मुंबईत पुन्हा आग, वारंवार आग लागण्याचं 'हे' आहे कारण

आग Image copyright Getty Images

मुंबईतील टिळक नगर येथील सरगम सोसायटीमध्ये लागलेल्या आगीमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या सोसायटीच्या इमारत क्रमांक मध्ये फ्लॅट नंबर 1101, 1102,1103,1104 मध्ये ही आग लागली होती.

सुनिता जोशी, भालचंद्र जोशी, सुमन श्रीनिवास जोशी, सरला सुरेश गंगर, लक्ष्मीबेन प्रेमजी गंगर अशी मृतांची नावे आहेत. श्रीनिवास जोशी आणि अग्निशमन दलाचे जवान छगन सिंह जखमी झाले आहेत.

मुंबईमध्ये आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असून गेल्या 6 महिन्यांमध्ये मोठी आग लागण्याची ही चौथी घटना आहे. 14 जून रोजी प्रभादेवीच्या 34 मजली ब्योमाँद टॉवरच्या पेंट हाऊसमध्ये आग लागली होती. त्यानंतर 22 ऑगस्ट रोजी हिंदमाता परिसरातल्या क्रिस्टल टॉवर इमारतीत लागलेल्या आगीमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आणि 18 जण जखमी झाले होते.

डिसेंबर महिन्यात मरोळ (अंधेरी पूर्व) भागातल्या पाच मजली हॉस्पिटलमध्ये आग लागून 6 जणांचा मृत्यू झाला होता. तसेच जखमींचा आकडा शंभरावर पोहोचला होता.

आग विझवण्याचं प्रशिक्षण कागदावर नको

मुंबईत वारंवार आग लागण्याच्या घटनांबाबत या विषयातले तज्ज्ञ विक्रम माहुरकरांशी आम्ही बोललो. ते चेकमेट ग्रुप या आपत्ती व्यवस्थापन कंपनीचे प्रमुख असून आग रोखण्याचं प्रशिक्षण देतात.

माहुरकर म्हणाले, "आगीच्या संदर्भात अनेक कायदे आहेत. पण त्याची अंमलबजावणी होते का, हे कधी बघितलं जात नाही. इमारतींसाठी वेगळे कायदे आहेत. रुग्णालयांकरिता वेगळे कायदे आहेत. तुम्ही जर बघितलं असेल तर आग विझवणारे हे साध्या कपड्यांवर आग विझवताना दिसतात. फायरमॅनला अनेकदा दर्जेदार साहित्य पुरवलं जात नाही.

"मुंबईत इमारतींची उंची वाढली. रस्ते अरुंद झाले. अशा ठिकाणी अग्निशमन दलाला पोहचण्यास अडचणी येतात. नंतर आग अटोक्यात आणण्यात अडचणी येतात. तेवढ्या उंचीच्या शिड्या नसतात. अग्निशमन संस्थांचा दर्जा सुधारणं आवश्यक आहे.

"या सगळ्यांत महत्त्वाचं काय असेल तर प्रशिक्षण. कागदावरचं प्रशिक्षण नको. तर प्रत्यक्षात आग लागल्यावर काय केलं पाहिजे याचं प्रशिक्षण हवं. याला आमच्या भाषेत 'रिअल फ्यूल, रिअल फायर' म्हणजेच 'लाईव्ह फायर ट्रेनिंग' असं म्हटलं जातं.

अधिकाऱ्यांमध्ये साटंलोटं?

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली म्हणाले, "फायर ऑडिटबद्दल कुणी काहीही बोलत नाहीत. मी माहिती अधिकारातही ही माहिती मागितली, तेव्हाही मिळाली नाही. ती माहिती दर तीन महिन्यांनी सुधारित करून ऑनलाईन उपलब्ध करा,अशीही वारंवार मागणी केली. कारण आपल्याकडे याबाबतीत प्रचंड शिथिलता आहे. अग्निशमन दल, महापालिकेचे स्थानिक अधिकारी यांच्यात साटंलोटं आहे. त्यामुळे आगीपासून सुरक्षा करणाऱ्या यंत्रणा लावल्या जात नाहीत. मरोळची आग ही मानवनिर्मित दुर्घटना होती."

मरोळच्या आग लागण्याच्या घटनेनंतर आम्ही मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची प्रतिक्रिया विचारली. त्यांनी महापालिकेतल्या अधिकाऱ्यांवर बोलण्याचं टाळत केंद्र सरकारवर खापर फोडलं.

"फायर ऑडिट व्हायला हवंच. कारण मुंबईकरांचा, प्रत्येक माणसाचा जीव महत्त्वाचा आहे. आज ज्या हॉस्पिटलला घटना लागली, ते हॉस्पिटल MIDCच्या आखत्यारीत म्हणजे राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या आखत्यारीत येतं. तिथे २००९ पासून फायर ऑडिट झालं नव्हतं. ते होणं आवश्यक होतं, त्याची चौकशी करावी लागेल. आग का लागली त्याची चौकशी सुरू केली. काही विभाग महापालिकेच्या अंतर्गत नसले, तरी आमच्या बारा गाड्या आज लगेच तिथे पाठवल्या, आमचे फायर ब्रिगेडचे जवान तिथे पोहोचले, त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं होतं."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

Related Topics