'अंदमान-निकोबारमधील बेटांची नावं बदलली तर पर्यटनावर परिणाम'

  • ओंकार करंबेळकर आणि रोहन नामजोशी
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
अंदमान बेटे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

रॉस बेट

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूहातील तीन बेटांची नावं 30 डिसेंबरला होणाऱ्या एका कार्यक्रमात बदलली जाणार आहेत.

रॉस, नील आणि हॅवलॉक या बेटांची नावं अनुक्रमे नेताजी सुभाषचंद्र बोस, शहीद द्वीप आणि स्वराज द्वीप, अशी केली जाणार आहेत. यापैकी एका बेटाला सुभाषचंद्र बोसांचं नाव देण्यास स्थानिकांनी विरोध केला आहे.

या बेटांची नावं बदलण्याबाबत स्थानिकांना कोणतीच कल्पना देण्यात आली नाही, अशी माहिती या बेटांवरील 'लोकल बॉर्न असोसिएशन'चे अध्यक्ष प्रेम किशन यांनी व्यक्त केली आहे. "आम्हाला ही सगळी माहिती वर्तमानपत्रातून समजत आहे, मात्र कोणतंही नोटिफिकेशन मिळालेलं नाही," असं प्रेम किशन म्हणतात.

लोकल बॉर्न असोसिएशनने याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रात लिहिलं आहे. रॉस, वायपर आणि चॅथॅम या तीन बेटांवर 1858 साली स्वातंत्र्यसैनिकांचा पहिला गट आला. त्यामुळे या बेटांशी आमच्या भावना जुळलेल्या आहेत."

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

रॉस बेटावरील गुन्हेगारांची वसाहत

"सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहेच. मात्र पर्यटनासंबंधी बेटांचं नाव बदलण्याबाबत सरकारने पुनर्विचार करावा," असं सांगण्यास प्रेम किशन विसरत नाहीत.

पर्यटन उद्योगावर परिणाम?

प्रेम किशन पुढे म्हणतात, "अंदमान-निकोबार बेटांची नावं सुभाषचंद्र बोस यांनीही बदलली होती. मात्र त्याचे पुढे काहीच झालं नाही, हा इतिहास उपलब्ध आहे. त्यामुळे आताही नावं बदलण्यात अर्थ नाही. या बेटांचं नावं बदलल्याने हॉटेल व्यवसाय आणि पर्यटनासंबंधित व्यवसायांशी संबंधित लोकांवरही परिणाम होईल.

नील, रॉस, हॅवलॉक या तिन्ही बेटांचे ब्रँड तयार झाले आहेत. आता नव्याने त्यांचे ब्रँड तयार होणं कठीण होईल, असं इथल्या हॉटेल उद्योजकांना वाटत असल्याचं किशन सांगतात.

'अंदमान अँड निकोबार हॉटेलियर्स असोसिएशन'चे अध्यक्ष जी. भास्कर यांनीही पंतप्रधानांना पत्र लिहून आपल्या भावना कळवल्या आहेत. ते पत्रात लिहितात, "हॅवलॉक, नील, रॉस, वायपर, जॉली बॉय, नॉर्थ बे, रेडस्कीन ही सगळी पर्यटन केंद्रं झाली आहेत. त्यांची नावं बदलल्याने पर्यटनाच्या ब्रँडवर परिणाम होईल. आम्ही सरकारच्या निर्णयाचे स्वागत करतो, मात्र त्यांनी या बेटांची नावं बदलण्याऐवजी नव्याने शोधण्यात आलेल्या बेटांना स्वातंत्र्यसैनिकांची नावं द्यावी, अशी आम्ही विनंती करतो."

सरकारच्या निर्णयाचं स्वागत करतो - विश्वास पाटील

स्थानिक रहिनाशांनी या तीन बेटांची नावं बदलण्याच्या निर्णयाला विरोध केला असला तरी प्रसिद्ध लेखक आणि इतिहास अभ्यासक विश्वास पाटील यांनी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केलं आहे.

