मुळशीच्या तहसीलदारांना 1 कोटीची लाच घेताना अटक - #5मोठ्याबातम्या

सचिन डोंगरे

फोटो स्रोत, FACEBOOK/SACHIN DONGARE

आजची वृत्तपत्रं आणि वेबसाईटवरील महत्त्वाच्या बातम्या अशा :

1) मुळशीच्या तहसीलदारांना 1 कोटींची लाच घेताना अटक

पुण्यातील मुळशी येथील तहसीलदार सचिन डोंगरे यांना तब्बल 1 कोटींची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली, अशी बातमी लोकमत Network18नं दिली आहे. सचिन डोंगरे यांनी जमिनीच्या व्यवहारातून 1 कोटींच्या लाचेची मागणी केली होती, असं या बातमीत म्हटलं आहे.

या प्रकरणातील तक्रारदारांचे वारस नोंदीचं प्रकरण मंत्रालयातून फेरचौकशीसाठी तहासीलदार कार्यालयाकडे आले होते. यामध्ये तक्रारदारला निकालपत्र देणं आणि फेरफार अंती 7/12 पत्रकवर नोंद घेण्यासाठी डोंगरे यांनी 1 कोटींची लाच मागितली होती, असा त्यांच्यावर संशय आहे.

त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबद्दल तक्रार केली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर एसीबीचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला.

संध्याकाळी लवासा रोडवर घोटवडे फाटयाजवळ डोंगरे यांना पैसे घेण्यासाठी बोलवण्यात आले. यावेळी, तक्रारदाराकडून 1 कोटींची लाच घेताना त्यांना अटक करण्यात आली, अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी दिली. तक्रारदाराने बॅगेत 15 लाख रुपयाच्या चलनी नोटा आणि 85 लाख किंमतीच्या चलनी नोटांच्या आकाराचे कोरे कागद ठेवले होते, असं या बातमीत म्हटलं आहे.

2) मोदींच्या सभेनंतर झालेल्या हिंसाचारात पोलिसाचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा संपल्यानंतर गाझीपुरातून माघारी परतणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या गाड्यांवर निषाद पार्टी आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला असता पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत पोलीस कॉन्स्टेबल सुरेशकुमार वत्स यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने सुरेश वत्स यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन,

प्रतिकात्मक

हिंसाचाराप्रकरणी आतापर्यंत ८ जणांना पोलिसांनी अटक केली असून फरार आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे, अशी माहिती गाझीपूरचे जिल्हाधिकारी के. बालाजी यांनी दिली.

3) विनापरवानगी थर्टी फर्स्टची पार्टी करणाऱ्यांना अटक होणार

प्रशासनाच्या परवानगीविना कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल आणि पबमध्ये पार्टी करणाऱ्यांना आता अटकेची कारवाई होऊ शकते. ABP माझानं ही बातमी दिली आहे.

नवी मुंबईत सोसायटी, मैदान, गच्ची, हॉटेल, पब तसेच कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी 31 डिसेंबर पार्टी करण्यासाठी पोलिसांकडून परवानगी घ्यावी लागणार आहे, यासंदर्भातील परिपत्रक नवी मुंबई पोलिसांकडून जारी करण्यात आले आहे.

31 डिसेंबरच्या रात्री परवानगीविना डीजे वाजवणाऱ्यांवर, लाऊडस्पीकर्स लावणाऱ्यांवरही कारवाई होणार आहे. तसेच हॉटेल किंवा पब मालकांनी परवानगीविना पार्टीचे आयोजन केले किंवा विनापरवाना डीजे किंवा लाऊडस्पीकर्स लावले तर हॉटेल आणि पब व्यावसायिकांचा परवाना रद्द होऊ शकतो, असं या बातमीत म्हटलं आहे.

4) थंडीमुळे द्राक्ष निर्यातीवरपरिणाम

वाढत्या थंडीमुळे द्राक्षवेली, द्राक्ष घडांचा विकास खुंटला असून परिपक्व मण्यांना तडे जाऊ लागले आहे. याचा परिणाम उत्पादनासह निर्यातीवर होण्याची भीती आहे, असं लोकसत्ताच्या बातमीत म्हटलं आहे.

अलीकडच्या काळापर्यंत वातावरण पोषक राहिल्याने द्राक्षांचे मुबलक उत्पादन होण्याचा अंदाज होता. हंगामपूर्व द्राक्षांना किलोला 80 ते 100 रुपये असे दर मिळाल्याने उत्पादकांचा उत्साह दुणावला होता.

फोटो स्रोत, Getty Images

डिसेंबरअखेरीस हवामानातील बदल द्राक्ष बागांवर विपरित परिणाम करणारे ठरू लागले आहेत. सध्या द्राक्षमण्यांत साखर उतरणे, त्यांची फुगवण प्रक्रिया सुरू आहे. काही ठिकाणी द्राक्ष घड परिपक्व होत असून त्या बागा लवकरच काढणीवर येतील. या सर्व बागांना थंडीचा तडाखा बसत आहे, असं या बातमीत म्हटलं आहे.

5) पुणे विद्यापीठाने चंद्रशेखर आझादांच्या सभेला परवानगी नाकारली

भीम आर्मी या संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांच्या सभेला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाने परवानगी नाकारली आहे, तसेच रविवारी (30 डिसेंबर ) SSPMS मैदानावर होणाऱ्या सभेला ही पुणे पोलिसांकडून अद्याप कोणत्याही प्रकारची परवानगी मिळालेली नाही. सकाळनं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, CHANDRASHEKHAR

कोरेगाव भीमा येथील मागील वर्षीच्या हिंसाचार पार्श्वभूमीवर आणि 1 जानेवारीला विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आझाद पुण्यात येणार होते. याबरोबरच पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि एसएसपीएमएस या ठिकाणी आझाद यांची सभा होणार होती. मात्र विद्यापीठ प्रशासनाने त्यांच्या सभेला परवानगी नाकारली असल्याचे भीम आर्मीचे पुणे शहर प्रमुख दत्ता पोळ यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)