बुलंदशहर हिंसा: 'पहिली गोळी इन्स्पेक्टर सुबोधनीच झाडली होती' - प्रत्यक्षदर्शींचा दावा

बुलंदशहर हिंसाचार प्रकरणात तपासाला गती देण्यात उत्तर प्रदेश पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. हे यश पोलिसांना मिळू शकलं आहे, ते एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदारामुळे. या साक्षीदाराचं नाव मुकेश असं आहे.

पोलिसांनी या साक्षीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारावर इन्स्पेक्टर सुबोध कुमार सिंह यांच्या हत्येप्रकरणी गुरुवारी सिकंदराबाद-नॉयडा सीमेवरून प्रशांत नट याला अटक केली आहे. प्रशांत याचं नाव सुरुवातीच्या FIRमध्ये नव्हतं.

3 डिसेंबर 2018ला बुलंदशहरमध्ये झालेल्या हिंसाचारात सुबोध कुमार आणि एका सुमित नावाचा एक युवक मारला गेला होता. कथित गोहत्येच्या विरोधात जमाव आंदोलन करत असताना हा हिंसाचार झाला होता.

फोटो स्रोत, Sumit Sharma

मुकेश यांनी शुक्रवारी पोलिसांच्या उपस्थितीमध्ये माध्यमांना माहिती दिली की प्रशांतने सुबोध कुमार यांचं रिव्हॉल्व्हर हिसकावून त्यांच्यावर गोळी झाडली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

प्रशांतला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

प्रशांतला न्यालायलयात हजर केलं जात असताना पत्रकांरांनी त्याला या गुन्ह्याबद्दल विचारलं असता त्याने याचा इन्कार केला आहे.

मुकेश यांचा दावा

मुकेश सांगतात आधी सुबोध कुमार यांनी मृत सुमितवर गोळी झाडली होती, त्यानंतर लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला.

फोटो स्रोत, Sumit Sharma

फोटो कॅप्शन,

साक्षीदार मुकेश

Skip पॉडकास्ट and continue reading
पॉडकास्ट
तीन गोष्टी

दिवसभरातल्या कोरोना आणि इतर घडामोडींचा आढावा

भाग

End of पॉडकास्ट

मुकेश म्हणाले, "इन्स्पेक्टर सुबोध मला ओळखत होते. सुबोध यांच्या हनुवटीला मार लागला होता. मी एका वाळूच्या ट्रॉलीमागे लपलो होतो. चारही बाजूंनी दगडफेक सुरू होती. मी त्यांना माझ्या गावाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होतो.

"सुमितने एक दगड फेकला तो सुबोध यांनी लागला. सुबोध यांनी प्रत्युत्तरात दगड फेकला तो दुसऱ्या व्यक्तीला लागला. सुमित दगडफेक करण्यात सर्वांत पुढे होता. रस्त्यावर एक पाईप पडली होती. सुमित त्यावरून उडी मारत असताना इन्स्पेक्टर साहेबांनी त्याला गोळी घातली.

मुकेश पुढं म्हणाले, "सुमित जागेवरच पडला. तिथं एक भिंत होती. भिंतीमागून प्रशांत आला आणि त्याने सुबोध कुमार यांना मागून पकडलं, त्यानंतर लोक त्यांच्यावर तुटून पडले. लोकांनी त्यांच्यावर दगड, काठ्यांनी हल्ला चढवला. ते खाली पडले. त्यानंतर प्रशांतने त्यांच्याकडून रिव्हॉल्व्हर हिसकावून घेतले आणि त्यांच्यावर गोळी झाडली.

"प्रशांत रिव्हॉल्व्हर घेऊन पळून जात होता, त्यानंतर कुणी तरी त्याला रिव्हॉल्व्हर टाकून द्यायला सांगितले. त्यानं त्यांचं एकून रिव्हॉल्व्हर घटनास्थळी टाकून दिलं," असं मुकेश म्हणाले.

प्रशांत नटचं नाव कसं पुढं आलं?

बुलंदशहरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रभाकर चौधरी यांनी बीबीसीचे प्रतिनिधी नवीन नेगी यांच्याशी बोलताना या प्रकरणाची अधिक माहिती दिली. ते म्हणाले की एका व्हीडिओमध्ये मुकेश दिसत होता, त्यावरून त्याच्याकडे चौकशी सुरू होती. सुरुवातीला व्हीडिओत प्रशांतची ओळख पटत नाही, कारण हा व्हीडिओ घेणारी व्यक्ती प्रशांतच्या पुढे उभी होती.

"त्यानंतर एका ठिकाणी प्रशांत दिसतो. आम्ही त्याच्या घरी चौकशी केली, पण तो कुटुंबासह बेपत्ता झाल्याचं समजलं. प्रशांतचं वय 32-34 असून तो गुंड प्रवृत्तीचा आहे," असं चौधरी सांगतात.

या प्रकरणावर पोलीस आपली भूमिका बदलत असल्याचा त्यांनी इन्कार केला.

फोटो स्रोत, Sumit Sharma

फोटो कॅप्शन,

प्रशांत नट (उजवीकडे)

बीबीसीचे प्रतिनिधी कुलदीप मिश्रशी बोलताना चौधरी म्हणाले, "या प्रकरणात आम्ही जितू फौजीला अटक केली, त्यावेळी काही माध्यमांनी जितूने गोळी झाडल्याच्या बातम्या दिल्या. पण पोलिसांनी जितूने सुबोध सिंह यांची हत्या केल्याचं म्हटलं नव्हतं. जितूवर गर्दीत सहभागी, घोषणा देणं, आग लावणे असे गुन्हे नोदं आहेत. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंद नाही."

या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी कुणावर सुबोध कुमार यांच्या हत्येचा गुन्हा नोंदवला नव्हता, असं ते म्हणाले.

यापूर्वी योगेश राज होता मुख्य संशयित

या प्रकरणात सुरुवातीला बजरंग दलाचा स्थानिक कार्यकर्ता योगेश राज याला मुख्य संशयित ठरवण्यात आलं होतं. योगेशला अजून अटक झालेली नाही.

चौधरी म्हणाले, "योगेश राजला न्यायालयाने फरार घोषित केलं आहे. तो 7 दिवसांत हजर झाला नाही किंवा त्याला अटक झाली नाही तर त्यांच्यावर आणखी स्वतंत्र गुन्हा नोंद होईल. शिवाय त्याच्या मालमत्तेचा लिलाव केला जाईल."

कलुआने केले होते कुऱ्हाडीचे वार

चौधरी म्हणाले, "तुम्ही एक व्हीडिओ पाहिला असेल त्यात इन्स्पेक्टर सुबोध कुमार यांचं शरीर अर्धवट तुटलेलं दिसतं. हा व्हीडिओ त्यांना गोळी लागल्यानंतरचा आहे. पोलीस त्यांना वाचवण्यासाठी पोहोचले होते. पण लोक तिथं पुन्हा आले. त्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला, तेव्हा पोलीस तेथून पळून गेले. गर्दीने पोलिसांची जीप पेटवून दिली. त्यात सुबोध कुमार यांचा बूट जळाला. तिसऱ्या प्रयत्नात सुबोध कुमार यांना तिथून हलवणं पोलिसांना शक्य झालं."

फोटो स्रोत, Sumit Sharma

फोटो कॅप्शन,

प्रभाकर चौधरी

ते म्हणाले, "सुबोध कुमार यांच्या शरीरावर ज्या खोल जखमा दिसतात, त्या कुऱ्हाडीच्या आहेत. कलुआ नामक एक व्यक्ती रस्ता अडवण्यासाठी झाडं तोडत होता, त्याने सुबोध कुमार यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला, त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालण्यात आले. हे वार झाले नसते तर त्यांनी पळून जाऊन स्वतःचा जीव वाचवता आला असता. पोलीस सध्या या व्यक्तीला शोधत आहेत."

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)