जसप्रीत बुमराह : घरी बॉलिंग शिकणारा मुलगा ते भारताचा प्रमुख बॉलर

बुमराह Image copyright Reuters

मेलबर्नच्या मैदानावर तिसऱ्या दिवसाचा खेळ संपत असताना सामन्यावर भारतीय संघाची मजबूत स्थितीत दिसत आहे, त्याच प्रमुख कारण आहे जसप्रीत बुमराह.

जसप्रीतने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 15.5 ओव्हरमध्ये 33 धावा देत 6 बळी घेतले. या सहा बळींत ऑस्ट्रेलियाचे अग्रक्रमाचे 3 खेळाडू आणि खालच्या फळीतील 3 खेळाडू यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे जसप्रीतने 4 स्पेल टाकले आणि चारही स्पेलमध्ये बळी घेतले.

जसप्रीत बॉलिंग करत असताना ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार मायकल क्लार्क कॉमेंट्री करत होते. ते म्हणाले जसप्रीतने त्यांना रेयान हॅरिसची आठवण करून दिली. "जेव्हा विकेट घेण्याची गरज असायची तेव्हा मी रेयानकडे बॉल सोपवत होतो," असं ते म्हणाले.

ताशी 142 किलोमीटर इतक्या वेगाने बॉलिंग करणाऱ्या जसप्रीतने ताशी 115 किलोमीटर वेगाचा स्लो यॉर्कर टाकून शॉन मार्शला बाद केले तेव्हा त्याच्यावर कौतुकाच वर्षाव झाला.

उत्तम नियंत्रण

जसप्रीतचं त्याच्या बॉलिंगवर उत्तम नियंत्रण असल्याचं विश्लेषक सांगतात. 25 वर्षांच्या जसप्रीतने हे कौशल्य वारंवार सिद्ध केलं आहे. याचा पहिला धडा त्याला आईकडून मिळाला. 6 डिसेंबर 1993ला अहमदाबादमधील एका व्यापारी कुटुंबात जन्मलेल्या जसप्रीतने आयुष्यात बरेच चढउतार पाहिले आहेत.

7 वर्षांचा असताना वडिलांचे छत्र हरपलेल्या जसप्रीतला आई दलजीतने मोठं केलं. टीव्हीवर क्रिकेट सामने पाहून जसप्रीत घरी वेगवान गोलंदाजीची प्रॅक्टिस करायचा. भिंतींवर चेंडू टाकून तो हा खेळ खेळत असे. तो प्रॅक्टिस करत असताना चेंडूचा आवाज फार व्हायचा. त्यामुळे त्याच्या आईने त्याला फटकारले होते. आवाज होणार नसेल तरच ही प्रॅक्टिस करायची असं त्याला त्याच्या आईने सुनावले होते.

Image copyright Reuters

यावर जसप्रीतने वेगळाच मार्ग शोधला. जिथं भिंत आणि फ्लोअरिंग जिथं मिळते त्या कोनात बॉल टाकला तर आवाज कमी होतो, हे त्याच्या लक्षात आलं. या मार्गाने त्याची प्रॅक्टिस सुरू राहिली. लहानपणापासून जसप्रीत वेगवान गोलंदाजांची नक्कल करायचा. पण त्यांची बॉलिंगची जी अॅक्शन आहे, ती केव्हा विकसित झाली हे मात्र त्यालाही आठवत नाही. अर्थात ही अॅक्शन त्याचं वेगळेपण होईल, हे त्याला कधी वाटलं नव्हतं.

चेंडू फेकण्याच्या त्याच्या वेगळ्या अॅक्शनमुळे बॅट्समन नेहमी फसतात. शाळेत असताना त्याची निवड गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या प्रशिक्षण शिबिरात झाली होती. तेथून त्याची निवड एमआरएफ फाऊंडेशनमध्ये झाली. बघता बघता त्याची निवड गुजरातच्या 19 वर्षांखालील संघात झाली. जसप्रीतची कामगिरी लक्षात घेत त्याची निवड सैय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेसाठी झाली. गुजरात संघाच्या विजयात जसप्रीतची कामगिरी महत्त्वाची ठरली. पण या कामगिरीपेक्षा दुसऱ्याच एका घटनेने त्याच नशिब बदललं.

