अमरोहा : जप्त स्फोटकं NIAनेच आणल्याचा शेजाऱ्यांचा आरोप

  • दिलनवाज पाशा
  • बीबीसी हिंदी प्रतिनिधी अमरोहाहून

राजधानी दिल्लीपासून अवघ्या 140 किलोमीटरवर असलेलं अमरोहा कालपर्यंत शांतता आणि सधनतेसाठी ओळखलं जायचं.

1980 मध्ये जेव्हा मुरादाबादमध्ये दंगल भडकली होती, तेव्हाही त्याची झळ अमरोहाला पोहोचली नाही. आणि 2013 मध्येही मुझफ्फरनगर पेटलं तेव्हा अमरोहा शांत होतं. मुस्लीमबहुल असलेलं अमरोहा तसं चर्चेत किंवा बातम्यांत खूप कमी असतं.

पण मंगळवारी जेव्हा राष्ट्रीय तपास यंत्रणेनं अर्थात NIAनं अमरोहामध्ये ISISनं प्रभावित असलेलं मॉड्यूल उद्ध्वस्त केल्याचं म्हटलं, तेव्हा अमरोहा देशभरातील माध्यमांच्या हेडलाईन्समध्ये झळकलं.

NIAनं बुधवारी धाडी टाकत दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील 17 ठिकाणांवर छापेमारी केली. 10 जणांना अटकही केली. अमरोहाच्या मशिदीत मौलवी असलेल्या मुफ्ती सोहेल यांना या कट्टरवादी गटाचा म्होरक्या म्हणून घोषित केलं.

NIAचा दावा आहे की हा गट आत्मघातकी हल्ल्याची तयारी करत होता आणि त्यासाठी जॅकेट बनवण्याचं कामही इथे सुरू होतं. "हे लोक बाँब बनवण्याच्या टप्प्यावर होते," असं NIAच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.

शहरातील जामा मशिदीपाशी नेहमीप्रमाणे गर्दी असते, पण लोक बोलताना बिचकतात. हातात मीडियाचा माईक पाहिला की दूर राहणं पसंत करतात.

इथूनच निघणारी एक गल्ली शहरातील हकीम चाँद मियाँ रुग्णालयाकडे जाते. तिथेच जवळ मुफ्ती मोहम्मद सुहैलचं घर आहे. सुहैलला कट्टरवादाच्या आरोपावरून याच घरातून अटक करण्यात आली.

आम्ही दोनदा घरातील सदस्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र कुणीही काहीही बोलायला तयार नव्हतं.

बऱ्याच प्रयत्नांनंतर दरवाजाआडून एका महिलेनं इतकंच सांगितलं की दीड महिन्यांपूर्वीच ते दिल्लीतून इथं राहायला आले आहेत. नवं काम सुरू करण्याचा इरादा होता. कदाचित जॅकेट बनवण्याचं काम ते करणार होते.

जवळपास राहणारे लोक मुफ्ती सुहैलला सरळमार्गी तरुण म्हणूनच ओळखतात. त्याचं याआधी कुठल्याही पोलीस रेकॉर्डवर नाव नाही.

एका शेजाऱ्यानं सांगितलं की "मुफ्ती सुहैल आणि त्याचं कुटुंब 30 वर्षांपूर्वीच दिल्लीच्या जाफराबादला गेलं होतं. सुहैलसुद्धा तिथेच राहत होते. वर्षाभरापूर्वीच अमरोहाच्या एका मुलीशी त्यांचं लग्न झालं होतं."

नाव न सांगण्याच्या अटीवर एका शेजाऱ्यानं सांगितलं की, मुफ्ती सुहैल यांचं कुटुंब धार्मिक शिक्षणाशी जोडलेलं आहे. या कुटुंबाला समाजात खूप मान आहे.

शेजाऱ्यांचं काय म्हणणं आहे?

