दुबईची पळून गेलेली राजकन्या खरंच सुरक्षित आहे का?

दुबई राजकन्या Image copyright UAE FOREIGN MINISTRY

दुबईची पळून गेलेली राजकन्या शेख लतिफा सुरक्षित आहेत का याबाबत आजपर्यंत कोणतीही स्पष्ट माहिती उघड झालेली नाही.

शेख लतिफा यांनी मार्च महिन्यात पळून जाण्याचा कथित प्रयत्न केला होता. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार त्यांना भारताजवळ एका जहाजातून पकडून पुन्हा नेण्यात आलं आहे.

संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार संघटनेच्या माजी अध्यक्षा मेरी रॉबिन्सन यांनी लतिफा यांची भेट घेतली असून त्यांनी 'संकटग्रस्त तरुण मुलगी' असं राजकुमारीचे वर्णन केलं आहे.

आपल्याला बंदिवासात टाकल्याचा आणि छळ झाल्याचा व्हीडिओ तयार केल्याबद्दल लतिफानी खेद व्यक्त केला आहे, असंही रॉबिन्सन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

मात्र त्यांच्या सुरक्षिततेबाबत मानवाधिकार संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे.

दुबईमधील एका मानवाधिकार संस्थेच्या प्रमुख राधा स्टर्लिंग यांनी सांगितलं, "बीबीसी रेडिओच्या मुलाखतीमध्ये रॉबिन्सन यांनी जी माहिती दिली ती सर्वांनाच आश्चर्यचकीत करणारी आहे. रॉबिन्सन दुबईच्या राज्यकर्त्यांच्या सुरात सूर मिसळून बोलत आहेत. शेख लतिफा यांच्यावर अत्याचार होत नाहीत याबाबत कोणतीही समाधानकारक माहिती त्यांनी दिलेली नाही."

काय आहे प्रकरण?

शेख लतिफा या अमिरातीमधील राज्यकर्ते शेख मोहम्मद बिन रशिद अल मकतूम यांची मुलगी आहे, त्यांनी मुक्त जीवन जगण्याच्या इच्छेने मार्च महिन्यात पलायन केलं होतं असं सांगण्यात येतं.

मात्र मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या मते त्यांची आलिशान बोट भारताजवळ पकडण्यात आली आणि त्यांना पुन्हा दुबईला पाठवण्यात आलं. दुबईतून पलायन करण्यासाठी लतिफा यांना फ्रान्सचा माजी गुप्तहेर आणि फिनलॅंडच्या मार्शल आर्ट ट्रेनरने मदत केली होती असं म्हटलं जातं.

लतिफा यांच्यावर बीबीसीनं न्यूजनाइट या कार्यक्रमात एक सविस्तर वृत्तांत सादर केला आहे. या कार्यक्रमात अनेक गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे.

जर पलायन यशस्वी झालं नाही तर आपल्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील याची त्यांना कल्पना होती.

Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा दुबईचे शासक मोहम्मद बिन रशिद अल मकतूम

त्यामुळे त्यांनी एक व्हीडिओ संदेश रेकॉर्ड करून ठेवला. त्यांचा हा संदेश त्यांच्या मित्र-मैत्रिणींनी रीलिज केला आहे.

"मी हा व्हीडिओ बनवत आहे. कदाचित हा माझा शेवटचा व्हीडिओ ठरू शकतो. मला सर्वांना हेच सांगायचं आहे की, माझी परिस्थिती खरंच खूप खराब आहे. माझ्या वडिलांना फक्त त्यांची प्रतिष्ठाच प्रिय आहे," असं त्यांनी या व्हीडिओमध्ये म्हटलं आहे.

संयुक्त अरब अमिरातच्या सरकारवर दबाव टाकण्यासाठी हा व्हीडिओ तयार करण्यात आला आहे, असं देखील काही लोक म्हणतात.

लतिफा यांना स्कायडायव्हिंगचा छंद आहे आणि त्या दुबईमध्ये लोकप्रियही आहेत. आकाशातून उडी मारण्यापूर्वी त्या नेहमी आपल्या देशाचा झेंडा फडकवत असत. त्या व्हीडिओमध्ये त्या आनंदी दिसायच्या पण वास्तव खूप वेगळं होतं.

"त्यांची स्थिती सोन्याच्या पिंजऱ्यात अडकलेल्या पक्ष्यासारखी होती," असं त्यांची मैत्रीण आणि मार्शल आर्ट्स ट्रेनर टीना योहियानेन यांचं म्हणणं आहे. त्यांनी न्यूजनाइटला सांगितलं, "लतिफांना मनमुरादपणे जगावंस वाटत असे."

2002 साली देखील त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली होती आणि त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. तिथं त्यांना 3.5 वर्षं ठेवण्यात आलं होतं.

संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र मंत्रालयाने लतिफा आणि रॉबिन्सन यांच्या भेटीची छायाचित्रं प्रसिद्ध केली आहेत. ही छायाचित्रे 15 डिसेंबरला काढण्यात आली असं सांगण्यात आलं.

मी त्यांच्याबरोबर जेवण घेतलं. त्यांना आरोग्यविषयक मदतीची गरज असल्याचं दिसून आलं आणि त्यांना मदतही मिळत आहे. त्यांना मनोविकारतज्ज्ञांकडून मदत मिळत आहे, असं रॉबिन्सन यांनी सांगितलं. त्यांच्या कथित आजाराबाबत अधिक माहिती देण्यास रॉबिन्सन यांनी नकार दिला आणि त्यांच्या कुटुंबाला याबाबत अधिक प्रसिद्धी नको असल्याचं सांगितलं.

मानवाधिकार संघटनेचं काय म्हणणं आहे?

मानवाधिकार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मात्र रॉबिन्सन यांच्यावर टीका केली आहे.

"लतिफा यांनी जवळपास दशकभर पळून जाण्याचं नियोजन केलं होतं. तसंच पळून जाण्याच्या पूर्वीच्या प्रयत्नाबाबत काहीही सांगितलं नाही. शेख लतिफा यांनी आपल्या वडिलांवर लावलेल्या आरोपावरही रॉबिन्सन काहीच बोलल्या नाहीत," असा आरोप रॉबिन्सन यांच्यावर कार्यकर्ते करत आहेत.

"कोणतंही मानसशास्त्रीय, आरोग्यविषयक प्रशिक्षण नसताना लतिफा यांच्या आरोग्याबाबत निष्कर्ष काढून त्यांना योग्य उपचार मिळत आहेत हे रॉबिन्सन यांनी कसं स्पष्ट केलं," असा प्रश्न इंटरनॅशनल जस्टीस चेंबर्स संस्थेनं विचारला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)