त्यावेळी मुंबई इंडियन्सचे कोच जॉन राईट पुण्यात सुरू असलेली सैय्यद मुश्ताक अली टी20 स्पर्धा पाहण्यासाठी आले होते. त्यांची नजर जसप्रीतवर पडली. त्यांनी जसप्रीतचा करार मुंबई इडियन्ससोबत केला. ज्या ड्रेसिंगरूममध्ये सचिन तेंडुलकर सारखा महान फलंदाज आणि लसिथ मलिंगा सारखा जिनियस गोलंदाज होता, तिथं तो पोहोचला.

स्टार खेळाडूंच्या सहवासाचा काय परिणाम होऊ शकतो, हे जसप्रीतच्या कामगिरीवरून दिसू लागलं होतं. मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या विरोधात जसप्रीतला संधी दिली. विराट कोहलीने जसप्रीतच्या पहिल्या 3 बॉलवर चौकार ठोकत, त्याचं स्वागत केलं. पुढं काय करायचं, हे जसप्रीतला समजत नव्हतं. त्याने सचिनशी सल्लामसलत केली. "तुझ्या एका चांगल्या चेंडूने या मॅचचं चित्र बदलेल. काही काळजी करू नको, फक्त खेळावर लक्ष दे," सचिनचा हा सल्ला जसप्रीतने मानला आणि याच ओव्हरमध्ये त्याने विराटला एलबीडब्लूवर बाद केलं. पहिल्याच सामन्यात त्याने 3 बळी घेतले. त्यानंतर जसप्रीतचं कौतुक अमिताभ बच्चन यांनीही केलं.

पण जसप्रीतला फॉर्म आणि फिटनेसची समस्या सतावू लागली. अशा स्थितीही मुंबई इंडियन्सचा त्याच्यावर विश्वास कायम होता.

लसिथ मलिंगा सोबत स्लो बॉल आणि यॉर्करच्या कुलुप्त्या शिकण्यात त्याला काहीच अडचण आली नाही. स्लो बॉल आणि यॉर्करला आपल्या भात्यातील घातक शस्त्र बनवण्यात तो यशस्वी ठरला. अर्थात त्याची गोलंदाजी हे त्याचं सर्वांत मोठं शस्त्र ठरलं.

मेलबर्नमधील सामन्यानंतर तो म्हणाला, "लहानपणापासून मी बऱ्याच गोलंदाजांना पाहात शिकलो आहे. पण ही अॅक्शन कधी विकसित झाली ते माहिती नाही. कोणत्याच कोचने मला अॅक्शन बदलण्यासाठी सांगितलं नाही. फक्त मला शरीर मजबूत बनवण्याचा सल्ला देण्यात आला. कारण शरीरावर ताण पडून वेग कमी येईल, अशी भीती त्यांना वाटत होती."

Image copyright AFP

जसप्रीतला फिटनेसबद्दल अंदाज नसला तरी त्याच्या कलेवर त्याचा पूर्ण विश्वास होता. त्याच विश्वासाने तो जेव्हा नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये पोहोचला तेव्हाची प्रशिक्षिक भरत अरुण यांनी त्याच्या अॅक्शनवर विश्वास दाखवला.

याचा परिणाम असा झाला की 2016ला त्याची निवड देशाच्या टी-20 संघात आणि नंतर वनडे टीममध्ये झाली. बघता बघता तो भारतीय संघाचा सर्वांत वेगवान बॉलर म्हणून प्रस्थापित झाला.

जसप्रीतची जादू कायम राहाणार?

पण प्रश्न पडतो की जसप्रीतची जादू कायम राहाणार का?