सुहैल इतकं भयानक काही करू शकेल, यावर इथल्या लोकांचा विश्वास नाहीये. अर्थात जर सुहैल यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला तर त्यांना शिक्षाही झाली पाहिजे, असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे.

फोटो कॅप्शन,

मुफ्ती सुहैल यांचं घर

राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIAचा दावा आहे की सुहैलच हरकत-उल-हर्ब-ए-इस्लाम या संघटनेचे मास्टरमाइंड आहेत. आणि त्यांनीच इतर लोकांना संघटनेत सामील करून घेतलं आहे.

'माझा भाजी कापण्याचा चाकूही घेऊन गेले'

जिथं सुहैल राहतात तिथून अगदी थोड्या अंतरावरील मोहल्ला काजीजादा परिसरात एका खोलीच्या घरात ऑटोरिक्षाचालक मोहम्मद इरशाद राहतात. त्यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर सुहैल यांना मदत केल्याचा आणि त्यांनी बनवलेली स्फोटकं सुरक्षित स्थळी हलवल्याचा आरोप आहे.

मंगळवारी संध्याकाळी जेव्हा इरशादच्या घरी पोहोचलो, तेव्हा त्यांच्या पत्नी एकट्याच घरात बसून होत्या. तोवर त्यांना साधी माहितीही नव्हती की इरशाद यांना नेमक्या कुठल्या आरोपाखाली अटक केली आहे.

फोटो कॅप्शन,

इरशाद यांची पत्नी

त्या सांगतात, "पोलिसांचं पथक पहाटे पाच वाजता दरवाजा तोडून घरात घुसलं. इरशाद कुठे आहे, असं त्यांनी विचारलं आणि त्यांना ताब्यात घेतलं."

"त्यांनी अख्ख्या घराची झडती घेतली. सगळं सामान विस्कटून टाकलं. माझा भाजी कापण्याचा चाकू त्यांना घरात सापडला, तोही ते घेऊन गेले. इरशाद त्यांना वारंवार विचारत होते की माझा गुन्हा काय आहे, त्यावर ते तुला कळेल एवढच म्हणाले."

इरशादवर देशावर हल्ला करण्याच्या कटाचा आरोप आहे, हे कुटुंबाला सांगितलं तेव्हा त्यांनी सांगितलं की इरशाद रिक्षा चालवतात, हे आरोप चुकीचे आहेत.

इरशादचे मोठे बंधून औरंगजेब सांगतात, "जर ते गुन्हेगार असतील तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे, पण जर ते निर्दोष असतील, तर न्याय झाला पाहिजे."

दोन वर्षापूर्वी इरशादवर ऑटो रिक्षातून मांस घेऊन जाण्याचा आरोप ठेवण्यात आला होता, त्यावेळी त्यांना अटकही झाली होती.

त्यावर इरशादचे बंधू औरंगजेब सांगतात, "इरशाद रिक्षा चालवण्याचं काम करतात. जे सामान लोक सांगतात ते इकडून तिकडे पोहोचवणं हे त्यांचं काम आहे. त्यांना मांस वाहतूक केल्याप्रकरणी अटक झाली होती. पण नंतर त्यांना जामीन मिळाला."

फोटो स्रोत, NIA

फोटो कॅप्शन,

NIA नं जप्त केलेलं साहित्य

ते रॉकेट लाँचर नाही, ट्रॉलीचा हायड्रॉलिक जॅक आहे

NIAने अमरोहाजवळच्या सैदपूर इम्मा गावातून सईद अहमद आणि रईस अहमद या दोन भावांनाही अटक केली आहे. त्यांच्यावर हल्ल्याचा कट आखल्याचा आरोप आहे. हे दोन्ही भाऊ व्यवसायानं वेल्डर आहेत.

या दोघांवर आरोप आहे की, त्यांनी देशी रॉकेट लाँचर बनवण्यासाठी मुफ्ती सुहैलला मदत केली. NIAनं आपल्या पत्रकात म्हटलंय, की या दोघांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकं, गन पावडर जप्त केली आहे. आणि ते देशी रॉकेट लाँचर बनवण्याच्या प्रयत्नात होते.