त्यांच्या मतानुसार, "आजच्या अंदमानच्या पिढ्यांना खरा इतिहास माहिती नाही. तिथे सगळा ब्रिटिशप्रणित शिक्षणाचा प्रभाव आहे. त्या व्यवस्थेमध्ये भारतीय क्रांतिकारकांना शत्रू मानलं गेलं आहे. नेताजींनी अंदमानला जी भेट दिली आहे, त्याची चित्रफित उपलब्ध आहे. ब्रिटिश सत्तेचे शत्रू ते आपले शत्रू, अशी शिकवण तिथल्या व्यवस्थेत दिली गेल्यामुळे अंदमान-निकोबारचे लोक विरोध करत आहेत. परंतु त्यांना वस्तुस्थिती माहिती नाही. त्यांचा विरोध अनाठायी आहे. बेटांची नावं बदलण्याच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. मला तर वाटतं हा निर्णय घेण्यास उशीरच झाला आहे."

'प्रतीकात्मक राजकारणाचा भाग'

तीन बेटांची नावं बदलण्याचा निर्णय शुद्ध लोकप्रिय राजकारणाचा भाग आहे, असं मत दिल्ली विद्यापीठातील इतिहास विभागाचे प्राध्यापक अनिरुद्ध देशपांडे यांनी व्यक्त केलं. याबाबत बीबीसीकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले, "जपानच्या ताब्यात ही बेटं असताना स्थानिक लोकांवर अत्याचार झाले होते. जपानी वसाहतवादी सर्वच वसाहतींमध्ये लोकांचा छळ करायचे.

"जपानी लोकांनी या बेटांचा ताबा सुभाषचंद्र बोस यांच्याकडे दिला. पण तरीही मला बेटांची नावं बदलणं हा प्रतीकात्मक आणि लोकप्रिय राजकारणाचा भाग वाटतो. नाव बदलल्याने काहीच होणार नाही. लोकांच्या मनात जुनीच नावं शिल्लक राहतात, असा इतिहास आहे.

"तसंच या बेटांची जुनी नावं काहीतरी होती आणि त्यांची नावं इंग्रजांनी बदलली होती, असं झालेलं नाही. कारण मुळात त्यांना नावंच इंग्रजांनी दिली होती. त्यामुळे असलेली नावं बदलण्यात काहीच अर्थ नाही."

रॉस, नील, हॅवलॉक बेटांच्या नावांची कथा

रॉस या प्रसिद्ध बेटाचं नाव कॅप्टन डॅनियल रॉस या जलसर्वेक्षकाच्या स्मृतीसाठी देण्यात आले. रॉस यांनी कोलकाता येथे मरीन सर्व्हेयर जनरल म्हणून आणि मुंबईमध्ये जियोग्राफिकल सोसायटी ऑफ बाँबेचे अध्यक्ष म्हणून काम केलं होतं. 29 ऑक्टोबर 1849 रोजी त्यांचं निधन झालं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन,

रॉस बेट

नील आणि हॅवलॉक या बेटांची नावे जेम्स नील आणि सर हेन्री हॅवलॉक या ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांवरून ठेवण्यात आली. हॅवलॉक यांनी अवध आणि कानपूरमध्ये तर जेम्स नील यांनी 1857 मध्ये लष्करी उठाव निपटण्यासाठी कंपनी सरकारतर्फे प्रयत्न केले होते.

24 नोव्हेंबर 1857 रोजी अतिसाराने हॅवलॉक यांचं निधन झालं तर जेम्स नील यांचा 25 सप्टेंबर 1857 रोजी गोळी लागून मृत्यू झाला.

जपानी लोकांकडून झाला अनन्वित छळ

सप्टेंबर 1939 मध्ये जेव्हा दुसरं महायुद्ध सुरू झालं, तेव्हा निकोबारचे तत्कालीन प्रशासनप्रमुख जॉन रिचर्डसन आणि त्यांच्या परिसरातील स्थानिक लोकांना पुढे काय वाढून ठेवलंय, याची कल्पना नव्हती. अजय सैनी यांनी 'इकॉनॉमिक आणि पॉलिटिकल वीकली'साठी लिहिलेल्या एका संशोधन निबंधात याबद्दल अधिक माहिती दिली आहे.