याचं उत्तर संघाला 2018 साली मिळालं. जानेवारीमध्ये कसोटीमध्ये पदार्पण करणारा बुमराह सतत चांगली कामगिरी करत भारतासाठी विश्वासार्ह गोलदांज बनला आहे. मेलबर्न कसोटीमधील पहिल्या डावापर्यंत बुमराहने 45 बळी मिळवले आहेत. हा भारतीय बॉलरसाठी एक रेकॉर्ड आहे.

पदार्पणाच्या वर्षी सर्वाधिक कसोटी बळी घेणाऱ्या भारतीय बॉलरचा विक्रम आता बुमराहच्या नावावर आहे. यापूर्वी भारताचे दिलीप दोषी यांनी सर्वाधिक 40 बळी घेतले होते. अर्थात या रेकॉर्डच्या जागतिक कामगिरीत बुमराह 4थ्या क्रमांकावर आहे. 1981ला पदार्पण करणारे ऑस्ट्रेलियाचे बॉलर टॅरी एल्डरमन यांनी 54 बळी घेतले होते. हा विक्रम आजवर अबाधित आहे. 1988ला वेस्ट इंडिजचे कर्टनी अँब्रोज 49 बळींसह या यादीत दुसऱ्या क्रमांकावर, तर इंग्लडचा बॉलर स्टीवन फिनने 2010ला पदार्पण वर्षांत 46 बळी घेतले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीतील दुसऱ्या डावात फिन आणि अँब्रोज यांना मागे टाकण्याचा दम बुमराहमध्ये आहे.

मेलबर्न कसोटीत बुमराहने आणखी एक विक्रम नोंदवला, जो आजवर कोणत्याही आशियायी खेळाडूने नोंदवलेला नाही. एका वर्षांत बुमराहने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेत डावात 5 बळी घेण्याची कामगिरी केली.

निश्चितच बुमराहने भारतीय क्रिकेटला नवी ओळख दिली आहे. सध्याच्या स्थितीत तो सातत्याने ताशी 140 किलोमीटरच्या वेगाने बॉलिंग करू शकतो. वैविध्यपूर्ण गोलंदाजीने तो कुठल्याही क्रमाची फलंदाजी मोडून काढू शकतो.

त्याने स्वतःचा फिटनेस सुधारला आहे. इन स्विंग आणि बाऊन्सर टाकण्याच्या कलेतही तो निष्णात झाला आहे. निव्वळ आपल्या अॅक्शनवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यश मिळणार नाही, याची जाणीव नक्कीच त्याला असणार.

Image copyright EPA

मेलबर्नमधील तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर तो म्हणाला, "मी आतापर्यंत भारतात कसोटी सामना खेळलेलो नाही. पण दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात मी खेळलो आहे. यातून मला बरंच शिकायला मिळालं आहे. सुरुवात तर चांगली झाली आहे."

बुमराहच्या आतापर्यंतच्या प्रवासात खेळाडूला चँपियन बनवणाऱ्या सर्वच बाबींचा समावेश आहे. सुरुवातीच्या जीवनातील संघर्ष, संघर्षाच्या काळात लक्षापासून विचलित न होता कामावर लक्ष केंद्रित करणं, लक्ष्य गाठण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करणं आणि प्रत्येक क्षणी नवीन काहीतरी करण्यासाठी धडपडणं, या गोष्टी त्याच्याकडे दिसून येतात.

बुमराहने सुरुवातीला अपेक्षा जाग्या केल्या आहेत. बुमराह समोर खरं आव्हान असणार आहे ते दीर्घ काळापर्यंत क्रिकेटच्या मैदानावर टिकून राहाण्याचं. जर बुमराह स्वतःला टिकवू शकला तर भारतीय क्रिकेटचा आलेख नक्कीच नवी उंची गाठू शकतो. पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा सतत नवीन शिकण्याची ऊर्मी आणि कौशल्य आत्मसात करण्याची प्रयत्नांना तो नेहमीच जिवंत ठेऊ शकेल.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)