नागपुरात निच्चांकी तापमान : महाराष्ट्र गोठवणारी थंडीची लाट आहे तरी काय?

थंडी Image copyright Getty Images
प्रतिमा मथळा थंडीची लाट आणखी काही दिवस राहण्याची शक्यता आहे.

नागपुरात शनिवारी सर्वांत कमी म्हणजे 3.5 डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात आणखी 2-3 दिवस कडाक्याची थंडी असेल, असं हवामान खात्याच्या पुणे विभागाने म्हटलं आहे. राज्यातील कडाक्याच्या थंडीला हिमालयात झालेल्या बर्फवृष्टीच्या जोडीनेच प्रदूषणही कारणीभूत आहे, असं तज्ज्ञांचं मत आहे.

नागपुरातील गेल्या 5 दशकांतील निच्चांकी तापमान नोंदवलं गेलं आहे. अकोल्यात 5.2 डिग्री सेल्सिअस, गोंदिया 6 डिग्री सेल्सिअस, ब्रम्हपुरी 7 डिग्री सेल्सिअस, बुलढाणा 7.8 डिग्री इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात गडचिरोली जिल्हा वगळता सर्वत्र 10 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे.

येत्या 2 दिवसांत विदर्भाच्या बऱ्याच भागात थंडीची लाट तर तुरळक ठिकाणी तीव्र थंडीची लाट आणि दव गोठण्याची शक्यताही हवामान खात्यानं व्यक्त केली आहे.

थंडीची लाट म्हणजे नेमकं काय?

शिवाजी विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पी. डी. राऊत यांनी थंडीची लाट म्हणजे काय याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, "ठराविक दिवसांत तापमानात अचानक घट होते तेव्हा थंडीची लाट येते. यामागे उत्तर भारतातून वाहणारं थंड वारे कारणीभूत आहे. हिमालयात जेव्हा बर्फवृष्टी व्हायला सुरू होते तेव्हा तेथील थंड वारे दक्षिणेकडे वाहायला सुरुवात होते. याचा परिणाम म्हणून राज्यातील तापमान घसरते."

केवळ विदर्भातच नव्हे तर संपूर्ण मध्य भारतात सध्या थंडीची लाट आहे.

हिवाळ्यातल्या सरासरी किमान तापमानात 3 ते 5 डिग्री सेल्सियसची घट होते तेव्हा थंडीची लाट येते आणि सरासरी तापमानात 5 ते 7 डिग्री सेल्सियची घट झाली तर थंडीची तीव्र लाट येते, अशी माहिती हवामान खात्यातील एका अधिकाऱ्याने दिली. किमान तापमान ज्या वेळी 10 डिग्रीच्या खाली येते, तेव्हा थंडीची लाट पसरण्याची शक्यता जास्त असते, असं त्यांनी सांगितलं.

'हवा प्रदूषणामुळे थंडीची लाट तीव्र'

"हवा प्रदूषणामुळे थंडीची लाट आणखी तीव्र होते. हवेतले प्रदूषित घटक वातावरणातील तापमान शोषून घेतात. त्यामुळे गारवा वाढतो तसंच या काळात हवा स्थीर राहिली तर थंडीची लाट आणखी दीर्घकाळ राहते," असं पर्यावरण अभियांत्रिकी विषयाचे प्राध्यापक सौरभ जोशी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. ते सध्या KIT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोल्हापूर येथे पर्यावरण अभियांत्रिकी हा विषय शिकवतात.

Image copyright Getty Images

हवामान खात्यानं विदर्भात थंडीची लाट आणखी काही दिवस राहील, अशी शक्यता व्यक्त केली आहे. यामागे इतर कारणांबरोबर हवेतले प्रदूषित घटकही कारणीभूत आहेत, असं त्यांनी सांगितलं.

"सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड आणि इतर प्रदूषकं हवेतला गारवा धरून ठेवतात," असं त्यांचं म्हणणं आहे.

Image copyright ANIRUDDH DAWALE

हवामानाचा अंदाज

हवामान खात्याने 2 जानेवारीपर्यंत हवामान कोरडे राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. शिवाय 31 डिसेंबरला विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट असेल, असंही हवामान खात्यानं म्हटलं आहे. पुणे परिसरात 31 डिसेंबरला किमान तापमान 9 डिग्री आणि 1 जानेवारीला 10 डिग्री असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मुंबई आणि आसपासच्या परिसरात 31 डिसेंबरला किमान तापमान 11 डिग्री इतकं असेल.

Image copyright Surabhi Shirpurkar/BBC
प्रतिमा मथळा नागपूरवर सध्या थंडीमुळे धुक्याची दुलई पसरली आहे.

स्कायमेट या खासगी संस्थेने अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, भंडारा, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, उस्मानाबाद, परभणी, पुणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत रविवारी (30 डिसेंबर) थंडीची लाट जाणवेल, अशी शक्यता व्यक्त केली आहे.

हेही वाचलंत का?

हेही नक्की पाहा -

मीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे
पाहा व्हीडिओ : महिलांना पुरुषांपेक्षा जास्त थंडी वाजते का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)