फोटो स्रोत, NIA

फोटो कॅप्शन,

NIA चं प्रसिद्धी पत्रक

सईद आणि रईस यांचं वेल्डिंग शॉप NIAनं सील केलं आहे.

सैदपूर इम्मा गावाची लोकसंख्या अडीच हजाराच्या घरात आहे. आणि गावातील लोक त्यांना निर्दोष मानतात. गावातील बहुतेक लोक माती टाकण्याचं किंवा वाहण्याचं काम करतात.

सईद आणि रईसच्या शेजाऱ्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की "पोलीस ज्याला रॉकेट लाँचर म्हणतायत, तो ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला लावण्यात येणारा जॅक आहे. माती टाकण्यासाठी हा जॅक उपयोगाला येतो. जर हा जॅक रॉकेट लाँचर असेल तर सगळ्या शेतकऱ्यांना अटक केली पाहिजे, कारण हा जॅक सगळ्याच ट्रॉलीमध्ये असतो."

फोटो कॅप्शन,

सईद आणि रईस यांचं वेल्डिंगचं दुकान

'स्फोटकं नाही, तो लोखंडाचा चुरा'

NIAनं रईस आणि सईदच्या घरातून स्फोटकं जप्त केल्याचा दावा केला आहे. पण शमशाद सांगतात की "पोलीस ज्याला स्फोटकं असल्याचं सांगतायत तो लोखंडाचा चुरा आहे. हे सिद्ध करण्यासाठी शमशाद यांनी एका गोणीतून लोखंडाचा चुरा काढूनही दाखवला. या दोन्ही भावांच्या कुटुंबानं NIAवर गंभीर आरोप केलेत. NIAनं घरातली सगळी महत्त्वाची कागदपत्रं जाळून टाकली आहेत. आता घरातील एकाही व्यक्तीची कुठलीही कागदपत्रं शिल्लक नाहीत. ज्यावेळी कारवाई सुरू होती, तेव्हा आजूबाजूच्या घरांना बंद करण्यात आलं. कुणालाही घटनास्थळावर येऊ दिलं नाही," असंही ते सांगतात.

फोटो कॅप्शन,

सईद आणि रईसच्या शेजाऱ्यांच्या मते ही स्फोटकं नसून लोखंडाचा चुरा आहे

आपल्या बंद घराच्या फटीतून हे सगळं पाहणाऱ्या एका महिलेनं बीबीसीला सांगितलं की, "पोलिसांनी पोत्यातून बरंच सामान आणलं होतं. त्यांनी ते सामान काही डब्यामध्ये घातलं. आणि मग मेणबत्तीनं जाळून हे सगळं सील करून टाकलं. यानंतर शेजाऱ्यांना बोलावून हे सामान घरात सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्याला लोकांनी विरोध करताच त्यांनी मारहाणही केली."

कुटुंबाचे आरोप

रईस आणि सईदच्या आईनंही हाच दावा केलाय. जे सामान आमच्या घरात सापडल्याचा दावा NIAनं केला आहे, प्रत्यक्षात ते सामान पोलीस स्वत:च घेऊन आले होते. अर्थात हा दावा सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे कुठलाही पुरावा नाहीये.

या दोन्ही भावांच्या शेजारी राहणारे लोक त्यांना निर्दोष मानतात, तसंच मदतीचं आवाहनही करतात.

फोटो कॅप्शन,

रईस आणि सईद यांची आई

NIAनं या चारही तरुणांना अटक करून कोर्टात हजर केलं. त्यांना 12 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, अर्थमंत्री अरुण जेटलींसह इतर मंत्र्यांनी या कारवाईसाठी NIAचं कौतुक केलं आहे. पण गावातील लोक या कारवाईवर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहेत. आणि या प्रकरणाच्या स्वतंत्र चौकशीची मागणीही करत आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)