भीमा कोरेगावात चंद्रशेखर आझाद यांना सभेसाठी परवानगी नाही

  • श्रीकांत बंगाळे
  • बीबीसी मराठी प्रतिनिधी
भीमा कोरेगाव

भीम आर्मीच्या चंद्रशेखर आझाद रावण यांना पुण्याजवळच्या भीमा कोरेगावमध्ये 1 जानेवारीला सभा घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. मात्र त्याला अभिवादनासाठी विजयस्तंभ परिसरात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

1 जानेवारी 2018 रोजी इथल्या विजयस्तंभाजवळ विजय दिवस साजरा करण्यासाठी दलित समाजाचे लोक जमले असताना या कार्यक्रमाला गालबोट लागलं आणि काही हिंसक घटना घडल्या होत्या. यात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय देण्यात आला आहे.

केंद्रीय सामाजीक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भीमा कोरेगाव येतील पेरणे फाटा येथे जाहीर सभा होत असल्याचे रिपाइंतर्फे सांगण्यात आलं आहे. भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या अनुयायांसाठी टोल माफ करण्यात यावा, अशी मागणी रिपाइं नेत्यांतर्फे करण्यात आल्याचेही पक्षातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

गेल्या वर्षीच्या घटनांमधून धडा घेत 1 जानेवारी 2019च्या कार्यक्रमासाठी प्रशासनानं पुरेशी तयारी केल्यांच वृत्त आहे. या तयारीबद्दल पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याशी केलेली बातचीत.

भीमा कोरेगाव इथल्या यंदाच्या कार्यक्रमासाठी प्रशासनानं काय तयारी केली आहे?

गेल्या 2 महिन्यांपासून आम्ही यासाठीची तयारी करत आहोत. 5 ते 10 लाख लोकांना व्यवस्थित हाताळता येईल, अशी आम्ही तयारी केली आहे.

यासाठी 11 पार्किंग स्पॉट तयार करण्यात आले आहेत. कार्यक्रमासाठी येणाऱ्या लोकांच्या गाड्यांना या स्पॉटजवळ अडवण्यात येईल. तिथून पुढे आमच्या गाड्या त्यांना विजयस्तंभापर्यंत घेऊन जातील. यासाठी आम्ही 150 बसेसची सोय केली आहे. याशिवाय 100 पाण्याचे टँकरही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

विजयस्तंभ आणि आसपासच्या 7 ते 8 किलोमीटरच्या परिसराला CCTV कॅमेऱ्यांच्या निगराणाखाली ठेवण्यात आलं आहे. ड्रोन कॅमेऱ्यांचाही वापर करण्यात येणार आहे.

याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागानं भीमा कोरेगावकडे जाणाऱ्या रस्त्यांना दुरुस्त केलं आहे. येणाऱ्या लोकांसाठी शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व व्यवस्था व्यापक प्रमाणात करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, BBC/MAYURESH KONNUR

1 जानेवारी 2018चा हिंसाचार बघता आसपासच्या गावातील लोकांच्या मनात भीती आहे का?

यावेळी लोकांसोबत आमचं कोऑर्डिनेशन चांगलं आहे. आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन बैठका घेण्यात आल्या आहेत. तिथल्या लोकांमध्ये भयमुक्तीचं वातावरण निर्माण केलं आहे.

मी स्वत: 15 ते 20 बैठका घेतल्या आहेत. भीमा कोरेगावला जाऊन तिथली पाहणी केली आहे. लोकांच्या मनात कसलीही भीती नाही. यावेळेस आमचं काम बघून लोकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

कोणत्या संघटनांना सभेसाठी परवानगी देण्यात आली आहे?

5 ते 6 संघटनांनी सभेसाठी परवानगी मागितली होती. त्या सगळ्यांना परवानगी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी या संघटनांनी परवानगी मागितली होती आणि आम्ही ती दिली आहे. परवानगी देण्यात उशीर झालेला नाही.

याआधीचा हिंसाचार लक्षात घेता इथं सभांना परवानगी देणं धोकादायक वाटत नाही का?

आम्ही मुख्य जागेवर या सभांसाठी परवानगी दिलेली नाही. विजयस्तंभापासून 500 मीटर अंतरावर सभा घ्यायला परवानगी दिली आहे.

फोटो स्रोत, BBC/MAYURESH KONNUR

फोटो कॅप्शन,

भीमा-कोरेगावनंतरच्या महाराष्ट्र बंददरम्यान मालमत्तेचं मोठं नुकसान झालं होतं.

सभांसाठी काही अटी लादण्यात आल्या आहेत का?

सभांमध्ये प्रक्षोभक आणि सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या भाषणांवर बंदी घालण्यात आली आहे. सर्व संघटनांना 'कोड ऑफ कंडक्ट' दिलेला आहे आणि याचं उल्लंघन झाल्यास तत्क्षणी कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

मागच्याहिंसाचारात गुन्हा दाखल झालेल्या लोकांना जिल्हा प्रवेशबंदी करण्यात आली आहे, अशा बातम्या आहेत...

1 जानेवारी 2018ला ज्या लोकांवर हिंसाचारप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत त्यांच्यावर बंदी घालण्यात येणार आहे.

संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावरही बंदी असणार का?

ज्या लोकांवर त्या दरम्यान हिंसाचार केल्याचा आरोप आहे, पोलीस त्यांच्यावर कारवाई करत आहे. यांतल्या विशिष्ट व्यक्ती अथवा संस्थेचं नाव माझ्याकडे नाही. मात्र ज्या-ज्या लोकांवर आरोप आहे त्या सर्वांवर बंदी असेल.

भीमा कोरेगावमध्ये गेल्या वर्षी काय झालं होतं, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही खालील व्हीडिओ पाहू शकता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)