भय्यू महाराजांच्या आत्महत्येप्रकरणी सेवक अटकेत #5मोठ्याबातम्या

भय्यू महाराज Image copyright Suryoday Parivar
प्रतिमा मथळा भय्यू महाराज

आजची वृत्तपत्रं आणि वेबसाईटवरील पाच मोठ्या बातम्या अशा :

1. भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी सेवकाला अटक

आध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांचा सेवक विनायक दुधाळे याला अटक करण्यात आली आहे. इंदूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आत्महत्येप्रकरणी अन्य 8 ते 10 जणांची चौकशी सुरू आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.

भय्यू महाराज यांनी 12 जूनला आत्महत्या केली होती. सुसाईड नोटमध्ये त्यांनी त्यांच्यानंतर दुधाळे सर्व आर्थिक व्यवहार सांभाळेल असा उल्लेख केला होता, असं या बातमीत म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी भय्यू महाराजांची दुसरी पत्नी डॉ. आयुषी शर्मा आणि पहिल्या पत्नीची मुलगी कुहू यांनी काही दिवसांपूर्वी भय्यू महाराजांचे 2 सेवक आणि एका तरुणीने त्यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला होता.

2. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद नजरकैदेत

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याची बातमी, दैनिक पुढारीने दिली आहे. शनिवारी वरळी येथील जांबोरी मैदानावर त्यांची सभा आयोजित करण्यात आली आहे, मात्र पोलिसांनी त्यांना सभागृहात ही सभा घेण्याची सूचना केली होती. त्यानंतर त्यांना एका हॉटेलमध्ये पोलिसांनी त्यांना नजरकैदेत ठेवलं असल्याचं या बातमीत म्हटलं आहे.

आझाद सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असून त्यांच्या 4 सभा नियोजित आहेत. 30 डिसेंबरला पुण्यात एसएसपीएमएस ग्राऊंडवर राज्यस्तरीय भीमा कोरेगाव संघर्ष महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान भीमा कोरेगाव हे आमच्यासाठी तीर्थस्थळ असून ठरल्याप्रमाणे सर्व सभा होतील, असं आझाद यांनी म्हटलं आहे, अशी बातमी लोकमतने दिली आहे.

3. परग्रहवासी दिसल्याचा पुणेकराचा दावा

आपल्या घराबाहेर परग्रहवासी दिसल्याचा दावा पुण्यातील एका व्यक्तीने केला असून या व्यक्तीने या संदर्भातील मेल पंतप्रधान कार्यालयाला पाठवला आहे, अशी बातमी हिंदुस्तान टाइम्सने दिली आहे.

Image copyright Science Photo Library
प्रतिमा मथळा प्रातिनिधिक फोटो

पंतप्रधान कार्यालयाने हा मेल राज्य सरकारला पाठवला, त्यानंतर याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले. हा दावा करणाऱ्या व्यक्तीला ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता, त्यानंतर त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते, असा पोलिसांनी सांगितल्याचा उल्लेख या बातमीत आहे.

4. अहमदनगर महापालिकेत भाजपचा शिवसेनेला दणका

अहमदनगर महापालिकेत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसपला सोबत घेत महापौर आणि उपमहापौर पदासाठीच्या निवडीत बाजी मारली. या पदांवर भाजपचे अनुक्रमे बाबासाहेब वाकळे आणि उपमहापौरपदी मालन ढोणे 37 मतांनी विजयी झाले.

अहमदनगर महापालिकेत भाजप तिसऱ्या स्थानावर आहे. महापालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक 24 नगरसेवक आहे, तर 18 नगरसेवकांसह राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर आहे. या निवडणुकीनंतर भाजपचे नेते, मंत्री गिरीष महाजन यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत, असे महाराष्ट्र टाइम्सच्या बातमीत म्हटलं आहे.

5. लहान मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना मृत्युदंड

लहान मुलांवर अत्याचार प्रकरणातील दोषींना मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे, अशी बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. पॉस्को कायद्यात बदल करण्यात येऊन त्यानुसार ही शिक्षा दिली जाणार आहे.

Image copyright Getty Images

केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)