मोदींच्या सभेनंतर दगडफेक : पोलिसाचा बळी घेणारी हिंसा अशी घडली

  • समीरात्मज मिश्र
  • बीबीसी हिंदीसाठी
नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, AFP

उत्तर प्रदेशातील गाजीपूर जिल्ह्यामध्ये शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेतील ड्युटीवरुन परतणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर काही लोकांनी दगडफेक केली. यामध्ये एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले. काही दिवसांपूर्वीच बुलंदशहर इथं कथित गोहत्येवरून झालेल्या आंदोलनावेळी पोलीस इन्स्पेक्टरची हत्या झाली होती. ही घटना ताजी असतानाच जमावाच्या हिंसेत आणखी एका पोलिसाचा बळी गेला आहे. ही घटना कशी घडली, याचा हा वृत्तांत.

या घटनेसंदर्भात गाजीपूर विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी महिपाल पाठक यांनी बीबीसीला माहिती दिली. ते म्हणाले, "पोलीस शिपाई सुरेश वत्स पंतप्रधानांच्या सभेमध्ये ड्युटी बजावून परतत होते. यावेळी निषाद समुदायातील काही लोक नौनहरा भागातल्या अटवा मोड पोलीस ठाण्याबाहेर निदर्शनं करत होते."

याच ठिकाणी लोकांनी दगडफेकही केली, ज्यामध्ये सुरेश वत्स गंभीर जखमी झाले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत दोन लोक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही पोलीस कर्मचाऱ्यांना किरकोळ इजा झाली आहे.

गाजीपूरचे जिल्हादंडाधिकारी के. बालाजी आणि पोलीस अधीक्षक यशवीर सिंह यांच्यासह इतर वरिष्ठ सरकारी अधिकारी तातडीने घटनास्थळी आणि नंतर रुग्णालयात पोहोचले.

निषाद समाजाचं आरक्षणासाठी आंदोलन

फोटो स्रोत, LAXMIKANT-BBC

आरक्षणाच्या मागणीसाठी निषाद समाजाचे लोक धरणं-आंदोलन करत होते. पंतप्रधानांची सभा संपल्यानंतर शनिवारी संध्याकाळी कठवामोड पुलावर मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली.

लोकांचा एवढा जमाव पाहिल्यांनतर पंतप्रधानांच्या सभेवरून परतणाऱ्या करीमुद्दीन ठाण्याचे पोलीस तिथे गेले. त्यांनी लोकांना पांगविण्यासाठी प्रयत्न केले.

महिपाल पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचवेळेस आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये काही वाहनांच्या काचाही फुटल्या. आक्रमक आंदोलनकर्त्यांनी शिपाई सुरेंद्र वत्स यांच्यावर हल्ला केला.

परवानगीशिवाय आंदोलन?

नौनहरा पोलीस ठाण्याजवळ आरक्षणासह इतर मागण्यांसाठी शनिवारी सुरू असलेल्या निषाद समाजाच्या आंदोलनाला परवानगीच देण्यात आली नव्हती, अशी माहिती स्थानिकांनी दिली. पंतप्रधानांच्या सभेदरम्यान काही गैरप्रकार घडू नये, यासाठी दक्षता म्हणून पोलिसांनी निषाद पक्षाच्या एका नेत्याला सभेपूर्वीच ताब्यात घेतलं होतं.

आपल्या नेत्याला ताब्यात घेतल्यामुळे आंदोलन करणाऱ्या कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले.

घटनास्थळी उपस्थित असलेले पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते उमेश श्रीवास्तव यांनी बीबीसीला सांगितले, "शनिवारी सकाळी जेव्हा निषाद समाजाचे लोक आंदोलन करत होते, तेव्हाच पंतप्रधानांच्या सभेत सहभागी होण्यासाठी आलेल्या भाजप नेत्यांसोबत त्यांचा जोरदार वाद झाला. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी निषाद समाजाच्या काही नेत्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं. याप्रकारामुळे निषाद समाजाचे लोक आधीच खूप भडकले होते. त्यातच पंतप्रधानांच्या सभेनंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी दगडफेक सुरू केली."

वत्स यांच्या कुटुंबाला सरकारी मदत

फोटो स्रोत, Getty Images

दगडफेकीत मृत्युमुखी पडलेले शिपाई सुरेश वत्स मूळचे प्रतापगड जिल्ह्यातल्या रानीगंजचे होते. त्यांची नियुक्ती सध्या गाजीपूरमधल्या करीमुद्दीनपूर पोलीस ठाण्यात झाली होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेबद्दल खेद व्यक्त केला. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सुरेश वत्स यांच्या कुटुंबीयांना आदित्यनाथ यांनी चाळीस लाख रुपयांची आर्थिक मदत घोषित केली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या आई-वडिलांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत तसंच पत्नीला पेन्शन आणि कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याची घोषणाही आदित्यनाथ यांनी केली.

दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी गाजीपूरच्या प्रशासनाला दिली आहेत. पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतलं आहे, मात्र आतापर्यंत याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नाहीये.

माहितीशिवाय प्रतिक्रिया देण्यास नकार

परवानगी मिळाली नसतानाही निषाद पक्षाचे लोक शनिवारपासून जागोजागी आंदोलन करत होते. सकाळी जेव्हा त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, तेव्हाही त्यांचा पोलिसांसोबत वाद झाला होता.

आंदोलन करणाऱ्या निषाद पक्षाच्या नेत्यांनी मात्र या घटनेमध्ये आपल्या पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्याचा हात नसल्याचं म्हटलं होतं. घटनेसंबंधी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय प्रतिक्रिया द्यायला पक्षाच्या नेत्यांनी नकार दिला आहे.

निषाद समाजातील लोक गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत.

निषाद पक्षाचे नेते छत्रपती निषाद यांनी शनिवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना म्हटलं होतं, "आम्ही निषादांसाठी आरक्षणाची मागणी करत आहोत आणि आमच्या समाजाच्या लोकांमध्ये त्यासंबंधी जागृती निर्माण करत आहोत. अलाहबादपासून सुरुवात करून आम्ही राज्यभर हे आंदोलन करू. चार वर्षं झाली तरी आमच्या मागणीकडं दुर्लक्ष केलं जात आहे."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)