्त्वाच्या बातम्या :

1.मेंदूवर शस्त्रक्रिया सुरु असताना तो म्हणत होता हनुमान चालिसा

राजस्थानमधल्या बिकानेरमध्ये ब्रेन ट्युमरवर शस्त्रक्रिया सुरू असताना 30 वर्षिय तरुण हनुमान चालिसा म्हणत असल्याचं वृत्त समोर आले आहे. बिकानेर जिल्हयातील डुंगरगडमधल्या तरुणाला काही दिवसांपासून पक्षाघाताचे झटके येत होते.

तपासणीनंतर त्याला ग्रेड 2 ब्रेन ट्युमर असल्याचे निष्पन्न झालं.

याबाबत डॉ. के. के. बन्सल यांनी सांगितले, "अन्य डॉक्टरांशी सल्लामसलत करून रुग्णाला बेशुद्ध न करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरूवातीला रुग्णाने यास नकार दिला मात्र नंतर त्यानं संमती दिली. शस्त्रक्रियेदरम्यान आम्ही त्याच्याशी गप्पा मारत होतो आणि तो हनुमान चालिसेचं पठण करत होता."

शस्त्रक्रियेसाठी त्याला लोकल अनेस्थेशिया देण्यात आला होता आणि सतत पठण केल्यामुळे रुग्णाचे लक्ष विचलित झाले नाही, अशी माहितीही डॉक्टरांनी दिली आहे. याबाबत लोकमतनं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

2. टिळक नगर आगीमध्ये 5 मृत्युमुखी

मुंबईतील टिळक नगर येथील सरगम सोसायटीमध्ये लागलेल्या आगीमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. सरगम सोसायटीच्या इमारत क्रमांक 35 च्या 14 व्या मजल्यावर ही आग लागली होती. गुरुवारी संध्याकाळी 7.51 वाजता लागलेली आग विझवण्यासाठी 5 फायर इंजिन्सची मदत घ्यावी लागली.

सुनिता जोशी, भालचंद्र जोशी, सुमन श्रीनिवास जोशी, सरला सुरेश गंगर, लक्ष्मीबेन प्रेमजी गंगर अशी मृतांची नावे आहेत. श्रीनिवास जोशी आणि अग्निशमन दलाचे जवान छगन सिंह जखमी झाले आहेत. महाराष्ट्र टाइम्सनं हे वृत्त दिलं आहे.

3. बुलंदशहरमधील आरोपी अटकेत

बुलंदशहरमधील पोलीस इंस्पेक्टरला ठार मारण्याच्या आरोपाखाली एका टॅक्सीचालकाला अटक करण्यात आली आहे. 3 डिसेंबर रोजी ही घटना घडली होती.

फोटो स्रोत, SUMIT SHARMA

प्रशांत नात या टॅक्सीचालकाने इंस्पेक्टर सुबोध कुमार सिंग यांची गोळी झाडून हत्या केल्याचं कबूल केलं आहे, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

पोलिसांवर राजकीय दबाव असल्यामुळे ते गुन्हेगारांना अटक करू शकत नसल्याचा आरोप सिंग यांच्या नातेवाईकांनी केला होता. यानंतर आठवड्याभरातच आरोपीला अटक झाली आहे. यापूर्वी 27 आरोपींना अटक करण्यात आली होती.

या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या विशेष तपासणी पथकानं प्रशांत नातला नोएडामधून अटक केली. गुरुवारी संध्याकाळपर्यंत गुन्ह्यात वापरलेलं पिस्तूल सापडलेलं नव्हतं. हिंदुस्तान टाइम्सनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

4. तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. महिन्याभरापूर्वीच नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावरून त्यांनी मंत्रालयात सहसचिव पदावर बदली झाली होती.

फोटो स्रोत, FACEBOOK

मुंढे यांच्याकडे आता राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या प्रकल्प संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

सोलापूरचे जिल्हाधिकारी, नवी मुंबई पालिका आयुक्त, पीएमपीएमपीएल अध्यक्ष, नाशिक पालिका आयुक्त, नियोजन विभाग सहसचिव अशा पदांवर त्यांच्या गेल्या काही वर्षांमध्ये बदल्या झाल्या आहेत. एबीपी माझानं हे वृत्त दिलं आहे.

5. यंदाचे नाट्यसंमेलन नागपूरमध्ये

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने आयोजित होणारे 99 वं अ.भा. मराठी नाट्यसंमेलन नागपूरमध्ये होणार आहे. 22 ते 25 फेब्रुवारीदरम्यान हे संमेलन होणार आहे.

ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. नागपूरमध्ये यापूर्वी 1985 साली प्रभाकर पणशीकर यांच्या अध्यक्षतेखाली नाट्यसंमेलन झालं होतं.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नागपूर शाखा या संमेलनाचं आयोजन करणार आहे.

यावर्षी नाट्यसंमेलनासाठी 9 प्रस्ताव आले होते. त्यापैकी 7 स्थळांनी प्रस्ताव मागे घेतले होते. त्यामुळे लातूर आणि नागपूर या दोन नावांवर चर्चा करण्यात आली आणि नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला. याबाबतचं वृत्त लोकसत्ताने दिलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)