"1939 मध्ये जागतिक महायुद्ध सुरू झाल्यानंतर रिचर्डसन आणि तेथील लोकांना पुढे काय होईल याची कल्पना नव्हती. पहिल्या महायुद्धात या परिसरात शांतता होती. दुसऱ्या महायुद्धात मात्र ही परिस्थिती बदलली. जपानने मलाया, सिंगापूर आणि हाँगकाँग इथे हल्ला केल्यानंतर ब्रिटिशांनी 1941 मध्ये जपानविरुद्ध युद्ध पुकारलं.

"तेव्हा हे युद्ध अगदी आपल्या दाराशीच होतंय, अशी भावना तेथील आदिवासींच्या मनात निर्माण झाली. जपानी लोकांनी सिंगापूर, म्यानमार येथे केलेल्या अत्याराबाबत माहिती मिळाली. 1942 मध्ये जपानने कामोर्टा आणि पोर्ट ब्लेअरवर बाँब हल्ला केला आणि ही भीती आणखीच बळावली.

फोटो स्रोत, TEJALI SHAHASANE

फोटो कॅप्शन,

हॅवलॉक

"जपानने या बेटांचा ताबा घेतल्यानंतर तिथल्या स्थानिकांना जपानी लोकांच्या छळवणुकीचा पहिल्यांदाच अनुभव आला. 24 डिसेंबर 1942ला निकोबारमधील 500 लोकांना बांधकामासाठी मजूर नेमण्यात आलं. निकोबारपेक्षा अंदमानचं महत्त्व जपानी लोकांच्या दृष्टीने जास्त होतं. त्यामुळे जपानी नौदलाचा अंदमानवर ताबा होता.

"हे नौदल सिंगापूरमधील मुख्यालयाला उत्तरदायी होते. त्यांचा प्रभाव इतका जास्त होता की तेव्हाच्या हंगामी भारतीय सरकारलासुद्धा तिथे कोणताही हस्तक्षेप करता येत नव्हता.

"निकोबारच्या अडचणी सोडवण्यासाठी तिथे एक प्रशासकसुद्धा नेमण्यात आला होता. स्थानिकांना जपानी भाषा शिकवली गेली. जपानचा राजा म्हणजे देवाचाच एक अवतार आहे, हे सांगण्यासाठी व्याख्यानं आयोजित केली गेली," असं सैनी लिहितात.

जपानची शरणागती

जपानी सैनिकांनी तिथल्या स्थानिकांना अत्यंत वाईट वागणूक दिल्याचंही सैनी यांनी या शोधनिबंधात पुढे म्हटलं आहे. याबद्दल अनेकदा तक्रार केली तरी त्याबद्दल कोणतीही कारवाई केली नाही. स्थानिकांना रोज कामावर येण्याचे आदेश देण्यात आले होते.

कुणी आजारी पडलं तरी त्याला अगदी घरातून उचलून आणलं जायचं. जुलै 1945 मध्ये निकोबार भागात अनेक सागरी आणि हवाई हल्ले झाले. त्यानंतर निकोबारमध्ये राहणाऱ्या आणि तिथे न राहणाऱ्या लोकांचीही हत्या करण्यात आली. जपानने 300 लोकांना अटक करून त्यांची रवानगी छळछावण्यांमध्ये करण्यात आली.

दुसऱ्या महायुद्धात जपानने सपशेल शरणागती पत्करल्यानंतर जपानच्या मेजर जनरलने रिचर्डसन यांना पाचारण केलं. "आमचा राजा शांतताप्रिय आहे. लोकांना ज्या वेदना होत आहेत, त्या त्याला बघवल्या जात नाहीत. आमच्याकडे शस्त्र आहेत, ज्यांनी आम्ही अजून 100 वर्षं युद्ध करू शकतो. मात्र आता आम्हाला शांतता हवी आहे," अशा आशयाचा मजकूर त्यांना वाचून दाखवण्यात आला.

या संदेशाबरोबर रिचर्डसन यांना एक जुनं ब्लँकेट, 40 पाऊंड तांदूळ आणि दोन यार्ड इतकं कापड देण्यात आलं. दुसऱ्या महायुद्धात मदत केल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)